Jump to content

सौंदर्यरस/सौंदर्यरस

विकिस्रोत कडून






सौंदर्यरस


 या जगातील मानवांपैकी बहुसंख्य मानव नेहमी दुःखी असतात, कष्टी असतात, वैतागलेले असतात. दिवसातून चार वेळा तरी ते कपाळाला हात लावतात. याचे कारण हे की, त्यांच्या आशा-अपेक्षा यांचा नित्य भंग होत असतो आणि त्याचे दुःख अनुभवताना त्यांच्या असे ध्यानात येत असते की जगात न्याय नाही, येथल्या घटनांना कसलाच धरबंध नाही 'सुख पहाता जवापाडे, दु:ख पर्वताएवढे,' हे तर विपरीत आहेच. पण त्यापेक्षाही जास्त विपरीत हे की, या सुखदुःखाला काही नियम नाही. माणसाचे कर्तृत्व, त्याचा प्रयत्न, त्याचे पाप-पुण्य व त्याला मिळणारे फळ यात कसलाच कार्यकारण भाव लोकांना दिसून येत नाही. संतसज्जनांना अनेक वेळा कष्ट, यातना, हालअपेष्टा सोसाव्या लागतात. आणि दुष्ट, पापी लोक सुखात लोळत असतात. श्रीमंतांच्या घरी अन्न विपुल असते, पण त्यांना खाण्याची वासनाच नसते. आणि गरीबांच्या पोटात आग पडलेली असूनही त्यांना अन्न मिळत नाही. दात आहेत तेथे चणे नसतात व चणे आहेत तेथे दात नसतात. जीवन असे सर्व बेबंद असंबद्ध आहे, त्यात सुसंगती अशी कोठे दिसतंच नाही. एके ठिकाणी अतिवृष्टीने पिकासकट शेतातली मातीही वाहून जाते, लोक बेघर होतात, पिढ्यान् पिढ्यांची कमाई पहाता पहाता नष्ट होते. तर दुसरीकडे पिण्यापुरतेसुद्धा पाणी मिळू नये इतकी अनावृष्टी! हा परमेश्वराच्या घरचा कोठला न्याय? श्रीमंतांच्या घरी मुलेबाळे हवी असतात. त्यांच्यावर देव कृपा करीत नाही आणि अन्नान्नदशा असेल तेथे तो भरपूर संतती देतो. देवाची ही वक्रगती मानवाच्या मनात इतकी ठसून गेली आहे की, अत्यंत लहानसहान घटनांवरूनसुद्धा तो असाच अर्थ काढीत असतो. बससाठी आपण एका ठिकाणी उभे असावे, तर उलट दिशेने जाणाऱ्या चार गाड्या येऊन जातात, पण आपल्या बाजूची एकही येत नाही. तेव्हा माणूस मनात म्हणतो की, 'आम्ही इकडे उभे आहोत ना ! तेव्हा असे होणारच !'
 जीवन असे धरबंधहीन आहे, न्यायशून्य आहे, त्यात कसलीही व्यवस्था नाही, कार्यकारण नाही, रचना नाही, सुसंगती नाही, हे पाहून माणूस वैतागून गेलेला असतो. आणि त्यामुळे कोठे व्यवस्था, रचना, सुसंगती दिसली की त्याला आनंद होतो, समाधान वाटते. आणि या विसंगत जीवनात आपणही आपल्या अल्प कुवतीप्रमाणे काही रचना करावी, सुसंगती निर्मावी अशी त्याला आस वाटत असते. ती त्याच्या जिवाची आर्त असते, उत्कट इच्छा असते. मानवाच्या या इच्छेतूनच सर्व मानवी संस्कृतीचा आणि तीतूनच पुढे सर्व कलांचा जन्म झालेला आहे.
 मानवी संसारातल्या कोठल्याही वस्तूकडे आपण नजर टाकली तरी ती वस्तू म्हणजे मानवाने केलेली एक रचना आहे असे आपल्या ध्यानात येईल. कागद ही रचना आहे, कापड ही रचना आहे. लेखणी, आरसा, दिवा, भांडे, शेगडी, पाट, या सर्व मानवकृत रचना आहेत. यातली कोणतीही वस्तू मुळात निसर्गात अशी नव्हती. खुर्ची, टेबल, घड्याळ, नांगर, दोरखंड, माग, गाडी, मोटार, विमान या सर्व मानवाच्या कृती आहेत, नवनिर्मिती आहेत. दगडावर दगड रचून मानवाने स्वतःसाठी निवारा तयार केला त्या दिवशी संस्कृतीला प्रारंभ झाला. दगड किंवा हाडूक घासून त्याने हत्यार तयार केले व प्राण्यांना मारून तो अन्न मिळवू लागला तेव्हा तिचे एक पाऊल पुढे पडले. आणि आपली प्रत्येक गरज भागविताना हत्यार, गाडी, कपडा या वस्तूंची रचना करीत करीतच त्याने संस्कृती निर्माण केली. या त्याच्या रचना, त्याने निर्माण केलेले हे आकृतिबंध, अरूपाला त्याने दिलेले हे रूप जेव्हा जास्त सुंदर, जास्त मनोहर झाले, तेव्हा त्यालाच तो कला म्हणू लागला. चित्र, शिल्प, वास्तू, नृत्य, संगीत, काव्य, नाट्य या कलांकडे आपण पाहिले तर अरूपाला दिलेला रूपाकार, सुरचना, निराकारातून निर्मिलेला आकार हेच त्याचे प्रधान लक्षण आहे असे आपल्याला दिसून येईल. याच अर्थाने आर्यावन एडमन याने 'आर्टस् अँड दि मॅन' या आपल्या पुस्तकात, सर्व मानवी संस्कृती ही एक कलात्मक रचनाच आहे, असे म्हटले आहे. तो म्हणतो, 'ज्या प्रमाणात जीवनाला आकार दिसू लागेल त्या प्रमाणात जीवन ही कला आहे. जेथे जेथे मानव भोवतालच्या भौतिक जगावर नियंत्रण प्रस्थापित करतो तेथे तेथे कला- संस्कृती दिसू लागते. जड द्रव्याला रचना आली, गतीला दिशा आली आणि आयुष्याला रेखा आली- म्हणजेच विश्वातील निराकाराला आपण इष्ट आकार दिला, जे बेबंध आहे ते सु-रेख केले की त्यालाच कला म्हणतात.'
 याचा अर्थ असा की रचना, सुसंगती किंवा 'शाकुंतला'वरील टीकेत राघवभट्टाने म्हटल्याप्रमाणे उचित सन्निवेश अथवा सुश्लिष्ट संधिबंध हा कलासौंदर्याचा आत्मा आहे. सर्व कलांचा तो समान धर्म आहे. आणि ही सुसंगती वा ही रचना पाहून पहाणाराच्या मनात जी भावना जागृत होते तिला सौंदर्यभावना असे म्हणतात.
 सौंदर्य ही एक भावना आहे हे सर्वमान्य आहे. ती स्वतंत्र भावना आहे की नाही याविषयी वाद आहे. पण भावना आहे. प्रेम, भीती, संताप यांसारखीच ती एक भावना आहे, याविषयी वाद नाही. याहून एक पाऊल आणखी पुढे जाऊन, सौंदर्य हा रस आहे, शृंगार, वीर, करुण, हास्य, भक्ती वत्सल यांसारखाच पण स्वतंत्र असा रस आहे, असा सिद्धान्त या लेखात मी मांडणार आहे.
 शृंगार, वीर, वत्सल, भक्ती या रसांचे स्वरूप वर्णिताना साहित्य- शास्त्रज्ञ असे सांगतात की, मुळात या सर्व भावना आहेत. आणि त्या उत्कटतेला आल्या की त्यांनाच रस पदवी प्राप्त होते. या प्रत्येक भावनेच्या मुळाशी मानवाच्या काम, अहंता, द्वेष, पालनवृत्ती, संघवृत्ती, युद्ध अशा ज्या सहज-प्रवृत्ती शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या आहेत त्यांपैकी कोणती तरी एक असतेच. स्त्रीला पाहून तिच्याशी संगत व्हावे अशी पुरुषाची सहजच प्रवृत्ती होते. हीच कामवासना हीच रतिभावना. कोणा तरी सर्वसमर्थाला शरण जावे, त्याचा आश्रय घ्यावा, त्याला आत्मार्पण करावे ही वृत्ती भक्तिरसाच्या बुडाशी आहे. याच्या उलट कोणाला तरी- बालकाला- आश्रय द्यावा, त्याचे पालन करावे या मूलवृत्तीतून वात्सल्य ही भावना व वात्सल्य हा रस निर्माण होतो. दुसऱ्याला जिंकावे, त्याला शरण आणावे, त्यावर प्रभुत्व गाजवावे, हाच अमर्ष किंवा संताप. यातून वीररसाची उत्पत्ती होते. मानवाच्या या सर्व मूलप्रवृत्ती, या वासना निसर्गदत्त आहेत. आणि स्वसंरक्षण, वंशसातत्य व वंशवर्धन यांसाठी निसर्गाने त्या त्याच्या ठायी योजिलेल्या आहेत. वर मानवी संस्कृतीचे जे वर्णन केले आहे त्यावरून रचना करावी, विसंगतीतून सुसंगती निर्मावी, निसर्गातील काही जड घटक एकत्र करून नवनिर्मिती करावी, ही एक काम, युद्ध, वात्सल्य यांसारखीच मानवाची मूलप्रवृत्ती आहे हे ध्यानात येईल. मॅकडुगल या विख्यात मानसशास्त्रज्ञाने सहजप्रवृत्तीच्या यादीत हिचे 'कन्स्ट्रक्शन'- रचना असेच नाव दिले आहे. रतिभावना म्हणजे स्त्री-समागमाची उत्कट इच्छा. तीच पुढे शृंगारभावनेत परिणत होते. वात्सल्य म्हणजे बालकाच्या लालनाची उत्कट इच्छा. हिच्यातूनच वत्सलरस उत्पन्न होतो. त्याचप्रमाणे रचनाप्रवृत्तीची व नवनिर्मितीची जी उत्कट इच्छा, तिच्यातूनच सौंदर्य रस निर्माण होतो. स्त्रीसंगातून, बाललालनातून, प्रभुत्वातून जेवढा आनंद मनुष्याला प्राप्त होतो तेवढाच, तितकाच उत्कट आनंद रचनेच्या, सुसंगतीच्या, म्हणजेच कलेच्या दर्शनाने त्याला लाभतो.
 हास्यरसाचे स्वरूप पाहिले तर ही कल्पना जास्त स्पष्ट होईल. सर्व हास्य विसंगतीतून, विकृतीतून निर्माण होते, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. एखाद्या लहान मुलाच्या डोक्यावर पगडी ठेवलेली पाहिली तर आपल्याला हसू येते. कारण त्याची मूर्ती व ते शिरोभूषण यात विसंगती आहे. 'एकच प्याल्या'- तील दारुड्ये, आगरकर-टिळकांचा निर्देश करू लागले की हसू येते; कारण त्यांची कृती व उक्ती यांत विसंगती आहे. अत्र्यांच्या एका नाटकात एक पुरुष, त्याचा हात धरणाऱ्या स्त्रीला, 'माझा विनयभंग होतो आहे' असे म्हणतो. ही विसंगती आहे. 'मानापमाना'तील लक्ष्मीधर सायंकाळी शिळोप्याच्या वेळी युद्ध करावे असे म्हणतो. ही विसंगती आहे. 'बायकांच्या मागे दडणारा मी वीर आहे' असे नूपुर म्हणतो, हे 'वीर' शब्दाचे विडंबन आहे. 'कवींचा कळप असतो' असे गडकरी म्हणतात. यात कवीची प्रतिष्ठा व कळप हा पशूंना लावला जाणारा शब्द यात विसंगती आहे. या विसंगतीमुळे वाचकांना, प्रेक्षकांना हसू येते. आणि त्यामुळे विनोदन, करमणूक होऊन आनंद प्राप्त होतो. त्याचप्रमाणे सुसंगती पाहून तसाच किंवा त्यापेक्षाशतपटीने जास्त आनंद मनुष्याला होत असतो. चित्रामध्ये निळा, हिरवा,पिवळा अशा रंगांतून एक सुसंगत मूर्ती निर्माण झालेली पाहून, आणि ती मूर्ती आपल्या मनात जी टिळकांची प्रतिमा असते तिच्याशी पूर्ण सदृश व सुसंगत आहे हे पाहून असाच आनंद होतो. गायनामध्ये सर्व सुरांचा एकमेळ झाला पाहिजे. बदसूर झाला, विसंगती दिसली की श्रोता त्रस्त होतो. सर्व आलाप, स्वर, आरोह-अवरोह, ताना यांत सुसंगती दिसली की मनाला अभूतपूर्व आनंद होतो. जी भावना जागृत झाल्यामुळे हा आनंद होतो ती सौंदर्यभावना. तीच परमोत्कटतेला गेली की तिला 'रस' पदवी प्राप्त होते. हे सर्व शास्त्रीय परिभाषेत पुढे मी मांडून दाखवणारच आहे. प्रथम ही कल्पना स्पष्ट करून घेऊ.

 कला ही नवनिर्मिती होय. आणि नवनिर्मिती म्हणजे काय? जोशा रेनाल्डस् या विख्यात इंग्लिश चित्रकाराने आपल्या 'डिसकोर्सेस ऑन आर्ट'या व्याख्यानात म्हटले आहे की, 'नवनिर्मिती म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून आपल्या स्मृतीत साठवून ठेवलेल्या प्रतिमांची नवी मांडणी, नवी रचना.' नवी चित्रकलाकृती पाहिली तरी तिच्यात विषय नवीन असतो असे नाही. कोणतेही विख्यात चित्र घेतले तरी त्याचे निरनिराळे भाग हे सामान्यच असतात. त्या सर्वांची जी जुळणी, जो सन्निवेश, तो नवा असतो. सर्व घटकांतून जी एकतानता, जी सुसंगती निर्माण होते तीत कलाकाराचे वैभव दिसते. ती सर्व कृती म्हणजे एका मनाचा आविष्कार, असे रूप या सुसंगतीमुळे येते. उत्कृष्ट शैलीचे रहस्य हेच आहे. रेनाल्डस् याने चित्रकलेसंबंधी जे म्हटले आहे ते माझ्या मते, सर्व कलांना लागू आहे. सर्व कला या नव्या रचना आहेत, नवे संधिबंध किंवा सु-रेखा आहेत. चित्र, शिल्प; संगीत, नृत्य, वास्तू, साहित्य- काव्य, नाटय- या सर्व कलाकृतींचे घटक. बहुधा जुनेच असतात. कलाकार त्यातून नवे बंध, नव्या रेखा निर्माण करतो. म्हणून बंध, रचना, सन्निवेश हाच कलेचा आत्मा होय.
 'विरामचिन्हे' ही गोविंदाग्रजांची कविता पहा. बाल्य, तारुण्य, अर्धागी, विश्वाचे गूढ, परमेश्वर, यासंबंधीच्या कल्पना कवीच्या मनात केव्हा तरी साठलेल्या होत्या. त्यात नावीन्य असे काही नव्हते. विरामचिन्हाचे स्वरूप शालेय जीवनात त्याला माहीत झाले होते. त्यातही नवीन काही नव्हते. पण वाङमयीन लेख व जीवनलेख यांतील त्याला सुचलेले साम्य अगदी नवीन होते. ते स्फुरण होताच त्याने ते सर्व घटक एकत्र आणून त्यांचा उचित सन्निवेश तयार केला. ती कलाकृती झाली. केशवसुतांची 'तुतारी' ही अशीच एक रचना आहे. आपल्या समाजातील दुष्ट रूढी, स्त्रियांची दुःखे, दलितवर्गाच्या यातना, देव, पूर्वज, धर्म, नीती यांविषयीचे सनातन विचार आणि नवे विचार, हे सर्व घटक समाजात होतेच. त्याविषयीच्या चर्चाही वृत्तपत्रांत रोज येत असत. पण रूढीच्या किल्ल्यावर हल्ला करणाऱ्या सेनापतीची भूमिका घेऊन एका 'तुतारी' या वस्तूभोवती केशवसुतांनी त्या सर्व कल्पनांची व विचारांची मनोहर गुंफण केली हे नवीन झाले. 'डॉल्स हाउस', 'एनिमी ऑफ पीपल', 'पिलर्स ऑफ् सोसायटी' ही इब्सेनची नाटके म्हणजे अशाच कलाकृती आहेत. भांडवलशाही, तिचा अन्याय, तिचा प्रतिकार, लोकांची स्वार्थवृत्ती, गुलामी वृत्ती, धर्मातील दांभिक कल्पना, वृत्तपत्रांची लाचारी, स्त्रीविषयक रूढ विचार, जुनी नीती, नवी नीती, या सर्व घटकांतून इब्सेनने त्या निर्माण केल्या आहेत. त्यांचा अभ्यास करताना 'ती ती पदे नित्य फिरून येती, त्या त्याच अर्थाप्रती दाविताती; पण- कौशल्य सारे रचनेत आहे!' हे ध्यानात येत असते. जोशा रेनाल्डस् यांनी म्हटल्याप्रमाणे या नाटकातील एकेक घटक निराळा केला तर तो सामान्य असाच आहे. ते सर्व घटक मिळून जो सुरेख बंध तयार झाला तो मात्र नवीन आहे. त्यांचे धागेदोरे, मानवी स्वभाव, भिन्न प्रसंग, लेखकाचे विचार, रागद्वेषादी भावना, त्यांचे उद्गार, यांची जी गुंफण नाटककाराने केली तिच्यामुळे त्या घटकांतून सौंदर्य निर्माण झालेले आहे. सौंदर्य सारे रचनेत आाहे.
 ताजमहाल या अमर कलाकृतीचा विचार केला तर ही कल्पना जास्तच स्पष्ट होईल. त्याला वापरलेले संगमरवरी दगड, त्याच्या केलेल्या चौकोनी फरश्या, या साधनसामग्रीत नवीन काही नव्हते. पण त्या सर्व संगमरवरी शिळांचा जो न्यास कलाकाराने केला त्यांतून नावीन्य आणि सौंदर्य निर्माण झाले. येथे सर्व शिल्पकला एकवटली आहे, सौंदर्याची सीमा झाली आहे. पाचही खंडांतून ते सौंदर्य पहाण्यास लोक येतात. दर वेळेस त्यातून नवीन सौंदर्याचा साक्षात्कार होतो, असे ताजमहालाचे वर्णन कवी करतात. सुट्या संगमरवरी शिळा पाहून असा आनंद कोणाला झाला असता काय ? अर्थातच नाही. मग या सौंदर्याचा आत्मा कशात आहे ? त्या विशिष्ट न्यासात, संधिबंधात, सन्निवेशात तो आहे, याविषयी दुमत होईल असे वाटत नाही.

 'रचना' हा शब्द वर अनेक वेळा वापरला आहे. त्याचा अर्थ जरा स्पष्ट करणे अवश्य आहे. 'रचना' हा शब्द वापरताना त्या रचनेचा कर्ता आणि त्या कर्त्याच्या मनातील ती रचना करण्यामागचा हेतू या दोन गोष्टी गृहीत धरल्या आहेत. एरवी त्या शब्दाला काहीच अर्थ रहाणार नाही. माळीबुवांच्या समोर फुलांच्या राशी पडलेल्या असतात. फुलांचे हार होतात, वेण्या होतात, गुच्छ बांधले जातात किंवा गालिचेही होतात. यातले आपण काय करावयाचे म्हणजे रचनेचा हेतू काय, हे माळ्याच्या म्हणजे कर्त्याच्या मनात आधी निश्चित होते आणि मग तो कामाला लागतो. हार हा हेतू असेल तर एक प्रकारचा फुलांचा सन्निवेश, गुच्छ असेल तर वेगळा, आणि गालिचा असेल तर तिसराच प्रकार. आणि कर्त्याच्या मनातल्या हेतूप्रमाणे फुलांची जुळणी झाली तरच तिला रचना म्हणावयाचे. नाही तर तो फुलांचा केवळ समूह झाला. त्यात कला नाही व सौंदर्यही नाही. तेव्हा रचना याचा अर्थ विशिष्ट हेतूने केलेली मांडणी, असा दर ठिकाणी अभिप्रेत आहे. प्रसिद्ध नर्तक शंकर कुटी यांच्या नृत्याचे एका रसिकाने केलेले वर्णन पहा. वामनावतार दाखवावयाचा, किंवा भस्सासुर- मोहिनीचे कथानक मूर्त करावयाचे, किंवा शिवपार्वती नृत्य करावयाचे हे त्यांच्या मनात आधी ठरते. आणि मग जिवणीच्या, भ्रुकुटीच्या, खांदे, मान यांच्या हालचाली, पदांचे न्यास, मुद्रेवरील भाव, हे सर्व हावभाव त्या त्या हेतूला साजतील असे केले जातान संगीताचे स्वरही तसेच निघत असतात आणि हे सर्व मिळून हा वामनावतार, ही भस्मासुर मोहिनी, हे शिव-पार्वती असा ठसा आपल्या मनावर उमटतो. मुद्रेवरील भाव, पदन्यास, संगीताचे स्वर, या सर्वांची वमन या कल्पनेशी सुसंगती असणं अवश्य असते. ती साधली तरच ती रचना झाली प्रेक्षकांना खरा आनंद या सुसंगतीमुळे मिळतो. यात कोठेही विसंगती आली की सर्व विरस होतो पार्वतीचे प्रियाराधन करताना शंकराच्या भूमिकेतील शकर कुटी नटराजाच्या पवित्र्यात उभे राहिले. ते उजव्या पावलावर उभे होते डावा पाय त्यांनी वर मोडून धरला होता. आणि छातीसमोर बाहूंच्या आकर्षक मुद्रा त्यांनी केल्या होत्या जटा, व्याघ्रांबर, भस्म हा त्यांचा पेहराव होता. त्यांच्या डोळ्यांतून शृंगार भाव ओसंडत होता. मधेच ते अगदी निश्चल उभे रहात, मधेच एका पायावर गिरकी घेत. शेवटी नृत्याचा समारोप करताना पार्वतीच्या कमरेभोवती विळखा घालून नाचत नाचत ते अंतर्धान पावले ! यातील प्रत्येक घटक 'शिवाने केलेले प्रियाराधन' या कल्पनेशी सुसंगत असाच आहे. सर्वं घटकांचा असा हेतूच्या दृष्टीने सुसंवाद जमला की कलेचा अवतार होतो. सुसंगती, सुसंवाद, सुश्लिष्ट संधिबंध हा कलेचा आत्मा आहे.
 प्रत्येक कलाकृतीच्या मागे काही निश्चित हेतू असतोच. रविवर्मा यांना उर्वशी दाखवावयाची आहे. लिओनार्डो डि व्हिन्सी यांना मोना लिसा मूर्त करावयाची आहे ठाकूर यांना मनोभंग झालेली प्रणयिनी उभी करावयाची आहे वेरूळ- अजंठ्याच्या शिल्पकारांना बुद्ध, शिवतांडव, इराणच्या शहाचा वकील, रावणवध ही निर्मिती करावयाची आहे. बालगंधर्व यांना रुक्मिणी, सिंधू, शकुंतला, मेनका यांना प्रत्यक्षात आणावयाचे आहे. केसरबाईंना मियामल्हार, परज, काफी कानडा, कौशी कानडा हे राग आळवावयाचे आहेत. प्रत्येक कलाकाराचा हेतू आधी असा निश्चित झालेला असतो. आणि त्या हेतूच्या सिद्धीसाठी भिन्न रंग भिन्न शिळा, भिन्न भाव, भिन्न स्वरालाप यांची बांधणी तो करतो. म्हणजे ही बांधणी, हा रूपाकार, हा सन्निवेश साभिप्राय असतो. अर्थसंपन्न असतो असा अर्थसंपन्न सन्निवेश, असा साभिप्राय संधिबंध म्हणजेच कलाकृती.
 रचना म्हटली की तिचा कर्ता आणि त्याच्या मनातील हेतू हे आलेच. लोकांच्या मनात हे इतके निश्चित उसले आहे की, परमेश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी, या जगाला रचना आहे हा मुद्दा निर्णायक म्हणून पुढे मांडला जातो, आणि मानवाचे कल्याण, मानवाची उन्नती हा परमेश्वराच्या मनातील हेतू म्हणून सांगितला जातो. पुष्कळ वेळा रोगांच्या साथी, अवर्षण, दुष्काळ, भूकंप, महापूर, ज्वालामुखीचा स्फोट यांनी भयंकर प्राणहानी झाली की जगाला रचना नाही, त्याला कोणी कर्ता नाही, व त्याच्या मनात काही हेतूही नाही, असे आक्षेप घेतले जातात. कारण त्या हेतूशी हे सर्व विसंगत आहे असे दिसत असते. अशा वेळी संत, तत्त्ववेत्ते निरनिराळी स्पष्टीकरणे देऊन त्या विसंगतीचा परिहार करीत असतात. 'फुटे तरुवर उष्णकाळ मासी, बाळा दुग्धा केली सवेची उत्पत्ती'- हा तसाच एक प्रयत्न आहे. तात्पर्य हे की, मनुष्याला विसंगती अत्यंत अप्रिय आहे. सुसंगती हा त्याच्या जीवनाचा दिलासा आहे आधार आहे. ते त्याचे परम श्रेय आहे. त्यावर आघात झाला की तो अस्वस्थ होतो. सर्व हरवले असे त्याला वाटते.

 प्रत्येक कलाकार आपल्या कलाकृतीच्या द्वारे आपली अनुभूती प्रकट करीत असतो. साहित्यात या अनुभूतीचे माहात्म्य फारच आहे. पण नुसती अनुभूती असे न म्हणता, 'सार्थ साभिप्राय अनुभूती' अशी शब्दयोजना करावी, असे ॲबरकोंबी या साहित्यशास्त्रज्ञाचे सांगणे आहे. सार्थ अनुभूती आविष्कृत करील ते साहित्य, असे तो म्हणतो. येथे सार्थ म्हणजे काय ? एखादी घटना सार्थ केव्हा ठरते ? ती घटना, ती वस्तू भोवतालच्या इतर वस्तूंशी कोणत्या धाग्यांनी निगडित आहे व अखेर तिचा जीवनाशी संबंध काय आहे हे दाखविले की घटना, वस्तू व तिची अनुभूती सार्थ होते. ॲबरकोंबी म्हणतो की, माणसाचा स्वभावच असा आहे की, ज्या अनुभूतीत वस्तू वा घटना विस्कळित आहेत, तुटक्या आहेत, परस्परबद्ध नाहीत, तिचा त्याला तिटकारा आहे ज्या साहित्यकृतीत घटना अलग अलग घडताना दिसतात, एकीचा दुसरीशी मेळ जीत नसतो ती त्याला आवडत नाही. ज्या अनुभूतीत तर्कहीन बेबंद असे काही घडत नाही, प्रत्येक घटना, प्रसंग, व्यक्ती, तिचे उद्गार हे इतर सर्व घटनावस्तूंशी सुसंगत असतात, सुसंवादी असतात तिलाच सार्थ अनुभूती म्हणावे. संसारातील घटनांची संगती लावणे हा तर वाङ्मयाचा हेतू आहे. तेव्हा त्यातील प्रत्येक अवयव हा अवयवीशी संबद्ध असला पाहिजे. उपरे, उपटसुंभ असे काही त्यात असता कामा नये. त्याने हानी होते. संबद्ध रचना म्हणजेच वाङ्मय होय.

 येथपर्यंत विचार केला तो चित्र, शिल्प, नृत्य, संगीत, साहित्य या मानवनिर्मित सौंदर्याचा. त्याच्याचबरोबर निसर्गसौंदर्याचा विचार करणे अवश्य आहे. निसर्गात फुले, इंद्रधनुष्य, तारका, समुद्रातील शिंपले, फुलपाखराचे पंख इत्यादी अनेकविध सुंदर वस्तू आपण पाहतो. त्यांना आपण कलाकृती म्हणत नाही. आणि मानवनिर्मित सौंदर्य व निसर्गनिर्मित सौंदर्य यांतील भेद दाखविण्याच्या दृष्टीने ते योग्य आहे. पण मूलतः या द्विविध सौंदर्यात फरक आहे असे वाटत नाही. फूल, इंद्रधनुष्य, नक्षत्रे, फुलपाखरे या सर्व रचनाच आहेत. त्यांचे सौंदर्य उचित सन्निवेशामुळेच निर्माण झाले आहे. व त्यामुळे मनात जी भावना निर्माण होते ती सुसंगती, सुरेखा, सुबंध पाहून जागृत होणाऱ्या भावनेहून निराळी नाही. या कलेचा कर्ता निसर्ग किंवा परमेश्वर हा आहे, असे फार तर म्हणावे, पण ते मानवकृत कलेपासून तिचा भेद दर्शवण्यापुरतेच होय. त्या दोन कलांच्या सौंदर्याच्या मूलतत्त्वात काही भेद आहे, म्हणून नव्हे. माझ्या मते ज्या उद्देशाने हे विवेचन चालले आहे, त्याच्या दृष्टीने चित्र, शिल्प, संगीत, नृत्य, नाट्य यांच्या सौंदर्यात आणि फूल, इंद्रधनुष्य, नक्षत्रे यांच्या सौंदर्यात भेद नाही. दोन्ही प्रकारचे सौंदर्य रचनासौष्ठवातूनच निर्माण होते. वरील वस्तूंच्या सौंदर्यापेक्षा निसर्गात आणखी एक प्रकारचे सौंदर्य आहे. समुद्र, गहन अरण्ये, नदी, निर्झर, प्रपात, विशाल वृक्ष, निळे आकाश, उंच पर्वत यात अनुपम सौंदर्य आहे, हे खरे आहे. आणि हे रचनाजन्य सौंदर्य आहे असे म्हणता येणार नाही. काही अंशी यात रचना आहे. पण या वस्तू पाहून जी भावना निर्माण होते ती उदात्तता, भक्ती, विस्मय यांसारखी आहे. म्हणून तिचा विचार आपल्या कक्षेत येत नाही. एरवी राहिलेले सर्व निसर्गसौंदर्य हे रचनाजन्य असल्यामुळे सौंदर्यरस- विचारात तेही अभिप्रेत आहे असे समजावे.

 संबद्ध रचना, उचित सन्निवेश, सुश्लिष्ट संधिबंध यांच्याबद्दलची आवड, नवनिर्मितीची उत्कट इच्छा ही मानवजातीच्या सहजप्रवृत्तींपैकी एक प्रवृत्ती आहे, हे मागे सांगितलेच आहे. अर्थात ती मानवजातीच्या प्रारंभापासूनच मानवाच्या ठायी असणे हे ओघतःच येते. आज वन्य जमातींच्या संबंधी बरेच संशोधन चालू आहे. त्यातून असे दिसून आले आहे की, मानव गुहेत रहाण्याइतका वन्य अवस्थेत होता तेव्हाही दगडावर रेघोट्या मारून किंवा कोरणी करून काही चित्रे काढावी ही हौस त्याला होती. त्याचप्रमाणे त्या रानटी अवस्थेतही फेर धरून नृत्य करावे, काही तालबद्ध हालचाली कराव्या आणि तोंडाने काही गाणी म्हणत त्याच्या ठेक्यावर पावले टाकावी ही पण अभिरुची त्याला होती. तेव्हा कलेची- म्हणजेच सुबद्ध रचनेची- अभिरुची प्रारंभापासूनच मानवाला आहे हे निर्विवाद होय. एल्. ॲडम यांच्या 'प्रिमिटिव्ह आर्ट' या पुस्तकाला जोडलेल्या प्रस्तावनेत प्रस्तावनाकार डॉ. आर. आर. मॅरेट म्हणतात, 'कला ही मानवी जीवनाशी अखंड संबद्ध आहे. प्रारंभीच्या वन्य अवस्थेत ती नव्हती आणि पुढे केव्हा तरी निर्माण झाली, असे म्हणता येणार नाही. त्या काळी त्या कलेचे स्वरूप अगदी प्राथमिक असेल, ती अविकसित अवस्थेत असेल, पण तिची रुची म्हणजेच सौंदर्याभिरुची त्या काळीही बहुसंख्यांना होती हे निश्चित.'

 पण सौंदर्यभावना ही राग, द्वेष, भीती, प्रेम या भावनांहून अगदी निराळी, स्वतंत्र भावना आहे, हे सिद्ध करण्यासाठी मर्ढेकर असा मुद्दा पुढे मांडतात की, स्वसंरक्षण व वंशवर्धन यांशी रागद्वेषादी भावनांचा घनिष्ठ संबंध आहे, तसा सौंदर्यभावनेचा नाही. आणि त्यामुळे निसर्गाने त्या भावना जशा अखिल मानवजातीला दिल्या आहेत, तशी सौंदर्यभावना दिलेली नाहीं. ती अगदी अल्पसंख्याकांच्या ठायी दिसते. जीवशास्त्रीय दृष्ट्या रागद्वेषादी भावनांप्रमाणे ती महत्त्वाची असती, तर निसर्गाने तिचे वरदान सर्वांना दिले असते. पण तसे ते दिलेले नाही. भीती, प्रेम या भावना नष्ट झाल्या तर मानववंश टिकूच शकणार नाही. पण सौंदर्यभावना नष्ट झाली तर स्वसंरक्षण व वंशवर्धन यांत मुळीच अडचण येणार नाही. हा भेद स्पष्ट असण्यामुळे सौंदर्यभावना ही रागद्वेषादी भावनांहून अगदी निराळी आहे, असे निश्चित म्हणता येते.
 मर्ढेकरांचा हा युक्तिवाद त्यांच्या इतर- साहित्यविषयक सिद्धान्तातील युक्तिवादाप्रमाणेच भ्रांत व प्रामादिक आहे. सौंदर्याभिरुची ही फार अल्पसंख्याकांच्या ठायीच असते, हे मत आज वन्य जातींचा कोणीही अभ्यासक मान्य करणार नाही. वर डॉ मॅरेट यांचे मत दिलेच आहे. पण अत्यंत प्राचीन काळच्या जमातीचे जे अवशेष आज उत्खननात सापडतात त्यांत दिसून येणारी जी चित्र, नृत्य, संगीत इत्यादी कलांची प्रमाणे, त्यावरून याविषयी शंका रहातच नाही. त्या कला त्या काळी अगदी प्राथमिक अवस्थेत होत्या हे खरे. आणि त्यामुळे त्या जमातींची सौंदर्य भावनाही फार ढोबळ, अविकसित स्वरूपाची होती हेही खरे, पण शृंगार, वात्सल्य, भक्ती, अशा सर्वच भावना त्या काळी प्राथमिक बोजड अवस्थेत होत्या. त्या अवस्थेत त्यांना भावना म्हणण्यासही पुष्कळ अभ्यासक तयार नसतात. त्या केवळ वासना होत्या. पण रानटी जमातीतही केव्हा केव्हा त्यांना थोडे वरचे रूप प्राप्त होत असे. तोच प्रकार सौंदर्यभावनेचा आहे. दुसरे असे की, सौंदर्यभावनेच्या मुळाशी असलेली जी रचनाप्रवृत्ती ती मानवाच्या सहजप्रवृत्तीपैकीच एक असून, स्वसंरक्षण व वंशवर्धन यांशी तिचाही घनिष्ठ संबंध आहे हे आरंभी दाखविले आहे. घर, कातडी, धनुष्यबाण, फरशी, दगडी भांडी, पाण्यात तरणारा ओंडका अशी काही रचना केल्यावाचून मानव जगूच शकला नसता. पक्षी घरटी बांधतात, कोळी जाळी विणतो, मुंग्या वारुळामध्ये थोडी गृहरचना करतात. यावरून पशुपक्ष्यांतही, कृमिकीटकांतही रचनाप्रवृत्ती असते असे दिसून येते. मग मानवप्राण्यात ती प्रारंभीच्या काळी असेल यात नवल काय ? या प्रवृत्तीतून मानवाने प्रारंभी प्रारंभी निर्माण केलेल्या कृती जीवनाला, वंशसातत्याला अत्यंत उपयुक्त अशाच होत्या. पुढे पुढे त्यातील उपयुक्ततेचा अंश जसाजसा कमी होत गेला, केवळ आनंद, मनोविनोदन एवढेच त्यांचे कार्य राहिले, तेव्हा त्या कृतींना कलेची पदवी प्राप्त झाली आणि त्या कृती पाहून जी भावना जागृत होऊ लागली तिला सौंदर्य भावना असे अभिधान प्राप्त झाले. पण हे सर्वच भावनांचे आहे. शृंगार, वीर, करुण, वत्सल, भक्ती या भावना आरंभी केवळ जीवशास्त्रीय दृष्ट्या महत्त्वाच्या होत्या. त्यांना उन्नत रूप मिळत गेले, उपयुक्ततेचा त्यांशी असलेला प्रत्यक्ष संबंध दुरावत चालला, तेव्हाच त्यांना वाङ्मयात स्थान मिळाले व 'रस' पदवी प्राप्त झाली. तेव्हा या भावनांच्या बुडांशी असलेल्या सहजप्रवृत्ती जितक्या सार्वत्रिक होत्या व आहेत तितकीच सौंदर्य भावनेच्या बुडाशी असलेली रचनाप्रवृत्ती सार्वत्रिक होती व आहे.

 डॉ. वाटवे यांनी कामवासना अतिशय उन्नत अवस्थेला गेली म्हणजे मगच तिला शृंगाररस असे म्हणतात, हा विचार आपल्या 'रसविमर्श' या ग्रंथात सविस्तर मांडला आहे. ते म्हणतात, 'शृंगाराच्या प्राथमिक अवस्थेत केवळ शारीरिक क्रियेलाच महत्त्व असते. या अवस्थेत विचारशून्यता असते व मानसिकता कमी असते. ही प्राथमिक अवस्था शृंगाररसाला अनुकूल नाही. कामभावना परिणत झाली म्हणजे तिच्यामध्ये कोमल भावनेचा प्रादुर्भाव होतो. सुसंस्कृत माणसांत तर कामभावना अत्यंत संमिश्र स्वरूपाची व गुंतागुंतीची होते. ही भावना संमिश्र असून त्यामुळेच ती सर्व भावनांत अतिशय प्रबळ असते, असे स्पेन्सरने म्हटले आहे. या कोमल भावनेतच आत्मस्वातंत्र्य, स्वयंनिर्णय व सौंदर्यभावना इत्यादी अनेक भावनांची भर पडून तिचे मूळचे सहजप्रवृत्तीचे रूप कमी कमी होत जाऊन ती उन्नत होते. सुसंस्कृत समाजात माणूस वाटेल त्या स्त्रीचा स्वीकार न करता तिची निवड करतो. हीच प्रवृत्ती पुढे वाढत जाऊन स्त्रीच्या ठिकाणी सौंदर्याचा किंवा ध्येयभूत गोष्टींचा साक्षात्कार आपणास व्हावा, अशी भावना पुरुषहृदयात उदित होते हॅवेलाक एलिसच्या मते मानवी जीवनास कामप्रवृत्तीमुळेच सौंदर्य व उदात्तता प्राप्त होते. एतावता, शृंगारभावना ही क्रीडाप्रवृत्तीची, सौंदर्याची व सदभिरुचीची पराकाष्ठा आहे.' ('रस विमर्श '- पृ. ३०९, १०.) हास्यरसाचे असेच आहे. वन्य जमातीतही हास्यविनोद आहे. पण अत्यंत सामान्य व ढोबळ विसंगतीच त्यांना जाणवते. श्रेष्ठ विनोदाचे आकलन करण्याची पात्रता त्यांना नसते. श्रीरामचंद्रांनी शूर्पणखेला लक्ष्मणाकडे पाठविले व तिचे नाक, कान कापून टाक असे त्याला सांगितले. पण, 'मी धाकटा भाऊ आहे, राम मोठा आहे, तू त्याचीच बायको शोभशील, त्याला एक बायको आहे, पण तो दुसरी करील.' अशी लक्ष्मण तिची चेष्टा करू लागला. तेव्हा श्रीरामचंद्र म्हणाले, 'क्रूरैरनार्यैः सौमित्र परिहासः कथंचन ।' 'लक्ष्मणा, क्रूर, अनार्य, रानटी लोकांशी विनोद कसला करतोस ? त्यांना काय समजणार आहे ?' वीररसाचे असेच आहे. देशात रोज अनेक खून पडत असतात, लोक दरोडे घालीत असतात, त्यात क्रोध, संताप, त्वेष या भावनांचा खेळ चालूच असतो. पण अन्यायाचे परिमार्जन, दीनांचे संरक्षण, राष्ट्रीय अपमानाचा सूड असे उदात्त ध्येय ज्या क्रोधामागे नाही, त्यातून रस पदवीला प्राप्त होईल अशी वीरभावना निर्माण होत नाही. शृंगार, हास्य, वीर यांच्याविषयीचा हा विचार सर्वच रसांच्या बाबतीत खरा आहे. आणि नृत्य, शिल्प, चित्र, संगीत या कलांच्या बाबतीतही तो खरा आहे. बाह्यतः रूप तेच असले तरी तेवढ्यामुळे कोणतीही रचना कला पदवीला पोचेल असे नाही.

 रोहिणी भाटे यांनी 'महाराष्ट्रजीवन' या ग्रंथात नृत्यकलेचे विवेचन करताना असेच मत मांडले आहे. महाराष्ट्रातील भिल्ल, कातकरी, वारली, गोंड, ठाकर इत्यादी आदिवासी जमातींत शेतां अंगणातून रानावनातून नृत्य रुणझुणते. पण कला म्हटल्यावर जी एक रचना, जो जाणीवपूर्वक आत्माविष्कार, पूर्वानुभूत सौंदर्याचा जो नवा आकार आपल्या मनात अभिप्रेत असतो त्या दर्जाची ही कलादृश्ये नसल्याने या पद्धतीच्या नृत्याला कला ही पदवी प्राप्त झालेली नसते. लोकनृत्य किंवा जानपद नृत्य याची पायरी यापुढची आहे. पण याही नृत्यात वैयक्तिक आत्माविष्काराची प्रेरणा दिसून येत नसल्यामुळे त्याला कला म्हणून संबोधणे सार्थ वाटत नाही. आनंदप्रदान, आत्मप्रकटीकरण व नवनिर्मिती हे प्रयोजन स्पष्टपणे दिसल्यावाचून कोणतेही नृत्य कलाप्रतिष्ठा पावणार नाही. संगीत, चित्र या कलांचे रसज्ञ ग ह. रानडे, नी. म. केळकर यांनी आपल्या विवेचनात हाच अभिप्राय व्यक्त केला आहे. संगीत म्हणजे स्वरतालांचा नियमबद्ध, सुरेल मिलाफ व त्याद्वारा भावनाविष्कार होय. संगीत म्हणजे संयम, शिस्त, प्रतिभाविलास आणि आनंद! सामुदायिक खेळ, प्रार्थना, कवायत यांसाठी ही गाणी आहेत. या सर्व संगीतास ताल व स्वर यांचे अधिष्ठान असतेच. सर्व संगीतास तेच पायाभूत असते. या लोकसंगीताहून शास्त्रीय संगीत वेगळे आहे असे नव्हे, तर तो त्याचा परिपाक व परमोत्कर्ष होय. आणि उच्च पातळीवर चालणारे संगीत तेच शास्त्रीय संगीत होय. संगीताकडे पाहण्याची महाराष्ट्रीय कलावंतांची दृष्टी पेशापेक्षा एक विद्या किंबहुना पाचवा वेदच अशा उच्च प्रकारची होती, असा भावार्थ रानडे प्रकट करतात. तर केळकर म्हणतात की, 'अलंकारिक रेषा, अलंकारिक मांडणी शिकवून, चित्ररचनेचे जीवितकार्य जे शोभादायक आकार निर्मिण्याचे ते करण्यास विद्यार्थी समर्थ व्हावा.' 'चित्रात रसभावांचा उत्कर्ष साधला तरच चित्र नामांकित होऊ शकते.'

 या विवेचनाचा इत्यर्थ असा की, प्राथमिक अवस्थेत पुष्कळ वेळा कलेचा बाह्याकार हा परिणत अवस्थेतल्यासारखा असला, दोन्ही अवस्थांत क्रिया तीच असली, तरी त्या कृतीला कला म्हणता येणार नाही. तिचा साचेबंदपणा कमी होत गेला, तिच्यातून कलाकाराचा आत्माविष्कार होऊ लागला, रसभाव प्रकट होऊ लागले, मानवाची कल्पनाशक्ती, बुद्धी, प्रज्ञा आणि त्याचा आत्मा या सर्वांना त्या कृतीतून आवाहन होऊ लागले, आणि अखेर तिच्यापासून अनिर्वचनीय, ब्रह्मास्वादसहोदर असा आनंद लाभू लागला, तर त्या कृतीला कलेची प्रतिष्ठा येईल. पायरी पायरीने कलेची अशी परिणती होत असताना तिच्यातील जीवनोपयोगित्वाचा भाग कमी कमी होत जातो, स्वसंरक्षण व वंशसातल्य यांसाठीच त्या मूलभूत प्रवृत्ती निर्माण झाल्या असल्या तरी परिणत अवस्थेत ते हेतु लोपतात, आणि विशुद्ध आनंद हाच एकमेव हेतू त्या अवस्थेत शिल्लक रहातो. वर ज्या डॉक्टर मॅरेट यांचा उल्लेख केला आहे त्यांनी म्हटले आहे की, 'जीवनातली हो विनोदने वा रामणीयके कोणत्याही दृष्टीने उपयुक्ततेच्या सदरात पडत नाहीत. जीवनशास्त्राच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचे असे जे सातत्यमूल्य किंवा मृत्युंजयमूल्य ते त्यांना नाही. किंवा सत्ता, संपत्ती ही व्यावहारिक मूल्येही नाहीत. तरी कुंद हवेच्या दिवशी सूर्यकिरण दिसावा त्याप्रमाणे क्षणभर जरी एखादा आकृतिबंध, एखादी सुरेखा दिसली तरी जीवनातल्या उच्च मूल्यांची प्रतीती येऊन त्याचे भविष्य उजळते. आणि त्यापासून विशुद्ध आनंदाची प्राप्ती होऊन वासनांचे उदात्तीकरण होते व आत्मा संपन्न होतो.'

 सर्व कलांचा आत्मा, त्यांचा समानधर्म, त्यांच्या सौंदर्याचे रहस्य हे रचनेत आहे, सन्निवेशात आहे, असे वर अनेक ठिकाणी म्हटले आहे. ही रचना सार्थ असते, साभिप्राय असते, तिचे अंतिम उद्दिष्ट प्रथमपासूनच ठरलेले असते, असेही तेथे सांगितले आहे. 'साभिप्राय रचना, सार्थ आकृतिबंध' असा शब्द क्लाइव्ह बेल या विख्यात कलाकोविदानेही वापरला आहे. 'आर्ट' या आपल्या पुस्तकात 'सिग्निफिकंट फॉर्म'- सार्थ बंध, हे सर्वं दृश्य कलांचे लक्षण, तोच त्यांचा समानधर्म, असे त्याने पहिल्याच प्रकरणात म्हटले आहे. पण सार्थ बंध, सार्थ रेखा या शब्दाची त्याची विवक्षा, या शब्दाचा त्याच्या मनातील अर्थ अगदी वेगळा आहे. म्हणून त्याचे स्पष्टीकरण करणे अवश्य वाटते. पहिली गोष्ट म्हणजे क्लाइव्ह बेल फक्त दृश्य कलांचा- व्हिजुअल आर्टस् चा- विचार करतो. चित्र, शिल्प, वास्तू, नक्षी असलेली पात्रे, विणकाम या त्याच्या मते दृश्य कला आहेत. संस्कृत साहित्यशास्त्र नाटक हे दृश्यकाव्य, अर्थातच दृश्य कला आहे, असे मानते. पण क्लाइव्ह बेल याला ते मान्य नाही असे दिसते. नृत्य आणि संगीत या विशुद्ध कला आहेत असे त्याने एके ठिकाणी म्हटले आहे, पण मूळ विवेचन करताना त्यांचा तो अंतर्भाव करीत नाही. चित्र, शिल्प इत्यादी वर निर्देशिलेल्या कलांचाच फक्त तो विचार करतो.

 पण सार्थ बंध, साभिप्राय रेखाकार हे लक्षण सांगताना मी जी विवक्षा मानली आहे तीहून त्याची विवक्षा निराळी आहे. माझ्या मते टिळकांचे चित्र किंवा त्यांचा पुतळा या रचना, हे रेखाकार सार्थ केव्हा ठरतील? टिळकांचे चारित्र्य, त्यांचे धैर्य, त्यांची अतुल प्रज्ञा, त्यांची राष्ट्रभक्ती या सर्वांची प्रतीती चित्रात येईल तेव्हा. शिवाय टिळकांच्या रूपाचे यथार्थ दर्शन त्या चित्रात किंवा पुतळयात झाले पाहिजे. वेरूळ- अजंठ्याच्या शिल्पात शिवपार्वती- विवाह, रावणवध या कथा मूर्त केल्या आहेत. तेव्हा त्या शिल्पात विवाहसमयीच्या भावना, वधसमयीच्या भावना, त्या वेळची पार्श्वभूमी, त्यातील व्यक्तींचे उभे रहाणे, बसणे हे सर्व दृष्टिगोचर झाले पाहिजे. विवाह किंवा वध व्यक्त करणे हा अभिप्राय कलाकाराच्या चित्तात असतो. तो रेखारंगातून त्याने व्यक्त केला की तो सार्थ बंध झाला. मागे शंकर कुटीच्या नृत्याचे वर्णन दिले आहे. बळी, वामन, भस्मासुर, मोहिनी यांना काही प्रसंगांनी मूर्त करावे असा नर्तकाचा हेतू होता. सर्व हावभावां तून तो सिद्ध झाला की रचना सार्थ झाली. त्या व्यक्तीची रूपे अनुरूप असली पाहिजेत, हालचाली अनुरूप असल्या पाहिजेत व त्या त्या प्रसंगीच्या शृंगार, भीती, वीर, इत्यादी भावना नृत्यातून प्रकट झाल्या पाहिजेत. यालाच मी रचना म्हणतो. सार्थ हा शब्द वापरण्याची जरूरच मला वाटत नाही. कारण रचना या शब्दात तो भावार्थ आहेच. नाही तर रचना म्हणजे केवळ एक ढीग किंवा समूह, किंवा रेघोट्या असे होईल. त्यांना 'रचना' शब्द लावणे चूकच आहे. पण क्लाइव्ह बेलने 'सिग्निफिकंट फॉर्म' असा शब्द वापरला आहे. म्हणून त्याच्याविषयी विवेचन करताना 'सार्थ रचना' असा शब्दप्रयोग मी केला आहे.
 पण क्लाइव्ह बेल याला माझा विवक्षित अर्थ मुळीच मंजूर नाही. यथार्थ दर्शनाला त्याच्या मते महत्त्व नाही. चित्रात टिळक हे टिळकांसारखेच दिसले पाहिजेत असा त्याचा आग्रह नाही. चित्र, शिल्प यातून शृंगार, वीर, करुण, इत्यादी भावना व्यक्त व्हाव्या ही अपेक्षा त्याच्या मते अभिरुचीच्या उणिवेची द्योतक आहे. सर्व कौशल्य रेषा व रंग यांवर लक्ष केंद्रित करण्यावर आहे. त्या आणि फक्त त्याच पाहून जी भावना जागृत होते ती सौंदर्यभावना ! ज्या चित्रकाराला रेषा व रंग यांतून अशी भावना जागृत करता येत नाही तो शृंगार- वीर- करुण- वत्सल इत्यादी नित्याच्या भावना जागृत करतो. एखादे फाशीचे चित्र काढताना भीती, दया या भावना हलक्या दर्जाचा चित्रकार जागृत करील. व गौण अभिरुचीच्या लोकांनाच त्यात आनंद वाटेल. या नित्याच्या भावना अनुभवण्यासाठी कलेचा उपयोग करणे म्हणजे दुर्बिणीचा उपयोग वर्तमानपत्रे वाचण्यासाठी करण्यासारखे आहे. ज्यांना सौंदर्यभावनेची अभिरुची नाही, ते लोक चित्राचा आठव त्याच्या विषयावरून करतात. ज्यांना तो आहे त्यांना चित्राचा विषय काय आहे याची कल्पनाही नसते. मग ते काय पहातात? रेषा व रंग ! नित्याच्या जीवनातला कोणताही भाव, कोणताही रस, कोणताही अर्थ कलाकृतींतून प्रकट करणे हे कलेच्या हीनतेचे व हीन अभिरुचीचे द्योतक आहे, असे बेल म्हणतो.
 यावर प्रश्न असा येतो की, रेषा व रंग यांकडे पहाताना कोणत्या अपेक्षेने पहावयाचे? त्यातून 'सिग्निफिकंट फॉर्म' निर्माण झाला, असे केव्हा मानावयाचे? कोणत्याही रेघोट्या किंवा कोणतेही एकत्र फासलेले चार रंग म्हणजे कला नव्हे. मग रेषा व रंग यांना 'कला' पदवी केव्हा येते? सिग्निफिकंट फॉर्मचा अर्थ काय? क्लाइव्ह बेलने अन्योन्याश्रय करून याचे उत्तर दिले आहे. याचाच अर्थ असा की, त्याच्याजवळ उत्तर नाही. ज्या रंगरेषा संगतीमुळे सौंदर्यभावना जागृत होते त्या संगतीला 'सिग्निफिकंट फॉर्म' म्हणावयाचे. आणि सौंदर्यभावना म्हणजे काय ? तर 'सिग्निफिकंट फॉर्म' मुळे जी जागृत होईल ती भावना ही सौंदर्यभावना ! तेव्हा क्लाइव्ह बेल याची सौंदर्यभावना हे एक गूढ आहे, बुद्धीच्या अतीत असे काही आहे, अनाकलनीय आहे, असे म्हणून तिचा नाद सोडून दिला पाहिजे.
 संगीतातून सौंदर्य निर्माण होते. ते सौंदर्य केवळ स्वररचनेचे आहे. असे काही रसिकांचे मत आहे. शृंगार-करुणादी भावना संगीताने जागृत होतात हे खरे; पण त्यांच्या मते संगीताचे सौंदर्य निश्चित करण्याचा तो निकष नाही. हे रसज्ञ रसभावाचे महत्त्व मानीत नसले तरी स्वररचनेचे सौंदर्य काय ते ते निश्चितपणे, स्वतंत्रपणे, अन्योन्याश्रय न करता सांगतात. प्राध्यापक अरविंद मंगरूळकर यांनी केसरबाईच्या गायनाचे केलेले वर्णन या दृष्टीने पहाण्याजोगे आहे. 'त्यांच्या गायनात आलाप, तान, बोलतान अशा सर्व ठिकाणी कळसाच्या जागा विखुरलेल्या असतात. तानेच्या व बोलतानेच्या अंती त्यांच्या समेच्या जागा रेखीवपणे येतात. दर आवर्तनाला केसरबाई स्वररचना तरी किंवा लयप्रकार तरी पालटीत असतात. 'परज' राग म्हणताना 'बसंत', 'सोहनी' व 'कलंगडा' या तीन रागांपासून त्याला त्यांनी कौशल्याने संभाळीत नेले.'- या वर्णनात रचनेचे स्वतंत्र निकष प्रा. मंगरूळकरांनी लावले आहेत असे स्पष्ट दिसते. आणि सर्वात मोठा निकष म्हणजे प्रत्येक रागाची स्वररचना काय ते निश्चित ठरलेले आहे, हा होय. या निकषाप्रमाणे गाणे झाले की, त्यामुळे ब्रह्मस्वादसहोदर असा आनंद प्राप्त होतो, असे ते म्हणतात. उत्तम गायन कोणते, तर ब्रह्मानंद देईल ते; व ब्रह्मानंद कोणता, तर उत्तम गाण्यापासून होईल तो, असा परस्परावलंब त्यांनी केलेला नाही. तो क्लाइव्ह बेल याने केला आहे. तेव्हा त्याची सौंदर्यभावना त्याची त्यालाच कळते असे म्हणून किंवा त्याला तरी कळते की नाही, अशी शंका प्रकट करून स्वस्थ बसावे हे बरे. तोच म्हणतो की, ही सौंदर्याभिरुची दुर्मिळ- अत्यंत दुर्मिळ आहे. उलट संगीताची अभिरुची लक्षावधी लोकांना असते, हे प्रत्यक्षात आपण पहातो. तेव्हा लाखात एखाद्यालाच लाभलेल्या अभिरुचीचा व तिचा विषय जो सौंदर्यभावना त्याचा विचार शास्त्रात कसा करता येईल ?

 सौंदर्य हा शृंगार- वीर- करुण- वत्सल- भक्ती यांसारखा एक स्वतंत्र रस आहे, असा सिद्धान्त मला मांडायचा आहे, असे आरंभी मी सांगितले आहे. त्याची ही पूर्वतयारी झाली. आता त्या सिद्धान्ताची मांडणी करून हे विवेचन संपवितो. रचना करावी, सुसंगती निर्माण करावी, सुरेखाकार पहावा, ही मानवाची उपजत प्रवृत्ती या रसाच्या बुडाशी आहे. आरंभीच्या अवस्थेत त्याने केलेल्या धनुष्यबाण, झोपडी, जाळे, शेतीची आयुधे या सर्व रचना बोजड व बव्हंशी स्वसंरक्षण व वंशसातत्य यांसाठीच उपयुक्त अशा होत्या. त्याही अवस्थेत काही रेखाकार, काही स्वररचना, काही पदन्यास उपयुक्ततेच्या पलिकडच्या कक्षेत जातील असे तो करीत असे. पण कला म्हणण्याजोगे सौंदर्य त्यांत नव्हते. त्या रचना होत्या, पण त्या प्राथमिक अवस्थेत होत्या. पुढे त्याची प्रज्ञा विकसत चालली, निसर्गावर त्याचे प्रभुत्व प्रस्थापित झाले, तसतशा त्यांच्या रचना जास्त सूक्ष्म तरल होऊन प्रमाणबद्धता, लय, तोल, अंगांगीभावात्मक एकात्मता, यथार्थ दर्शन, भावनाभिव्यंजन व आत्माविष्कार या गुणांनी संपन्न होऊन त्यांना कलास्वरूप येऊ लागले. चित्र, शिल्प, वास्तू, नृत्य, संगीत, काव्य, नाट्य-- या सर्व कला अशाच मार्गांनी विकसत जाऊन त्यांना मनोहर रूप प्राप्त झाले. त्या कलाकृती पहाताना त्यातल्या सुसंगतीच्या, उचित संन्निवेशाच्या दर्शनाने मनुष्याच्या चित्तात जी भावना निर्माण होऊ लागली तीच सौंदर्यभावना तीच हळूहळ उत्कट होऊन पूर्ण आस्वाद्यमान होते व 'रस'पदवी पावते. या कलाकृतीत स्वभाव- लेखन, निवेदनशैली, निसर्गचित्रे इत्यादी जे गुण असतात ते सौंदर्याला कारणीभूत होतातच. पण या सर्वांचा सुसंवाद नसेल, त्यांत अंगांगीभावात्मक एकात्मता नसेल, सुश्लिष्ट संधिबंध नसेल तर तो आनंद उत्कट होणार नाही. इतकेच नव्हे, तर सुसंगतीच्या अभावी सर्व आनंदावर कधी विरजणही पडेल. तेव्हा त्या घटकांपासून होणारा जो आनंद त्याहून या सुसंवादापासून मिळणारा आनंद अगदी वेगळा आहे. त्यालाच सौंदर्यानंद असे मी म्हणतो. आणि तो. देणारा तो सौंदर्य रस.
 एखाद्या रसाचे स्वरूप निश्चित करावयाचे म्हणजे स्थायीभाव, विभाव, अनुभाव, उद्दीपनविभाव या शास्त्रीय परिभाषेत त्याची मांडणी करणे अवश्य आहे, असे साहित्यशास्त्रज्ञ सांगतात. त्यांचा हा आग्रह मला सयुक्तिक वाटतो. म्हणून सौंदर्यरसाची तशी मांडणी करून हे विवेचन संपवितो.
 समागमाची उत्कट इच्छा हा शृंगाराचा, समर्थाला शरण जावे हा भक्तीचा, बालकाला आश्रय द्यावा ही उत्कट इच्छा हा वत्सलरसाचा, त्याचप्रमाणे रचना, नवनिर्मिती करावी, सुसंगती पहावी ही उत्कट इच्छा हा सौंदर्य रसाचा स्थायीभाव होय. वेरूळ, अजंठा, खजुराहो येथील शिल्प; रविवर्मा, रवींद्रनाथ यांची चित्रे; शिवछत्रपती, महात्माजी यांचे पुतळे; तानसेन, केसरबाई यांचे गायन; कालीदास, शेक्सपीयर यांची नाटके; 'रामायण', 'महाभारत', 'रघुवंश' ही काव्ये, गोपीकृष्ण, मेनका, रजनी यांचे नृत्य, हे सर्व या रसाचे आलंबनविभाव होत. या कलाकृती पहाताना डोळे विस्फारणे, धन्यतेचे उद्गार काढणे, अवाक् होणे हे अनुभाव आणि या कलाकृतींची, त्यातील कौशल्याची, त्यातील सौंदर्याची वर्णने हे उद्दीपन- विभाव होत. अशा तऱ्हेने जुन्या शास्त्रीय अवस्थेच्या दृष्टीने पाहिले तरी सौंदर्याचे रसस्वरूप सिद्ध होते.
 रसव्यवस्था आता जुनी झाली, तिचे कुंपण नव्या साहित्यातील नव्या प्रवृत्तींना घालू नये, असा एक आक्षेप मागे क्रान्तिरसासंबंधी चर्चा झाली तेव्हा उद्भावित करण्यात आला होता. भरताने आखून दिलेल्या व्यवस्थेत आंधळेपणाने सर्व साहित्य बसवू नये, रसव्यवस्थेला कर्मकांडाचे रूप देऊ नये. एवढ्याच अर्थाने हे म्हणणे सयुक्तिक ठरेल. पण रसव्यवस्थाच जुनी झाली, तेव्हा ती त्याज्य मानावी, हे म्हणणे श्वासोच्छ्वासव्यवस्था जुनी झाली म्हणून ती टाकून द्यावी, या म्हणण्यासारखे आहे. शृंगार, वीर, करुण, भक्ती, सौंदर्य या मानवी मनातल्या शाश्वत भावना आहेत. त्यांचा आविष्कार कलाकृतीत जगाच्या प्रारंभापासून होत आला आहे आणि जगाच्या अंतापर्यंत तो होत राहील. त्याची व्यवस्था म्हणजे रसव्यवस्था. या व्यवस्थेत नव्या नव्या चिंतनामुळे, संशोधनामुळे परिवर्तने होत राहतील, रहावी, हे म्हणणे सयुक्तिक आहे. पण नव्या युगात रसव्यवस्थाच त्याज्य मानावी हे म्हणणे युक्त नाही. कारण मानवी जीवनाशी रस हे श्वासोच्छ्वासाइतकेच निगडित आहेत.
 तेव्हा कलाशास्त्राच्या दृष्टीनें रसचर्चा ही नित्य होणे हे अत्यंत इष्ट आहे. म्हणूनच सौंदर्य हा स्वतंत्र रस मानला पाहिजे असे येथवर आग्रहाने प्रतिपादिले आहे हा रस इतर रसांच्या तुलनेने सर्वव्यापी आहे. तो जिच्या ठायी नाही अशी कलाकृती असणेच शक्य नाही. कारण रचना हा सर्व कलांचा प्राण आहे. आणि रचनेतूनच सौंदर्यरसाची प्रतीती होते. सौंदर्यरसाच्या या सर्वव्यापित्वामुळेच तो स्वतंत्र रस मानण्याची जरूर नाही, असा एक पक्ष मांडण्यात येतो. शृंगार, वीर, करुण, भक्ती इत्यादी रसांची निर्मिती सुरेख रचनेवाचून होणेच शक्य नाही. तेव्हा प्रत्येक रसाच्या मुळाशी सौंदर्यरस गृहीत धरलेलाच आहे. म्हणून त्याची निराळी व्यवस्था नको, असे कोणीं म्हणतात. पण हे म्हणणे युक्त नाही. एक तर प्रत्येक कलाकृतीत दुसरा कोठला तरी रस असतोच असे नाही. दक्षिण हिंदुस्थानातील मीनाक्षी, श्रीरंग यांची मंदिरे, उत्तरेतील ताजमहाल, कोणार्क, सांची यांसारखे स्तूप, इजिप्तमधील पिरॅमिड, यूरोपातील चर्चेस यांमध्ये केवळ सौंदर्य हाच रस आहे. फुले, इंद्रधनू, नक्षत्रे इत्यादी निसर्गकलाकृतीत त्यावाचून अन्य रस नाही. पुष्कळ वेळा संगीत व नृत्य यांना विशिष्ट विषय नसतो. केवळ रागदारी आणि केवळ पदन्यास व अंगविक्षेप असेच त्यांचे रूप असते. अशा वेळी त्यात सौंदर्य हाच एकमेव रस असतो. पण ते कसेही असले तरी सुसंगतीविषयीची मानवी मनातली जी उत्कट इच्छा, तिचा जो आविष्कार अखंड होत असतो त्याला स्वतंत्र स्थान न देणे हे अशास्त्रीय ठरेल विसंगतीतून निर्माण होणाऱ्या हास्यरसाला 'रस' पदवी दिल्यानंतर तिच्यापेक्षा शतपटीने मानवी जीवनाला व्यापून राहिलेल्या सुसंगतीच्या प्रेमाची दखल शास्त्रज्ञांनी घेतलीच पाहिजे. मागे सांगितल्याप्रमाणे सुसंगती हा सर्व मानवी संस्कृतीचा पाया आहे. तिला 'रस' पदवी दिल्याने मानवी जीवन निश्चितपणे जास्त समृद्ध होईल.