Jump to content

हिंदुसमाज संघटना आणि विघटना/हिंदुसमाजाचे भवितव्य

विकिस्रोत कडून






हिंदुसमाजाचे भवितव्य

 हिंदुसमाजाच्या संघटनेचा व विघटनेचा वेदकाळापासूनचा इतिहास आपण पाहात आहो. या इतिहासाचे दोन कालखंड आतापर्यंत पाहून झाले. इ. स. १००० पर्यंतचा पहिला कालखंड होय. या कालखंडात बुद्धिनिष्ठा, प्रवृत्तिवाद, प्रयत्नवाद, स्वराज्य व स्वधर्म यांच्या अभेद इ. समाजाला उपकारक अशा धर्मतत्त्वांचा प्रभाव असल्यामुळे हिंदुसमाज संघटित व म्हणूनच बलशाली व वैभवसंपन्न होऊ शकला. या कालाच्या अखेरीस हिंदुधर्माला अत्यंत विकृत रूप आले. शब्दप्रामाण्य, विषमता, निवृत्ती, दैववाद अशी समाजघातक तत्त्वे धर्मशास्त्रज्ञांनी उपदेशिली व समाजाने ती अंगीकारिली. त्यामुळे हा समाज विघटित झाला व म्हणूनच तो स्वसंरक्षणाला असमर्थ होऊन त्याला दैन्य, दारिद्र्य, पारतंत्र्य, या नरकात दीर्घकाल पिचत राहावे लागले. इ. स. १००० ते १८५० हा तो पारतंत्र्याचा दुसरा कालखंड होय. हा काळ पारतंत्र्याचा असला तरी या तमोयुगातही येथल्या काही लोकांनी संघटित होऊन आपल्या पराक्रमाने मधून- मधून स्वातंत्र्यसूर्याचे दर्शन भारताला घडविले. रजपूत, कर्नाटकी, मराठे व शीख हे ते लोक होत. या लोकांच्या धुरीणांनी हिंदुधर्माला आलेली विकृती काही अंशी तरी नष्ट केली, काही प्रमाणात तरी धर्मक्रान्ती केली, म्हणूनच यांना मुस्लीम आक्रमणाचा निःपात करता आला. मराठे या दृष्टीने जवळजवळ पूर्ण यशस्वी झाले होते, अवनीमंडल निर्यवन करण्यात त्यांना बह्वंशी यश आले होते; पण याच काळात पाश्चात्त्यांचे आक्रमण या भूमीवर चालू होते. पोर्तुगीज, डच, फ्रेंच व इंग्रज या युरोपीय सत्ता सोळाव्या शतकाच्या प्रारंभापासूनच भारतावर आक्रमण करू लागल्या होत्या. या सत्तांशी मराठ्यांनी वरचेवर मुकाबला केला आणि काही युद्धांत त्यांचा पराभवही केला; पण प्रथमपासूनच असे दिसू लागले की, पाश्चात्त्य सत्तांना तोंड देण्यासाठी जे सामर्थ्य प्राप्त करून घ्यायला हवे होते त्याची उपासना कशी करावयाची, याचे आकलन भारतातल्या कोणत्याही समाजाला होत नाही; त्या सत्तांची बलस्थाने कोणती, त्यांच्या जगद्विजयाचे रहस्य काय हे जाणून घेण्याची ऐपतच येथे कोणाच्या ठायी नाही. शब्दप्रामाण्य, भौतिक ज्ञानाची अवहेलना, कूपमंडूकवृत्ती, समुद्रगमननिषेध यामुळे हिंदूंची बुद्धी अगदी लुळीपांगळी होऊन गेली होती. यामुळे पाश्चात्त्य आक्रमकांचे सामर्थ्य व त्यांच्या आक्रमणाचे स्वरूप यांविषयी त्यांना कधी उमजच पडला नाही. मराठ्यांना पडला नाही आणि शीखांच्या उत्कर्षाच्या काळी भारतातल्या काही प्रांतांत इंग्रजी विद्येचा प्रसार झाला असून त्यांनाही हा उमज पडला नाही. अर्थातच मुस्लीम आक्रमणास निर्दाळून टाकण्यात यशस्वी झालेले हे समाज इंग्रजांच्यापुढे नामोहरम झाले आणि पुन्हा एकदा भारताच्या कपाळी पारतंत्र्य आले. दुसऱ्या कालखंडाची ही कथा आहे.

तिसरा कालखंड :
 त्यानंतर १८२० पासून भारतात पाश्चात्त्य विद्येच्या प्रसारास प्रारंभ होऊन येथल्या इतिहासाच्या तिसऱ्या कालखंडास प्रारंभ झाला. सुदैव असे की, पाश्चात्त्य विद्येच्या प्रभावाने येथल्या धुरीणांना अगदी अल्पकाळात नवी दृष्टी प्राप्त झाली. आणि राष्ट्रीयता, लोकशाही व विज्ञाननिष्ठा ही पाश्चात्त्यांच्या सामर्थ्याची रहस्ये त्यांना सहजच आकळता आली. हे नवीन ज्ञान प्राप्त होताच, या नवतत्त्वांवर आपल्या समाजाची पुनर्घटना करण्यास येथे सर्वांगीण, आमूलाग्र क्रान्ती घडविणे अवश्य आहे, हे त्यांच्या ध्यानी आले व राजा राममोहन रॉय यांच्यापासून पंडित जवाहरलाल नेहरूंपर्यंत या देशातील सर्व नेते तनमनधन खर्चून त्या उद्योगाला लागले. हा उद्योग एक शतकभर चालू होता. आणि त्याचाच परिपाक होऊन राष्ट्रीयतेच्या महातत्त्वावर भारतीय जनता संघटित होऊ शकली व मागल्या कालखंडांत अजिंक्य ठरलेल्या पाश्चात्य सत्तेचा निःपात करून स्वातंत्र्य मिळविण्यात ती यशस्वी झाली. भारतात ही जी अपूर्व क्रान्ती झाली तिचे विवेचन या प्रकरणाच्या प्रथमार्धात करून उत्तरार्धात त्या क्रान्तीची पूर्णता, सांगता कशी करता येईल याचा विचार करावयाचा आहे. स्वातंत्र्य प्राप्त झाल्याला आता एकोणीस-वीस वर्षे होत आली; पण आपले भारतीय प्रजासत्ताक बलशाली होण्याऐवजी उत्तरोत्तर क्षीणबलच होत चालले आहे. चीनचे आक्रमण मोडून काढून त्याने गिळलेली भारताची भूमी मुक्त करण्यात भारताला यश येत नाही. त्याचप्रमाणे काश्मीर, नागा, मिझो या समस्याही सोडविता येत नाहीत. अन्नधान्यसमस्या, चलनाच्या स्थैर्याची समस्या, पंजाबचा प्रश्न, आसामचा प्रश्न, सीमाप्रश्न, गोवाप्रश्न, काँग्रेस मंत्रिमंडळातील प्रत्येक प्रदेशातील दुही, प्रदेश- राज्यांत भडकत चाललेला वैराग्नी, संघराज्यातून फुटून निघण्याची द्रवीडकळहम्- सारखी वृत्ती यांमुळे तर दीर्घकालानंतर मिळालेले स्वातंत्र्य टिकविता येईल की नाही, अशी दारुण, दुष्ट शंका विचारी मनाला घेरीत आहे. म्हणजे पुन्हा पहिलाच प्रश्न निर्माण झाला ! भारताच्या स्वातंत्र्याचे रक्षण कसे करायचे ? अपूर्ण राहिलेली धार्मिक व राष्ट्रीय क्रान्ती पूर्ण करून हे बल प्राप्त करून व्यावयाचे, हे त्याचे उत्तर आहे. त्याचा विचार उत्तरार्धात करावयाचा आहे. प्रथम घडलेल्या क्रान्तीचे स्वरूप पाहू.
 ब्रिटिश साम्राज्यसत्तेशी लढा देऊन भारताला स्वातंत्र्य प्राप्त करून देणारी जी सर्वांगीण क्रान्ती तिचा विचार येथे करावयाचा आहे, तो अगदी संक्षेपाने करावयाचा आहे. एकतर हा विषय अगदी ताजा असा आहे. शिवाय ती क्रान्ती घडविणाऱ्या थोर पुरुषांची चरित्रे शाळा- महाशाळांतून नित्य शिकविली जातात. या विषयावरचे ग्रंथही बहुतेक भाषांतून झालेले असून त्यांतले बरेचसे सुशिक्षितांच्या वाचनात असतात. म्हणून येथे तपशिलात न शिरता विषयपूर्तीसाठी अवश्य तेवढेच विवेचन करावयाचे आहे.
 १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि येथला स्वातंत्र्याचा लढा संपला. १८९८ साली लो. टिळकांना राजद्रोहाची शिक्षा झाली. त्या वेळी या स्वातंत्र्ययुद्धाला प्रत्यक्ष प्रारंभ झाला; पण त्याच्या आधी जवळजवळ पन्नास वर्षे राष्ट्रीयत्व, लोकशाही व विज्ञान यांचे तत्त्वज्ञान समाजात प्रसृत होत होते. म्हणजे हा स्वातंत्र्याचा लढा जवळजवळ शंभर वर्षे चालू होता असे म्हणण्यास हरकत नाही. त्याच्या आधीच्या तीस-चाळीस वर्षांच्या भारताच्या इतिहासाकडे पाहिले तर आपली आपल्याला लाज वाटावी अशी परिस्थिती येथे होती असे दिसून येईल.

साहेबासाठी अनुष्ठाने :
 पहिली लज्जास्पद गोष्ट आपल्या ध्यानात येते ती ही की, या येवढ्या विस्तीर्ण देशात कोणत्याही प्रदेशाला, कोणत्याही समाजाला स्वराज्य नको होते. 'हिंदुस्थान का व कसा जिंकला गेला?' या 'आधुनिक भारत' या आपल्या ग्रंथाच्या पहिल्या प्रकरणात आचार्य जावडेकरांनी या स्वत्वशून्य वृत्तीचे तपशिलाने वर्णन केले आहे. त्यावरून असे दिसून येईल की, पेढीवाले, सावकार, व्यापारी, सरदार, जमीनदार, लष्करी अधिकारी, ब्राह्मण, रजपूत, सर्व-सर्व ब्रिटिशांना येथे राज्य स्थापण्यास सर्व प्रकारे मदत करीत होते आणि त्यांची सत्ता प्रस्थापित व्हावी म्हणून आतुर झाले होते. गुप्त पेढीवाल्यांनी प्रत्येक लढाईच्या वेळी इंग्रजांना गुप्त माहिती पुरवून व द्रव्याचे साहाय्य करून, आपल्या राजनिष्ठेविषयी कंपनी सरकारकडून प्रशस्तिपत्रे मिळविली होती. बंगालप्रांत लॉर्ड क्लाइव्हने घेतला त्या वेळी तेथील हिंदू व्यापाऱ्यांनी व जमीनदारांनी ब्रिटिशांना सर्वतोपरी साह्य केले, हे हिल्ल, कर्नल स्कॉट, रॉबर्टस् या इंग्रज लेखकांनीच लिहून ठेविले आहे. यावेळी हे व्यापारी व जमीनदार मुसलमान नवाबांच्या जुलमाला अत्यंत कंटाळून गेले होते, हे खरे; पण ती सत्ता आपण उलथून पाडावी हे सामर्थ्य व ही आकांक्षाही त्यांच्या मनात नव्हती ! भारतात साम्राज्य स्थापण्यास ब्रिटिशांना ज्यांनी सैनिक दृष्टीने मदत केली त्यांत क्षात्रधर्माचे अनुयायी म्हणून गाजलेल्या रजपुतांचाही भरणा बराच मोठा होता. ते शूर होते, उच्चवर्णीय होते; पण, जावडेकर म्हणतात, त्या वेळच्या हिंदुसमाजात धर्मनिष्ठा, शौर्य ही गुणसंपदा भरपूर असूनही राष्ट्राभिमान मुळीच नव्हता. दक्षिणेतील मराठे सरदार व जहागीरदार यांच्या राजनिष्ठेचे पोवाडे मुंबईचा गव्हर्नर सर जॉन मालकम यानेच गाइले आहेत. त्यांनी आपल्या स्वामीशी म्हणजे पेशव्यांशी द्रोह करून ब्रिटिशांना साह्य केले म्हणून त्यांच्या जहागिरी जप्त करू नयेत, अशी मालकम विलायत सरकारकडे शिफारस करीत आहे ! खडकीच्या लढाईच्या वेळी, 'बडे साहेबास यश यावे, साहेब लोक जिवानिसी खुशाल राहावे,' म्हणून पुण्याला काही ब्राह्मणांनी अनुष्ठाने बसविली होती व श्रीगणपतीस व महालक्ष्मीस नवस केला होता !

राष्ट्राभिमान नाही :
 हे सर्व वाचले म्हणजे आजच्या सुशिक्षित मनाला मोठा विस्मय वाटतो, खेद होतो; पण एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात राष्ट्रीयत्वाचे कसलेही संस्कार भारतीय मनावर झालेले नव्हते आणि स्वाभिमान, स्वत्व यांचा या भूमीत संपूर्ण लोप झालेला होता, हे ध्यानी घेतल्यावर यात विस्मयावह काही नाही, हे लक्षात येईल. अनेक इंग्रजांनी हे जाणून तसे लिहूनही ठेविले आहे. 'हिंदी लोकांना आत्मप्रत्यय वाटत नाही. त्यांच्यांत राष्ट्राभिमान नाही व ते एकजूट करू शकत नाहीत, हेच आपल्या साम्राज्याचे सामर्थ्य आहे. आपल्या गावापलीकडे देशाचे प्रेम म्हणजे काय याचे ज्ञान हिंदी लोकांना नाही. राज्यसंस्थेविषयी ते अगदी बेफिकीर असतात. जो पगार देईल त्याच्यासाठी ते लढतील व चांगल्या पगाराच्या व लुटीच्या आशेने शत्रूलाही जाऊन मिळतील.' (फ्रेड्रिक जॉन शोअर) येथील सामान्य जनता राष्ट्रनिर्मितीच्या ज्ञानापासून अलिप्त आहे. येथील राज्यकर्ते, संस्थानिक, परकीयांविरुद्ध एकजुटीने लढून स्वातंत्र्यस्थापना करण्यास नालायक आहेत आणि येथील विद्वानांना जगाचे, भौतिक शास्त्रांचे आणि सामाजिक विद्यांचे गाढ अज्ञान आहे, हे मनरो मालकम, एल्फिन्स्टन यांना दिसत होते. (आधुनिक भारत- पृ. ३५) हिंदी राजे, संस्थानिक किंवा त्यांचे विद्वान- अविद्वान मुत्सद्दी हिंदुस्थानात राष्ट्रीयत्व निर्माण करू शकत नाहीत. कारण ते जगाच्या संस्कृतीत मागासलेले, अर्धरानटी, आपसात भांडणारे, परकी प्रभुत्वाची चीड न बाळगणारे, धर्मवेडात गुरफटलेले, आधुनिक राष्ट्रनिर्मितीस पारखे, लोकसत्तेचे ज्ञान नसलेले आणि जगातील घडामोडी न जाणणारे असे आहेत, हे ब्रिटिश मुत्सद्दी जाणून होते. (कित्ता पृ. ३०) म्हणजे राष्ट्रत्वाच्या दृष्टीने येथील सर्व वर्ग शूद्र अथवा दास बनले होते. आपल्या धर्माच्या व संस्कृतीच्या रक्षणास स्वराज्य हवे याची जाणीवही त्यांच्यात उरली नव्हती. आमच्या अंगी केवळ वैयक्तिक सद्गुण होते; पण राष्ट्रनिर्मितीस व स्वराज्यनिर्मितीस लागणाऱ्या सद्गुणांचा संपूर्ण लोप झाला होता; (कित्ता पृ. २४). आचार्य जावडेकरांनी त्या काळच्या अनेक इंग्रज पंडितांच्या व अधिकाऱ्यांच्या आधारे त्या काळच्या भारतीयांचे हे असे वर्णन केले आहे. मूढ धर्मशास्त्रकारांनी प्रसृत केलेल्या हीन धर्मामुळे हिंदुसमाजाचा शतमुखांनी कसा विनिपात झाला होता, हे यावरून कळून येईल.

सर्वांगीण क्रान्ती :
 अशा या पतित समाजात सर्वांगीण क्रान्तीची बीजे पेरणारे पहिले थोर पुरुष म्हणजे राजा राममोहन रॉय हे होत. त्यांनी प्रथम रूढ हिंदुधर्मावर अत्यंत प्रखर टीका करण्यास प्रारंभ केला. कारण धर्मक्रान्ती झाल्यावाचून, विकृत धर्मकल्पनांपासून समाज मुक्त झाल्यावाचून, येथे दुसरी कसलीही क्रान्ती होणे शक्य नव्हते. कारण धर्माची सत्ता त्या वेळी सर्वंकष अशी होती. व्रतेवैकल्ये, उद्यापने हे सर्व कर्मकांड, मायावाद शिकविणारी निवृत्ती, बुद्धिनाश करणारे ग्रंथप्रामाण्य, समष्टिभावना मुळातच खुडून टाकणारा जातिभेद, स्त्रीचे दास्य व त्यातून निर्माण झालेली सतीची दुष्ट रानटी चाल ही सर्व हिंदुधर्माच्या विकृतीची लक्षणे होत, असे राममोहन यांचे मत होते. आपल्या लेखांतून, पत्रांतून व व्याख्यानांतून त्यांनी या अधर्मावर सतत भडिमार चालू ठेविला होता आणि त्याच वेळी भौतिकविद्यांची उपासना या देशात व्हावी असे प्रयत्न त्यांनी चालविले होते. कंपनी सरकारने कलकत्त्यास संस्कृत पाठशाळा काढून येथल्या न्याय, मीमांसा, वेदान्त इ. जुन्याच विद्यांचे अध्यापन करण्याचे धोरण आखले होते. त्यावर टीका करताना राममोहन म्हणतात की, 'आम्हांस अशी आशा वाटत होती की, या पाठशाळेत हिंदी लोकांना गणित, भौतिक विद्या, रसायनशास्त्र, शारीरविद्या व इतर ज्या शास्त्रांना पूर्णत्वास नेल्यामुळे युरोपीय राष्ट्रे जगातील लोकांच्या पुढे गेली आहेत ती शास्त्रे शिकविण्यासाठी बुद्धिमान व विद्वान युरोपियनांची नेमणूक होईल.' लॉर्ड बेकन याच्या काळापासून ज्या भौतिक दृष्टिकोणाचा अवलंब युरोपने केला त्याच दृष्टिकोणाचा अवलंब करून, आधुनिक भारताने आधुनिक, भौतिक व सामाजिक विद्यांचे अध्ययन केले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. ब्रिटिश सरकारने हा त्यांचा आग्रह मानला आणि भारतीय पंडितांनी अनन्य भक्तीने या पाश्चात्य विद्यांची उपासना केली; म्हणूनच भारतात क्रान्ती घडविणे विसाव्या शतकातील त्याच्या नेत्यांना शक्य झाले.

मानवी प्रतिष्ठा :
 गेल्या शतकातील दुसरे मोठे धर्मसुधारक म्हणजे न्या. मू. रानडे हे होत. 'मानवी प्रतिष्ठेचे पुनरुज्जीवन' हे त्यांच्या धार्मिक व सामाजिक तत्त्वज्ञानाचे आदिसूत्र होते. 'आपल्या अधःपाताचे मूळ कारण म्हणजे आपल्यावरची बंधने ही विवेकबंधने नसून, ती बाह्य बंधने आहेत, हे होय; यामुळे आपली मने बाल्यावस्थेतच राहिली. स्वयंशासन, आत्मसंयम यांमुळे येणारी मानवी प्रतिष्ठा आपल्याला कधीच आली नाही.' असे उद्गार त्यांनी कलकत्त्याच्या दहाव्या सामाजिक परिषदेत भाषण करताना काढले आहेत. (मिसलेनियस राइटिंग्ज्–पृ. १९२-९३) ब्रिटिशांच्या पूर्वीच्या हजार वर्षांच्या काळात येथे समाजरचनेची जी तत्त्वे मान्य व रूढ झाली होती, त्यातील जवळजवळ प्रत्येक तत्त्व मानवी प्रतिष्ठेला घातक असे होते. कलियुग, नियतिवाद, संसाराची उपेक्षा, तर्काची अवहेलना, जन्मनिष्ठ उच्चनीचता, शब्दप्रामाण्य यांतील प्रत्येक तत्त्वाने व्यक्तीच्या स्वत्वाची पायमल्ली केलेली आहे. असल्या अधम व हीन धर्माचे जे अनुयायी त्यांच्यांत लोकसत्ता तर राहोच, पण मानवी कर्तृत्वाचा निदर्शक असा कोणताच गुण निर्माण होणे शक्य नव्हते. पाश्चात्त्य विद्येने ज्यांना नवी दृष्टी प्राप्त झाली त्या सर्व धर्मवेत्त्यांना हीच भयावह गोष्ट प्रथम जाणवली. गेल्या शतकातील सर्व प्रमुख समाजनेते प्रथम धर्मसुधारक होते याचे हेच कारण आहे. त्यांपैकी प्रत्येकाने पहिला घण त्या कर्मकांडप्रधान, विवेकहीन, जड धर्मावरच घातला आहे. त्यांच्या धर्मसुधारणेचे एकच लक्षण होते. मानवाला देहप्रधान गणून आधीच्या जडधी, मूढ अशा धर्मपंडितांनी सांगितलेला हीन व अपवित्र असा आचारधर्म नष्ट करून त्याच्या जागी त्याच्या मनाची, बुद्धीची, आत्म्याची प्रतिष्ठा वाढविणारा तात्त्विकधर्म प्रस्थापित करणे हे ते लक्षण होय. "धर्म म्हणजे मनाचे संस्कार, देहाचे नव्हेत. धर्म म्हणजे मनोजय, धर्म म्हणजे आत्मसंयमन, धर्म म्हणजे भूतदया, श्रद्धा, भक्ती, प्रेम, दया, क्षमा, शांती, रंजल्यागांजल्यांना आपुले म्हणणे, सर्वांभूती समभाव" हा महनीय विचार त्यांना सांगावयाचा होता आणि वेद, उपनिषदे, गीता या धर्मग्रंथांच्या आधारे त्यांनी तो सांगितला.
 स्वामी दयानंदसरस्वती यांनी पंजाबात जे धर्मसुधारणेचे कार्य केले त्याचे स्वरूप काहीसे असेच होते. वेदाध्ययनाचा अधिकार मनुष्यमात्राला आहे, चातुर्वर्ण्य हे जन्मसिद्ध नसून ते गुण कर्मांवर अवलंबून असावे, वैदिक धर्माचे दरवाजे सर्व धर्मीयांना खुले असावे व शुद्धीकरणाने कोणासही या धर्मात प्रवेश मिळावा, अशी दयानंदांच्या आर्यसमाजाची तत्त्वे आहेत. मूर्तिपूजा, बालविवाह, स्त्रीदास्य, अस्पृश्यता या रूढींवर समाजाचे नेते प्रखर हल्ला करतात. स्वामी दयानंदांना लाला हंसराज, स्वामी श्रद्धानंद, लाला लजपतराय यांसारखे थोर अनुयायी मिळाल्यामुळे पंजाबात धर्मक्रान्तीची जी बीजे पेरली गेली त्यांचा त्वरेने विकास झाला.

भौतिकवादाचे माहात्म्य :
 स्वामी विवेकानंदांचे धर्माच्या अभ्युत्थानाचे कार्य प्रसिद्धच आहे. त्याचे वर्णन करण्याची गरजच नाही. त्यांना कोणती धर्मक्रान्ती अभिप्रेत होती याची कल्पना यावी म्हणून त्यांच्या भाषणातील एकच उतारा देतो. "आमच्यावर मुसलमानांचे आक्रमण झाले, ख्रिस्त्यांचे झाले. आमच्यांपैकी कोट्यवधी लोक धर्मच्युत झाले; पण त्यांनी तसे न व्हावे म्हणून कोणती व्यवस्था आम्ही केली होती? जे भिकारी होते, हीनदीन दरिद्री होते, त्यांना आम्ही थोडे सुख देण्याऐवजी निवृत्तीचे धडे देत बसलो. आमच्या पंडितांनी सगळा धर्म सोवळ्या- ओवळ्यात आणून ठेविला आणि ऐहिक वैभवाकडे दुर्लक्ष केले. अध्यात्माचा त्यांनी अतिरेकच केला. तेव्हा आता आत्मोद्धारासाठी आपण भौतिकवादाचा आश्रय करणे अवश्य आहे. एका दृष्टीने भौतिकवाद आला तो आपल्या उद्धारार्थच आला आहे. त्यामुळे जन्मनिष्ठ उच्चनीचता नष्ट होईल, बुद्धिप्रामाण्य निर्माण होऊन धर्मग्रंथांची ठेव सर्वांच्या हाती येईल व सुखी जीवनाचे दरवाजे सर्वांना खुले होतील. पश्चिम ही धनिकांच्या टाचेखाली चेंगरली असली तर पूर्व ही धर्ममार्तडांच्या टाचेखाली चिरडली आहे, हे ध्यानात ठेवा. आता एकीने दुसरीवर नियंत्रण ठेवून समतोल राखिला पाहिजे. केवळ अध्यात्माने जगाची प्रगती होणार नाही."
 राममोहन, रानडे, दयानंद, विवेकानंद यांना जी सर्वांगीण क्रान्ती अभिप्रेत होती, त्यांना जे समाजरचनेचे नवे तत्त्वज्ञान समाजाला सांगावयाचे होते ते गेल्या शतकात प्रांतोप्रांतीच्या शेकडो लहानमोठ्या सुधारकांच्या मनात उदित झालेले होते. हे तत्त्वज्ञान पाश्चात्त्य विद्येचे फळ असल्यामुळे व ती विद्या सर्वच प्रदेशांत प्रसृत करण्याचे धोरण इंग्रज सरकारने अवलंबिले असल्यामुळे, नवविचारप्रवाह सर्व प्रदेशांत वाहू लागले होते आणि प्रत्येक प्रांतातील सुधारक आपल्या वाणीने व लेखणीने ते विचार या भूमीत दृढमूल करण्याचा प्रयत्न करीत होते. ईश्वरचंद्र विद्यासागर, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, स्वामी रामकृष्ण परमहंस, स्वामी रामतीर्थ, दादोबा पांडुरंग, ज्योतिबा फुले, लोकहितवादी, आगरकर, पंडित अयोध्यानाथ, लाला हंसराज, लाला लजपतराय, स्वामी श्रद्धानंद, आनंदा चालू, सुब्रह्मण्य अय्यर इ. भारतातील अनेक नेत्यांना, कार्यकर्त्यांना व विचारवंतांना गेल्या हजार वर्षात येथल्या लोकांना जे प्रश्न प्रतीत झाले नाहीत तेच नेमके प्रतीत झाले. त्यामुळे आपल्या समाजाचे अवनत रूप पाहून त्यांच्या पायांखालची धरणी हादरून गेली आणि समाजात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याचा दृढनिश्चय करून त्यांनी ब्राह्मसमाज, प्रार्थनासमाज, सत्यशोधक समाज, महाजनसभा, भार्गवसभा, हिंदू युनियन क्लब अशा अनेक संस्था स्थापन केल्या आणि बंगाल हेरल्ड, बंगाली, अमृतबझारपत्रिका, दर्पण, इन्दुप्रकाश, दीनबंधु, हिंदू, स्वदेशमित्रम्, इंडियन हेरल्ड, रीजनरेटर ऑफ आर्यावर्त अशी वृत्तपत्रे काढली व सर्व भारतभर नवविचारांचे एक प्रचंड आंदोलन घडवून आणले.

नवी संघटनतत्त्वे :
 आणि यातूनच राष्ट्रनिष्ठा व लोकशाही या संघटनातत्त्वांची वीजे सर्वत्र पडून लोकमान्य टिळक व महात्मा गांधी यांना अखिल भारताची संघटना करून इंग्रजी साम्राज्यशक्तीशी लढा देण्याचे सामर्थ्य भारतीय समाजात निर्माण करता आले. हे दोघेही महापुरुष धार्मिक व सामाजिक परिवर्तनाचे पुरस्कर्ते होतेच; पण भारताचे राजकीय स्वातंत्र्य हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असल्यामुळे त्या सर्वांगीण क्रान्तीतून निर्माण झालेल्या शक्तीला त्यांनी राष्ट्रीयत्वाची जोड दिली व या भूमीत एक अभूतपूर्व सामर्थ्य निर्माण केले. टिळकांच्या उदयापर्यंत नवधर्मतत्त्वे ही बव्हंशी वैचारिक पातळीवर होती व सामान्यतः सुशिक्षित वर्गापर्यंतच त्यांचा प्रसार मर्यादित होता. स्वातंत्र्यासाठी भारताची लोकशक्ती जागृत करावयाची असे ठरवून टिळकांनी आतापर्यंतच्या चळवळींची बैठक बदलली व त्यांना अखिल भारतव्यापी रूप दिले. विचारस्वातंत्र्य हा लोकशाहीचा आत्माच होय. त्याचा अत्यंत जोराने टिळकांनी पुरस्कार केला. जेथे विचारस्वातंत्र्य नाही ते राष्ट्र मेल्यासारखे होय; म्हणून हे स्वातंत्र्य नष्ट करू पाहणारा मनुष्य राष्ट्राचा शत्रू समजला पाहिजे, असे ते सांगत असत. निवृत्तिवाद हा समाजाला किती घातक आहे हे तरुणपणी त्यांनी गीतेच्या अध्ययनास आरंभ केला तेव्हाच त्यांच्या ध्यानात आले होते. मंडालेच्या तुरुंगात सवड मिळताच गीतारहस्य हा ग्रंथ लिहून, हजारो वर्षे विस्मृतीत पडून राहिलेला गीतेचा जो कर्मयोग म्हणजेच प्रवृत्तिधर्म त्याचे त्यांनी अभ्युत्थान केले आणि एका जुनाट रोगापासून भारताला मुक्त केले. जातिभेद व जन्मनिष्ठ चातुर्वर्ण्य त्यांना कधीच मान्य नव्हते, पण प्रारंभी त्यावर काही धोरणाने ते टीका करीत नसत; पण राजकीय चळवळीला उधाण येऊ लागले तेव्हा जन्मसिद्ध चातुर्वर्ण्य मानणे लोकशाहीच्या काळास अननुरूप आहे व सर्व जातींच्या लोकांनी स्वराज्याच्या कार्यात पडणे व जातिभेद जन्मसिद्ध न मानता गुणकर्मानुसार मानणे हेच युक्त होय, असे सांगण्यास त्यांनी प्रारंभ केला. ही उक्ती त्यांनी मागून सांगितली असली तरी ती कृती मात्र त्यांनी प्रारंभापासून आरंभिली होती. कारण त्यांना लोकशक्ती जागृत करावयाची होती. महार, मांग, चांभार, ब्राह्मण, मराठे, कुणबी हे सर्व गणेशोत्सवात एकत्र आले पाहिजेत असा त्यांचा प्रयत्न व शिकवण असे. त्यांना दुसरे काही करणे शक्यच नव्हते. कारण ब्रिटिश साम्राज्यशक्तीशी लढा देण्यासाठी त्यांना लोकांत जागृती करावयाची होती, त्यांचा स्वाभिमान उद्दीपित करावयाचा होता, त्यांचे व्यक्तिमत्त्व कणखर करावयाचे होते. त्यामुळेच मजूर, काबाडकष्ट करणारे लोक, शेतकरी, कारागीर, कोष्टी, साळी, माळी, भिल्ल, कातवडी ह्या शतकानुशतके निद्रिस्त असलेल्या समाजाला ते 'केसरी'च्या पानापानातून आवाहन करीत होते. खरी सर्वांगीण क्रांती ती हीच होय. अन्यायाचा प्रतिकार करण्याची बुद्धी व शक्ती एकदा मनुष्याच्या मनात जागृत झाली की, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलेल्या सुप्त स्वदेशी शृंखला त्याच्या पायात क्षणभरही टिकू शकत नाहीत. टिळकांनी भारतीय जनतेच्या मनातली हीच सुप्तशक्ती जागृत केली आणि धार्मिक, सामाजिक, आर्थिक व सर्व प्रकारच्या क्रान्तीचा पाया घातला. तीतूनच अग्नीसारखे महातेज निर्माण करून महात्माजींनी त्यात ब्रिटिश साम्राज्याची आहुती दिली.

व्यक्तित्वजागृती :
 महात्माजी हे लो. टिळकांसारखेच धर्मप्रणेते होते. मानवत्वाची प्रतिष्ठा हे त्यांच्याही तत्त्वज्ञानाचे मुख्य सूत्र आहे. व्यक्ती हे अंतिम मूल्य आहे हा अत्यंत उदात्त विचार त्या सूत्रातूनच विकसित झालेला आहे. या विचाराचा उपदेश करूनच एक व्यक्ती आपल्या विवेकाने निश्चित केलेल्या सत्यासाठी अखिल विश्वाविरुद्ध लढा करू शकते, निःशस्त्र असताही लढा करू शकते, हे फार मोठे तत्त्व त्यांनी प्रस्थापित केले आणि हीन, दीन अशा भारतीय जनतेला व्यक्तित्वाचे असामान्य सामर्थ्य प्राप्त करून दिले. दक्षिण आफ्रिकेत, चंपारण्यात, खेडा जिल्ह्यात सामर्थ्य निर्मितीचा हा अलौकिक चमत्कार महात्माजींनी करून दाखविला. तेथे ज्यांनी ब्रिटिश साम्राज्यशाहीशी लढा केला ते लोक हिंदुसमाजाच्या अगदी खालच्या थरातले होते. शेकडो वर्षे ते तेथेच पिचत होते. त्यांना उन्नत होण्यास हिंदुधर्मशास्त्राच्या चौकटीत कधीही अवसर मिळाला नसता. तो मिळत नव्हता म्हणूनच हा समाज शेकडो वर्षे पारतंत्र्याच्या नरकात सडत होता. जुने धर्मशास्त्र कोणाही व्यक्तीकडे तिच्या जातीतून, वर्णातून पाहात असे. त्या जातीची वा वर्णाची ती एक घटक एवढेच तिचे स्थान होते. व्यक्तित्व हेच अंतिम मूल्य हा विचार युरोपात विद्येच्या पुनरुज्जीवनामुळे निर्माण झाला. औद्योगिक क्रान्तीमुळे तो बळावला. विज्ञाननिष्ठेमुळे त्याचा परिपोष झाला आणि त्यातूनच युरोपचे सर्व वैभव निर्माण झाले. अत्यंत निराळ्या भूमिकेवरून पण महात्माजींनी तेच तत्त्व भारतीय जनतेला सांगितले आणि सत्याग्रह लढ्याला तिला उद्युक्त करून तिच्या ठायी एक महाशक्ती निर्माण केली.

परंपराभिमान :
 ही महाशक्ती, हे महातेज म्हणजेच राष्ट्रनिष्ठा हे संघटनतत्त्व होय. वर सांगितलेली धर्मक्रान्ती व सामाजिक क्रान्ती घडविणारे लोक जरी अंतर्मुख होऊन स्वसमाजावर प्रखर टीका करीत असत तरी भारताच्या प्राचीन वैभवाचा, पूर्वपरंपरेचा त्यांना प्रखर अभिमान होता. हिंदुसमाजाच्या पुनर्घटनेची त्यांनी जी तत्त्वे सांगितली त्यांना ते वेद, उपनिषदे, महाभारत, गीता यांचाच आधार घेत. आगरकरांसारख्यांना असा आधार घेणे पसंत नव्हते. तरी पाश्चात्य सुधारणांचा अंगीकार करावयाचा तो आपले प्राचीन आर्यत्व न सोडता करावयाचा, असेच त्यांचे मत होते. प्राचीन काळातील हिंदुसमाजाच्या नेत्यांना पूर्वपरंपरेच अभिमान होता; पण तो आंधळा होता. वेद, उपनिषदे, गीता यांची चिकित्स करण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठायी नव्हते आणि त्यांच्या त्या अभिमानाचा समाजसंघटनेशी काही संबंध नव्हता; पण पाश्चात्यविद्या येथे आल्यापासून भारतीयांनी इतिहासाचा अभ्यास सुरू केला. त्यामुळे प्राचीन ग्रंथांचे खरे वैभव त्यांना कळून आले. शिवाय चंद्रगुप्त मौर्य, शातवाहन, विक्रमादित्य, चंद्रगुप्त, समुद्रगुप्त इ. महापराक्रमी सम्राटांचा जो पराक्रम गेली हजार वर्षे विस्मृतीत गेला होता तोही आता इतिहाससंशोधनामुळे प्रकाशात आला. यामुळे भारतीयांचा परंपराभिमान जास्तच दृढ झाला. हा अभिमान जागृत होऊ नये म्हणून वेद-उपनिषदादि ग्रंथ फार प्राचीन नाहीत; रामायण, गीता हे ग्रंथ उसनवारीने रचलेले आहेत; हिंदू लोकांना चारित्र्य नाही, त्यांच्या ठायी काव्यप्रतिभा असणे शक्य नाही, मराठ्यांच्या राज्याला कसलीही तात्त्विक बैठक नव्हती, इ. निरर्गल निंदा इंग्रज मिशनरी, पंडित व अधिकारी करीत होते. न्या. मू. तेलंग, लो. टिळक, चिंतामणराव वैद्य, वि. का. राजवाडे, रमेशचंद्र दत्त, बसू, डॉ. जयस्वाल, अयंगार यांनी या निंदेला पाश्चात्यांच्याच ऐतिहासिक शस्त्रास्त्रांनी उत्तर देऊन भारतीय संस्कृतीचे प्राचीनत्व व स्वयंसिद्धत्व शंकातीत करून टाकले. त्यामुळे परंपराभिमानाला ज्ञानाचा पाया प्राप्त होऊन त्याला अधिकच उत्कटता व तेज आले.

अभिमान आणि द्वेष :
 याच काळात पितामह दादाभाई नौरोजी, न्या. मू. रानडे, विष्णुशास्त्री चिपळूणकर, प्रिन्सिपल आगरकर, लो. टिळक, ना. गोखले, सुरेन्द्रनाथ बॅनर्जी, लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल, सुब्रह्मण्य अय्यर, वीर राघवाचार्य इ. नेत्यांनी इंग्रजी राज्याचे हिडिस अंतरंग, त्याचे खरे काळे स्वरूप भारतीय जनतेला उघडे करून दाखविण्यास प्रारंभ केला होता. ब्रिटिशांनी चालविलेला अर्थशोष, मिशनऱ्यांकरवी त्यांनी चालविलेले धार्मिक आक्रमण, त्यांच्या राज्यातील भयानक अन्याय, इंग्रज अधिकाऱ्यांचे असह्य उद्दाम, उर्मट वर्तन, भारताच्या आर्थिक उन्नतीला सतत पायबंद घालण्याची त्यांची वृत्ती, दुष्काळ, साथीचे रोग यांच्या निवारणाच्या मिषाने गोऱ्या सोजिरांनी केलेले अत्याचार या सर्वांचे वर्णन वृत्तपत्रे रोज करीत व त्यामुळे इंग्रज राज्यकर्त्याविषयी कडवा द्वेष भारतीय जनतेत निर्माण झाला. स्वराष्ट्र, स्वधर्म, पूर्वपरंपरा यांचा अभिमान ही राष्ट्रनिष्ठेची एक बाजू होय. आक्रमक सत्ताधारी, राज्यकर्ते यांच्याबद्दलचा जहरी द्वेष ही त्याची दुसरी बाजू होय. लो. टिळकांनी मृगशीर्ष, आर्याचे मूलस्थान, गीतारहस्य इ. ग्रंथ लिहून स्वत्वाचा अभिमान जसा जागृत केला तसाच बहुजनांच्या तोंडचा घास सरकार काढून घेत आहे, त्यांच्यावर करांचे असह्य ओझे लादीत आहे हे दाखवून इंग्रजांविषयी द्वेष व असंतोषही पेटवून दिला. वासुदेव बळवंत, चाफेकर, वीरेन्द्रकुमार घोष, भूपेन्द्रनाथ दत्त आणि या सर्वांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सशस्त्र क्रान्तीच्या मार्गाने वधस्तंभावर चढून हेच कार्य केले. आचार्य जावडेकर म्हणतात, 'परकीय सत्तेच्या आक्रमणामुळे दारिद्र्य व बेकारी वाढत आहे, याची जाणीव सर्वांना होत होती. ही जाणीव आणि आपल्या परंपरागत संस्कृतीचा अभिमान यांची गाठ पडताच क्रांतीवादी व जहाल राजकारणाचा जन्म झाला. ही गाठ घालून देण्याचे काम लोकमान्यांनी केले.' (आधुनिक भारत- पृ. २३६)
 नव्या क्रांतिकारक विचारांचा परिपाक होऊन भारतात राष्ट्रनिष्ठा कशी विकसत गेली याचे महर्षी दादाभाईनी १८८० सालच्या एका भाषणात चांगले वर्णन केले आहे. ते म्हणतात, 'सर्व वर्गातल्या व थरांतल्या हजारो लोकांना आज जे शिक्षण मिळत आहे त्यामुळे त्यांची मने एकाच मुशीत घडत आहेत. त्या सर्वांच्या भावना समान होत आहेत, आकांक्षा समान होत आहेत व विचार समान होत आहेत आणि विशेषतः या जागृतीतून राजकीय संघटन व सहभाव निर्माण होत आहे. कारण सर्वानाच दारिद्र्याची झळ लागली असून आपल्या देशाचा होत असलेला अधःपात आणि नाश स्पष्ट दिसत आहे. धर्म, वंश, पक्ष हे भेद या समाईक ध्येयात वितळून जात आहेत. हिंदू, मुसलमान, पारशी सर्वांनाच इंग्रजी राज्य हे वरदान आहे की शाप आहे हा प्रश्न पडला आहे आणि त्यामुळे देशाच्या राजकारणाने सर्वांची मने व्यापिली आहेत. देशाची अधोगती अशीच चालू राहिली, बहुजनांची सुखाची आशा नष्ट झाली तर लोकांची राजनिष्ठा भंगेल आणि ब्रिटिश मालाबद्दलचा आजचा द्वेष हा ब्रिटिश सत्तेकडे वळेल.'
 हे १८८० सालचे भाषण आहे. पुढील साठसत्तर वर्षांत लो. टिळक, सावरकर, महात्माजी, पंडितजी, नेताजी यांनी हेच घडवले व त्या संघटित शक्तीच्या बळावर ब्रिटिश सत्ता नष्ट करून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.

सार्थ भीती :
 ज्या धार्मिक व सामाजिक क्रान्तीचे येथवर वर्णन केले ती येथे झाली नसती, आर्थिक क्रांतीची आश्वासने जनतेला मिळाली नसती तर येथे राष्ट्रनिष्ठा ही कधीच उदयाला आली नसती व भारताची शक्ती कधीच संघटित झाली नसती. ब्रिटिश साम्राज्यशक्तीशी लढा करण्यास बहुजनांत जागृती होऊन स्वातंत्र्याच्या चळवळीला व लढ्याला त्यांचा पाठिंबा मिळणे अवश्य होते आणि इंग्रजी राज्य गेल्यानंतर येथे पुन्हा तेच चातुर्वर्ण्य, तोच ब्राह्मण-क्षत्रियांचा जन्मजात अधिकार, सावकार, व्यापारी, कारखानदार यांनी चालविलेला तोच रक्तशोष, तेच दारिद्र्य, तेच दास्य, तीच अवकळा, अस्पृश्यतेचा तोच नरक- हेच आपल्या कपाळी आहे असे जर बहुजनांना वाटत राहिले असते तर ते स्वातंत्र्यसंगरात कधीही सहभागी झाले नसते. अस्पृश्य हे तर या स्वातंत्र्यलढ्यापासून बहुतेक दूरच राहिले. कारण इंग्रजांच्या राज्यातच आपले हित आहे, स्वातंत्र्य आले तर पुन्हा स्पृश्य हिंदू आपला पूर्वीसारखाच छळ करतील, ही भीती त्यांना होती. सार्वजनिक तलावावर पाणी भरण्याच्या हक्कासाठी, सार्वजनिक देवळात प्रवेश मिळविण्यासाठी डॉ. आंबेडकरांना लढे करावे लागले, आणि ते करूनही हिंदूंना उमज पडत नाही हे पाहून त्यांना धर्मांतर करावे लागले यावरून ही त्यांची भीती सार्थ होती, यात शंका नाही; पण महात्माजींनी चालविलेली अस्पृश्योध्दाराची चळवळ व स्पृश्य हिंदूंनी त्यासाठी स्थापिलेल्या अनेक संस्था आणि प्रत्यक्षात काही अंशी अस्पृश्यतेचे निर्बंध ढिले करून त्या समाजाला दिलेला विसार, यांमुळेच त्यांचा विरोध बराच कमजोर झाला. धार्मिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय चळवळीत भेद करणे योग्य नाही, एक आधी व एक मागून या म्हणण्याला काही अर्थ नाही हे रानडे, दादाभाई, आगरकर, सावरकर, आंबेडकर यांचे म्हणणे कसे पूर्ण सार्थ होते ते स्वातंत्र्याच्या चळवळीला शेवटी जे रूप आले त्यावरून सहज दिसून येते. सर्व धर्मपंथ, सर्व वर्ण, सर्व जाती, सर्व वर्ग यांना स्वातंत्र्यामुळे आपला उत्कर्ष होईल, आजच्यापेक्षा स्वातंत्र्या- नंतर आपली स्थिती थोडी तरी सुधारेल अशी निश्चिती वाटल्यावाचून त्या लढ्यात उतरण्याची त्यांची कदापि सिद्धता होत नाही आणि ही निश्चिती धार्मिक व सामाजिक क्रान्तीवाचून, म्हणजे त्या क्षेत्रातील विषमतेची रूढ तत्त्वे नष्ट करून समता, स्वातंत्र्य, बंधुता यांची तेथे प्रस्थापना झाल्यावाचून होणे शक्य नसते. राममोहन रॉय यांच्यापासून महात्माजींपर्यंत भारताच्या सर्व नेत्यांनी आधी धर्मक्रान्ती करण्याचे धोरण अवलंबिले याचे हेच कारण आहे. रूढ धर्मतत्त्वे वैचारिक पातळीवरून नष्ट करण्यात भारतीय नेत्यांना पुष्कळच यश आले आणि स्वातंत्र्य, समता, बुद्धिनिष्ठा या तत्त्वांना बरेच व्यवहारात आणता आले म्हणूनच त्यांना येथे राजकीय क्रान्ती करण्यात यश आले. त्या तत्त्वांमुळेच येथे राष्ट्रनिष्ठा रुजू शकली, जनशक्ती संघटित झाली आणि स्वातंत्र्याचा लढा यशस्वी झाला.

अपेक्षाभंग :
 स्वातंत्र्यलढ्याचे स्वरूप असे असल्यामुळे, धार्मिक व सामाजिक क्रान्ती ही या विजयासाठी अपरिहार्य आहे हे सर्व नेत्यांना मान्य असल्यामुळे आणि ती घडविण्यासाठी बहुतेक सर्वांनी यावच्छक्य प्रयत्न केलेले असल्यामुळे स्वातंत्र्य- प्राप्तीनंतर ही अपुरी क्रान्ती सत्तेच्या साह्याने पूर्ण करून, त्या क्रान्तीची तत्त्वे जनतेच्या मनात खोलवर रुजवून भारतीयांची राष्ट्रनिष्ठा अभंग करून टाकण्याकडेच स्वातंत्र्याच्या उत्तरकाळचे भारताचे नेते आपले लक्ष केन्द्रित करतील, आपले शक्तिसर्वस्व पणाला लावतील अशी भारतातील सर्वजनांची अपेक्षा होती. स्वातंत्र्यपूर्वकाळात काही नेत्यांच्या तशा प्रतिज्ञाच होत्या. आधी राजकीय सुधारणा होऊन स्वातंत्र्य प्राप्त झाले, सत्ता हाती आली की, सामाजिक व धार्मिक सुधारणा सहज घडविता येतील असे त्यांचे मत होते. ज्यांना प्रारंभापासूनच त्या सुधारणांचे महत्त्व वाटत होते, सर्व क्षेत्रांतील सुधारणा एकदम झाल्या पाहिजेत असे ज्यांचे मत होते त्यांच्याबद्दल तर प्रश्नच नाही. राष्ट्रनिष्ठा हे या सुधारणांचेच फल आहे, त्यांच्या आधारावाचून तिला स्थैर्य व दृढता येणार नाही अशी त्यांची खात्री असल्यामुळे त्या निष्ठेचा हा पाया भक्कम व अभंग करून टाकण्याचा उद्योग, सत्तारूढ होताच ते प्रथम हाती घेतील याबद्दल कोणाला शंकाच नव्हती.
 पण जे कोणाच्या ध्यानीमनी नव्हते तेच भारतात घडले. स्वातंत्र्योत्तर काळातील सत्ताधाऱ्यांच्या वर्तनामुळे सर्वांचा अत्यंत दारुण असा अपेक्षाभंग झाला.

विष हेच पौष्टिक :
 सत्ता हाती येताच धर्म, जाती, पंथ, प्रांत हे भेद नष्ट करण्याचा कसून प्रयत्न करण्याऐवजी ती सत्ता कायम आपल्या हाती टिकविण्यासाठी या भेदांचा आश्रयच सत्ताधारी काँग्रेसपक्ष करू लागला. राष्ट्रनिष्ठेऐवजी निवडणूकनिष्ठा हे आता कॉंग्रेसचे ध्येय झाले आणि ज्या विषांनी भारतीय समाज विघटित होतो असे काँग्रेसनेत्यांनी पूर्वी लक्षलक्ष वेळा सांगितले होते ती विषे आता यांनी पौष्टिके ठरविली व त्यांची इंजेक्शने ते समाजाला देऊ लागले. त्यामुळे जातीय व धार्मिक भेद स्वातंत्र्यानंतर लोप पावण्याऐवजी, पूर्वी कधी नव्हते इतक्या जोराने उफाळून आले. या विषयाची गेल्या पंधरावीस वर्षात इतकी चर्चा झाली आहे की, त्याचे पुन्हा विवेचन करण्याचे कारण नाही. 'लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान', 'अराजकाच्या उंबरठ्यावरील भारत' ('वसंत' सप्टेंबर, ऑक्टोबर १९६१) 'भारतीय लोकसत्ता' या ग्रंथांत व लेखांत मी हा विषय सविस्तर व साधार मांडला आहे. पंडित नेहरू, राष्ट्रपती राजेन्द्रबाबू, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भाषणांच्या आधारेच तो मांडला असल्यामुळे त्यातील सत्य वादातीत आहे. निवडणुकांची तिकिटे कशी दिली जातात, त्या वेळच्या भाषणांत प्रामुख्याने या विषारांचाच प्रसार कसा केला जातो, मंत्रिपदे, अधिकारपदे यांचे वाटप कसे होते, शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश देताना जात, धर्म, पंथ हीच प्रामुख्याने कशी पाहिली जातात हे सर्व जगजाहीर आहे. इत्यर्थ असा की, संघटनेच्या दृष्टीने विचार करता स्वातंत्र्यानंतर पाऊल प्रगतीच्या मार्गाने न पडता अधोगतीच्या मार्गानेच पडू लागले आणि पुन्हा हा समाज विघटित होऊ लागला. त्याचे भवितव्य पुन्हा धोक्यात आले.

धन्य अहिंसा, धन्य विश्वप्रेम ! :
 मुस्लीमांच्या बाबतीतही काँग्रेसच्या नेत्यांनी हिंदुसमाजाला आणि भारताला अत्यंत विघातक असेच धोरण अवलंबिले. फाळणीला मान्यता देऊन त्यांनी पाकिस्तानची निर्मिती केली. रूमशामला, इस्तंबूलला जावे, तेथपर्यंत मराठ्यांचा भगवा ध्वज न्यावा अशी मराठ्यांची आकांक्षा होती. बलुचिस्तान, अफगाणिस्तान येथपर्यंत आपले साम्राज्य विस्तारावे अशी रणजितसिंगाची आकांक्षा होती. ते सर्व लांबच राहिले आणि सिंध, पेशावर, अर्धा पंजाब, अर्धा बंगाल हे प्रांत मुस्लीमांना देऊन भारताच्या नेत्यांनी अफगाणिस्थानच्या अमीराचे स्वप्न दुपटीने सफल करून दिले, आणि हे सर्व अहिंसेपायी ! वैयक्तिक धर्म, वैयक्तिक मोह ही भारतीयांच्या मनाची सर्वांत मोठी विकृती. ती अजूनही निरनिराळ्या रूपांत पुन्हा पुन्हा उद्भवते. सत्य, अहिंसा ही आमच्या नेत्यांची प्रिय तत्त्वे. त्यांपायी राष्ट्रहित नासले तरी त्यांना त्याची परवा नाही. मागल्या काळी ब्रह्मप्रेमाने येथले थोर पुरुष समाजहिताची उपेक्षा करीत, आता अहिंसा- प्रेमाने, एवढाच फरक. वैयक्तिक दृष्टिकोण दोहीकडे तोच आहे. ही वैयक्तिकता अत्यंत वरच्या, अत्यंत उदात्त पातळीवरची आहे हे खरे, पण राष्ट्रहिताच्या दृष्टीने ती त्याज्यच आहे. ती विकृतीच आहे. तीतूनच- त्या अहिंसाप्रेमातूनच- पाकिस्तानचा जन्म झालेला आहे. तो झाल्यावर राहिलेल्या भारताविषयी तरी आमच्या नेत्यांनी खंबीर, कणखर धोरण अवलंबावयाचे होते ! पण ते हिंदूंच्या रक्तातच नाही. त्यामुळे काश्मीर, आसाम, कच्छ हे प्रदेशही पाकिस्तानात जाण्याची वेळ आली आहे. याचेही कारण तेच. विश्वकल्याण, सत्य, जागतिक न्याय, यांवर राष्ट्रीय स्वार्थापेक्षा आमच्या नेत्यांची जास्त निष्ठा आहे. याचा अर्थ इतकाच की, त्या तत्त्वाचा ते उद्घोष करीत असतात. हाच तर हिंदु- समाजाचा आज हजारो वर्षांचा रोग आहे. 'जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत' या तत्त्वाचा मुखी उद्घोष आणि प्रत्यक्षात काही मानवांची सावलीसुद्धा घ्यावयाची नाही इतकी विषमता. सत्य, अहिंसा, समता, न्याय यांचा पाठ म्हणणाऱ्या काँग्रेजनांची हीच स्थिती आहे. रोजच्या कारभारात, निवडणुकीच्या काळात, सत्ताप्राप्तीच्या समयी त्यांना या तत्त्वांची आठवणही राहात नाही. मुस्लीम लीग जातीय आहे, अराष्ट्रीय आहे असे शंभर वेळा तरी दरसाल ते म्हणतात; पण निवडणुका जवळ आल्या की तिच्याशी हातमिळवणी करण्यात आपण राष्ट्रनिष्ठेशी प्रतारणा करीत आहो असे त्यांना वाटत नाही. निधर्मी म्हणून पुकारलेल्या राज्यात फत्त हिंदूंपुरतेच कायदे करण्यात काही असत्य आहे, काही अन्याय आहे, अशी शंकासुद्धा काँग्रेननेत्यांना येत नाही. सारांश काय, आपापली संस्थाने व राज्ये टिकावी म्हणून आक्रमकांपुढे जे धोरण मागल्या काळी हिंदुराजे, सरदार, मिसालदार, संस्थानिक अवलंबीत असत त्यात आज फारसा फरक पडलेला नाही. पूर्वी राजसत्ता होती, आता लोकसत्ता आहे; पण लोकसत्तेत निवडणूक ही सत्ताधाऱ्यांना तितकीच लाचार व भ्रष्ट बनविते, राष्ट्रनिष्ठेला तीही तसाच सुरुंग लावते हे स्पष्ट आहे. मुस्लीम लीग, आसामात घुसणारे पाकिस्तानी, लूटमार, बलात्कार, अत्याचार करणारे मुस्लीम गुंड यांच्यापुढे लाचारी पतकरून काँग्रेसने हे स्पष्ट केले आहे.

धर्मांतर हे राष्ट्रांतर-
 मुस्लीमांप्रमाणे ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या बाबतीतले काँग्रेसचे धोरणही असेच राष्ट्रविघातक आहे. वाटेल त्या वाममार्गांनी हे मिशनरी हिंदूंचे धर्मांतर घडवितात व त्या धर्मांतरित समाजाला राष्ट्रद्रोही बनवितात, हे आता सूर्य- प्रकाशाइतके स्वच्छ झाले आहे. महात्माजींनी अत्यंत स्पष्ट शब्दांत हे सांगितलेले आहे. 'मिशनऱ्यांचा हेतू एकच आहे. हिंदुधर्माचा पाया उखडून तो समूल नष्ट करून तेथे दुसरा धर्म स्थापिणे हा तो हेतू होय. माझ्या हाती सत्ता असती तर मी कायद्याने हे धर्मांतर बंद पाडले असते. अज्ञानी हिंदुसमाजाचा असा फायदा घेणाऱ्या वृत्तीचा मला तिटकारा वाटतो.' जे. सी. कुमारप्पा यांनी मिशनऱ्यांबद्दल हेच उद्गार काढले आहेत. 'मिशनऱ्यांचा धर्मप्रचार असाच चालला तर भारतात लवकरच एक ख्रिस्तिस्थान निर्माण होईल' ही भीती सभापती अनंतशयनम अय्यंगार यांनीही व्यक्त केली आहे. (मसुराश्रम- विश्वकल्याणमाला पत्रक क्रमांक ४, ५, ६, ७- यांच्या आधारे.) डॉ. वेरियर एलविन हे एक इंग्रज पाद्री आहेत. त्यांनी, 'मिशनऱ्यांनी जे धर्मातराचे राष्ट्रद्रोही कार्य चालविले आहे त्याला, भारतीयांनी सावध होऊन वेळीच आळा घातला नाही तर सर्व आदिवासी जनता अराष्ट्रीय होऊन भारताच्या कुशीत ती एक कट्यार घुसेल,' असा इषारा दिला आहे. कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी आपल्या आत्मचरित्रात आपले हेच मत ठायी ठायी प्रकट केले आहे. ते तर म्हणतात की, 'ख्रिस्ती झाल्यामुळे अस्पृश्य समाजाची कोणतीच उन्नती झालेली नाही. ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सर्व जातिभेद, अस्पृश्यता या बाटलेल्या लोकांत कायम ठेविली आहे. अस्पृश्यांना चर्चमध्ये प्रवेश मिळत नाही आणि इतर जातींना चर्चमध्ये वेगवेगळ्या बाकांवर बसावे लागते.' (माझ्या आठवणी व अनुभव, पृ. २१३, ३०२) नियोगीसमितीचा अहवाल तर प्रसिद्धच आहे. धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर होय हे समितीने निर्विवादपणे सिद्ध केले आहे. असे असूनही मिशनऱ्यांच्या या राष्ट्रद्रोही धार्मिक आक्रमणाला पायबंद घालण्याची बुद्धी काँग्रेसनेत्यांना होत नाही. आपल्या हाती कायदा नाही म्हणून महात्माजींना वाईट वाटत होते. त्यांच्या अनुयायांच्या हाती तो आहे; पण ते निधर्मी आहेत ! हिंदुधर्मीयांखेरीज इतर धर्मीयांना दुखविणे त्यांच्या अहिंसेत, उदात्त विचारसरणीत बसत नाही. युकॅरिस्ट काँग्रेसचे प्रतिनिधी 'हिंदुधर्मीयांचे धर्मांतर करण्याची ही अभूतपूर्व संधी आहे.' अशा घोषणा करीत भारतात आले होते. त्या काँग्रेसला बंदी वालणे तर लांबच राहिले; उलट सर्व भारतसरकारने, हिंदुधर्मश्रेष्ठींपुढे कधी वाकणार नाहीत इतके वाकून, त्यांचे स्वागत केले. त्या वेळी सरकारने तुरुंगात घातले ते युकॅरिस्ट काँग्रेसला विरोध करणाऱ्या हिंदूंना. राष्ट्रद्रोही मिशनऱ्यांना नव्हे. कारण भारत सरकार निधर्मी आहे ! नागालँडमध्ये ब्रिटिश सरकारने हिंदी नागरिकांना प्रवेश करण्यास बंदी घातली होती. तेथे फक्त ख्रिस्ती मिशनऱ्यांना मुक्त संचार होता. आश्चर्याची गोष्ट अशी की स्वातंत्र्यानंतरही भारत सरकारने असेच निर्बंध कायम ठेविले आहेत. भारतीय नागरिकांना नागालँडमध्ये प्रवेश करण्यास आजही बंदी आहे. (किर्लोस्कर जून ६६- ले. पंडित) ख्रिस्ती बॅप्टिस्ट मिशनने गेल्या पन्नास वर्षांत धर्मांतर करून जे राष्ट्रांतर घडविले आहे ते. भारतीय नागरिक कदाचित बिघडवितील ! धर्मांतरितांची व राष्ट्रद्रोह्यांची जपणूक हे तर निधर्मीपणाचे प्रधान लक्षण !

ध्येयनिष्ठांची संघटना :
 भारताचे भवितव्य घडविणारी काँग्रेस ही सर्वात मोठी शक्ती, तीच अशी अत्यंत अराष्ट्रीय, जातीय व पराकाष्ठेची स्वार्थी व सत्तैकदृष्टी झाल्यामुळे या भूमीत अपुरी राहिलेली धार्मिक व सामाजिक क्रान्ती पुरी करून राष्ट्रनिष्ठा व लोकशाही यांची तत्वे अखिल भारतीय समाजात खोलवर रुजविण्याचे कार्य तिच्या हातून होणे कालत्रयी शक्य नाही. या कार्यासाठी ध्येयनिष्ठ समाजसेवकांची एक प्रचंड संघटना उभी करणे अवश्य आहे. आणि काँग्रेसमध्ये ध्येयवाद आज औषधालासुद्धा राहिलेला नाही. नैतिक धैर्य, स्वार्थत्याग, ध्येयवाद या दृष्टीने काँग्रेस व काँग्रेस सरकार आज किती खालच्या पातळीवर गेली आहेत याचे काँग्रेसच्या नेत्यांनीच सविस्तृत वर्णन करून ठेवलेले आहे आणि काँग्रेसच्या योजनांचे मूल्यमापन करणाऱ्या ज्या समित्या त्यांच्या अहवालांची पाने तर यांनीच भरलेली आहेत. राष्ट्राचा उत्कर्ष करण्यासाठी, साम्राज्य संघटित करण्यासाठी व सामाजाचे सामर्थ्य वृद्धिंगत करण्यासाठी ध्येयवाद ही शक्ती अवश्य असते आणि तिचाच काँग्रेसमधून संपूर्ण लोप झाला असल्यामुळे त्या ध्येयाच्या सिद्धीसाठी दुसरी तशीच अत्यंत प्रभावी अशी संस्था निर्माण करणे अवश्य आहे. त्या दृष्टीने पाहता विश्वहिंदुपरिषद ही नुकतीच स्थापन झालेली संस्था डोळ्यांपुढे येते. म्हणूनच हिंदुसमाज संघटित करण्यासाठी अशा संस्थेने कोणत्या मार्गाने गेले पाहिजे त्याचे दिग्दर्शन या लेखात करण्याचे ठरविले आहे.

अजूनही अपात्रच :
 हिंदुसमाजातील धर्मशास्त्रज्ञांनी गेल्या हजार दीड हजार वर्षे फुटीरवृत्तीचा परिपोष केला आहे. समाजातील एक घटक दुसऱ्यापासून तोडून काढण्यातच सर्व धर्म साठविला आहे, अशी त्यांची कल्पना होती. या समाजातील सर्व जातिवर्णाचे लोक कोणत्याही कारणाने एकत्र येणे ही कल्पनाच त्यांनी अशक्य करून टाकली. परपस्परांत विवाह तर अशक्यच; पण सहभोजन हेसुद्धा पाप ! इतकेच नव्हे तर एका मंदिरात किंवा मठात सर्व हिंदूंनी भजन-कीर्तनासाठी येणे हेसुद्धा निषिद्ध. पण इतकी विघटना करूनही त्या महामूढ धर्मशास्त्रज्ञांचे समाधान झाले नाही. ब्राह्मण- क्षत्रियादि श्रेष्ठवर्णीयांना अस्पृश्यांची सावलीही त्यांनी वर्ज्य केली. यामुळेच हिंदुसमाज हा समाज या पदवीला राहिला नाही व अजूनही तो त्या पदवीला अपात्रच आहे. २० जून ६६ च्या टाइम्समध्ये एक बातमी आहे; अहमदाबादच्या स्वामीनारायण मंदिरात त्या दिवशी सुप्रीम कोर्टाच्या निवाड्याअन्वये अनेक हरिजनांना प्रवेश मिळाला. हरिजनांचा हा दावा १८ वर्षे चालू होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटनेअन्वये हरिजनांना मंदिरप्रवेशाचा हक्क मिळाला असूनही एका मंदिरात प्रवेश मिळविण्यासाठी त्यांना १८ वर्षे झगडावे लागले. स्पृश्य हिंदुसमाजात अस्पृश्यांविषयी किती जवळीक आहे, आपण सर्व एकधर्मीय आहो, म्हणून आपण संघटित झाले पाहिजे ही भावना त्यांच्यात कितपत रुजली आहे त्याचे हे गमक आहे. अस्पृश्यांनी ही गलिच्छ कामे करण्याचे नाकारले म्हणून त्यांच्या वस्तीवर धाड घालून बायकापोरांना मारहाण करून त्यांच्या घरादारांना स्पृश्य समाजाने आगी लावल्याची उदाहरणे वरचेवर ऐकू येतात. अशा स्थितीत डॉ. आंबेडकरांच्या हजारो अनुयायांनी धर्मांतर केले तसे पुनः पुनः घडत राहिले तर त्यात नवल वाटण्याजोगे काही नाही. आदिवासी लोकांचा प्रश्न असाच आहे. इतके दिवस या जमाती जागृत नव्हत्या. त्यामुळे त्या हिंदुसमाजात कशा तरी राहिल्या. तरी ख्रिस्ती मिशनऱ्यांनी या जमातीतच आपले कार्य सुरू करून सहस्र, लक्षसंख्येने त्यांना वाढविले आणि धर्मातराबरोबर त्यांचे राष्ट्रांतरही घडविले. पाऊणशे वर्षापूर्वी नागा प्रदेशात एकही मिशनरी नव्हता व एकही माणूस ख्रिस्ती झाला नव्हता. त्या वेळी पाश्चात्यविद्या सर्व भारतात पसरली होती व धर्मक्रान्तीची आवश्यकताही बऱ्याच सुशिक्षितांना पटली होती. त्याच वेळी हिंदूंचे शंकराचार्य, इतर मठाधिपती, किंवा वारकरी, रामदासी, नाथपंथी, रामानुज, वल्लभ, हे संप्रदाय इ. पथांतील धर्मधुरीण त्यांच्यांत जाऊन राहिले असते तर ती जमात हिंदुधर्माला पारखी झाली नसती आणि भारताची शत्रू झाली नसती. आज पण या धर्मधुरीणांना त्यांची सावली घेणेही पाप वाटत असे व अजूनही वाटते. त्यामुळे तेथे ते गेले नाहीत; पण येशूचे अनुयायी तेथे गेले आणि त्यांनी हिंदुसमाजाचा एक लचका तोडून भारतापुढे एक बिकट समस्या निर्माण करून ठेवली आहे आणि हिंदुसमाजाचे धुरीण वेळीच जागे झाले नाहीत तर हाच क्रम पुढे चालून अनेक आदिवासी जमाती, हिंदुधर्माला व भारतराष्ट्राला पारख्या होतील. गेल्या जानेवारीत प्रयागला बहुसंख्य हिंदुधर्मधुरीण एकत्र आले होते. त्यांनी हे कार्य शिरावर घेतले पाहिजे. त्यांनी हिंदुसमाजाला वेळीच जागे केले पाहिजे; पण वेळीच जागे करावयाचे म्हणजे काय करावयाचे ? तेच आता सांगांवयाचे आहे.

पुण्याई :
 समाज संघटित कशाने होतो व विघटित कशाने होतो याचे विवरण या लेखमालेतील पहिल्या लेखापासून केले आहे. आणि हिंदुसमाज विघटित कसा व का होत गेला हेही विस्ताराने दाखविले आहे. ती विघटनेची कारणे म्हणजेच शेकडो वर्षे समाजमनात दृढपणे खोल रुतून बसलेली निवृत्ती, शब्दप्रामाण्य, जातिभेद, अस्पृश्यता, व्यक्तिगत मोक्षकल्पना, दैववाद, कर्मकांड इ. अधर्मतत्त्व नष्ट करून राष्ट्रनिष्ठा, व्यक्तिस्वातंत्र्य, समता, प्रवृत्तिवाद, प्रयत्नवाद, विज्ञाननिष्ठा, बुद्धिप्रामाण्य, समष्टिधर्म यांचे संस्कार केले तरच हिंदुसमाज संघटित होईल; पण हे काम नुसत्या व्याख्यानाने होणार नाही. व्याख्यात्याच्या शब्दांना काही पुण्याई असेल तरच त्यांचा परिणाम होतो. आज शेकडो तरुण राष्ट्र, विज्ञान, धर्म, तत्त्वज्ञान, इतिहास, समाजशास्त्र यांचे सम्यक अध्ययन करून आदिवासी, विमोचित (पूर्व गुन्हेगार) जाती, अस्पृश्य, अज्ञ, रूढिग्रस्त, अंध, दीन, दलित, अनाथ यांच्यात जाऊन राहतील, त्यांच्या सुखदुःखांची चिंता वाहतील, खाणे, पिणे, इतर आचार या दृष्टीने त्यांच्याशी एकरूप होऊन जातील तरच त्यांच्या शब्दांना पुण्याई येईल आणि अशा समर्थ वाणीने ते बोलले तरच त्यांना रूढ धर्म नष्ट करून नव्या धर्माचे, राष्ट्रीयतेचे, लोकशाहीचे संस्कार या लोकांच्या मनावर करता येतील आणि यातून संघटित व समर्थ हिंदुसमाज निर्माण होईल.

मिशनरी- आदर्श :
 या तरुण हिंदुधर्मप्रवक्त्यांनी मिशनऱ्यांप्रमाणे कार्य केले पाहिजे असे आज ७०-८० वर्षे सांगितले जात आहे. आमच्या सुशिक्षित तरुणांनी मिशनऱ्यांप्रमाणे समाजात जाऊन राहिले पाहिजे, असे टिळक म्हणत असत. त्यानंतरच्या काळात ज्यांनी ज्यांनी हिंदुसमाजाची सेवा करण्याचे व्रत घेतले व त्यासाठी संस्था स्थापन केल्या त्यांनी त्यांनी पाश्चात्य मिशनरी हाच आदर्श मानला आहे. स्वामी विवेकानंदांनी आपल्या संस्थेला 'रामकृष्ण मिशन' असे नाव दिले. गजाननराव वैद्य यांच्या संस्थेचे नाव 'हिंदु मिशनरी सोसायटी' असे आहे. केरळमध्ये लाखांनी शुद्धी घडवून आणणारी संस्था म्हणजे 'केरळ हिंदुमिशन'. विमोचित जमातींचा उद्धार करण्यासाठी स्थापन झालेली संस्था म्हणजे 'गाडगे- महाराज मिशन'. जयसिंगपूरजवळचे शशिकला सॅनिटोरियम त्यागबुद्धीने चालविणारे डॉ. भिर्डी यांचा गौरव करताना, मिशनरीवृत्तीने ते काम करतात, असे म्हटले जाते. पंढरपूरच्या अनाथ बालकाश्रमाचे ध्येयवादी, थोर संचालक वि. सी जव्हेरे यांचे 'महाराष्ट्राचे मिशनरी' असे वर्णन वृत्तपत्रे करतात. तेव्हा महाराष्ट्राने व भारतानेही त्याग, ध्येयवाद, लोकसेवा, स्वधर्मनिष्ठा यांचा 'मिशनरी' हा आदर्श मानला आहे. ते तसे मानणे हे सयुक्तिकही आहे; पण तो आदर्श ठेवून चालावयाचे तर त्या आदर्शाचे स्वरूप आपण साकल्याने अवलोकिले पाहिजे. अभ्यासिले पाहिजे. त्यावाचून त्याचे सामर्थ्य आपल्या ठायी येणार नाही.
 गेली चारशे वर्षे युरोपचा सारखा उत्कर्ष होत आहे. त्याचे श्रेय जितके तिकडील शास्त्रज्ञ, संशोधक, राष्ट्रीय नेते, मुत्सद्दी यांना आहे तितकेच युरोपातील धर्मसुधारक व धर्मक्रान्तीचे प्रणेते यांनाही आहे. चौदाव्या शतकाच्या अखेरपर्यंत ख्रिस्ती धर्म हा त्या वेळच्या हिंदुधर्मासारखाच अधोगामी होता. जॉन हस्, लूथर, वायक्लिफ इ. धर्मसुधारकांनी त्यांतील निवृत्ती, कर्मकांड, शब्दप्रामाण्य ही जळमटे नष्ट केली म्हणून युरोपचे मत त्या विकृत धर्मातून मुक्त झाले; पण याहीपेक्षा जेसुइट, मेथॉडिस्ट, क्वेकर, साल्व्हेशन आर्मी या पंथांनी जे कार्य केले ते येथे अभिप्रेत आहे. त्या वेळचा समाज अत्यंत विषम होता. आणि समाजातील बहुसंख्य वर्ग दीन, दलित, अनाथ, रंजले-गांजले असेच असत. या पंथांच्या संस्थापकांनी व त्यांच्या हजारो अनुयायांनी या लोकांच्या सेवेचे व्रत घेतले आणि त्यांच्यात राहून, त्यांच्याशी एकरूप होऊन त्यांच्या मनावर खऱ्या धर्माचे, समतेचे, बुद्धिप्रामाण्याचे संस्कार केले व त्यांना अन्यायाच्या प्रतिकाराचे शिक्षण देऊन, त्यांच्यात चैतन्य निर्माण करून त्यांना पुन्हा जीवनात सुप्रतिष्ठित केले. त्यांच्या जीवनाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली व त्यांना राष्ट्राचे खरे नागरिक बनविले. हे कार्य त्यांनी केले नसते तर युरोपची प्रगती झाली नसती, तेथे राष्ट्रवाद, लोकसत्ता यांना यश आले नसते. ज्या देशात बहुसंख्य समाज दीनदलित आहे, दारिद्र्याने गांजलेला आहे, मुकाट्याने अन्याय सहन करतो आहे, अंधरूढींनी ग्रस्त आहे, तेथे कसले राष्ट्र नी कसली लोकसत्ता !
 हिंदुस्थानात हिंदुसमाजाची अशी स्थिती आहे. गेल्या शंभर-सव्वाशे वर्षांत पालट झाला, परिवर्तन झाले ते अल्पसंख्य सुशिक्षितांत झाले. त्यांनी ते लोण समाजाच्या सीमेपर्यंत पोचविले नाही तर हिंदुसमाज संघटित होणार नाही आणि हे कार्य मिशनरी पद्धतीने केले पाहिजे.

मिशनरी कार्यपद्धती :
 लोकसेवेतून धर्मप्रसार हे मिशनऱ्यांचे प्रधान लक्षण आहे. औषध हे बायबलचे वाहन आहे, असे मिशनरी म्हणतात. ते जेथे जातात तेथे शाळा व दवाखाने उघडतात, शक्य तर रुग्णालयेही उभी करतात आणि या सेवेमुळे लोकांची त्यांच्यावर भक्ती जडल्यावर ते प्रथम धर्मोपदेश व नंतर धर्मांतर घडवितात. आज शेकडो वर्षे त्यांनी या मार्गाचा अवलंब केला आहे. आता अलीकडे त्यांनी एक नवीन उपक्रम आरंभिला आहे. ते ज्या परगण्यात जातील. तेथल्या लोकांच्या योगक्षेमाची, ऐहिक उत्कर्षाची चिंता ते वाहतात आणि त्यासाठी सहकारी तत्त्वावर समित्या स्थापन करून गावच्या लोकांना स्वावलंबी, संघटित व सुखी समाज निर्माण करण्याचा मार्ग दाखवितात. याचा अर्थ असा की, मिशनरी हा त्या गावाचा सर्व दृष्टींनी नेता होतो, कर्णधार होतो. यासाठी केवढी ध्येयनिष्ठा, सेवावृत्ती व त्यागभावना अवश्य आहे याची सहज कल्पना येईल! हे हिंदूंना शक्य आहे काय ?
 मिशनऱ्यांचे मुख्य कार्य म्हणजे धर्मांतर घडवून आणणे हे होय असा आपल्याकडे समज आहे. तो खोटा आहे असे नव्हे; पण स्वदेश व ख्रिस्ती समाज सोडून ते बाहेर जातात तेव्हा धर्मांतर हे त्यांचे उद्दिष्ट असते; पण ते स्वसमाजात, ख्रिस्ती देशांत जेव्हा असतात तेव्हा धर्मांतराचा प्रश्न उद्भवतच नाही. वर जे मेथॉडिस्ट, क्केकर इ. पंथ सांगितले त्यांनी प्रारंभी स्वदेशातील दलित समाजाची जी सेवा केली तिचे उद्दिष्ट धर्मांतर हे असणे शक्यच नव्हते. अनाथ, निराश्रित, दीन, दरिद्री, परित्यक्त, पतित, गुन्हेगार यांच्यात मिसळून त्यांच्यावर खऱ्या धर्माचे संस्कार करून त्यांना जीवनात पुन्हा सुप्रतिष्ठित करणे हे त्यांचे खरे कार्य होते आणि आहे.

शत्रूची विद्या :
 भारतातील मिशनरी हे हिंदुधर्माचे व भारतराष्ट्राचे शत्रू आहेत असे वर एके ठिकाणी सांगितले आहे. ते तसे आहेत याबद्दल शंका नाही; पण येथे आपण प्रामुख्याने विचार करीत आहोत तो स्वसमाजाच्या उद्धारार्थ मिशनऱ्यांनी भिन्नभिन्न ख्रिस्ती धर्मपंथांनी जे अलौकिक कार्य केले त्याचा व विशेषतः त्यांच्या कार्यपद्धतीचा. लो. टिळक, स्वामी विवेकानंद यांनी त्यांचा आदर्श पुढे ठेवण्यास सांगितले ते या दृष्टीने. तरुणपणीच धर्मसेवेची दीक्षा घेऊन, आमरण ब्रह्मचर्य पाळून किंवा संसारातील दारिद्र्य पतकरून, अत्यंत निष्ठेने, प्रसंगी प्राणार्पणाचीही सिद्धता ठेवून अनाथ, अपंग, दीन, दलित यांची सेवा करण्याचे व्रत चालविणे ही सामान्य गोष्ट नाही. भारतात येणारे मिशनरी आपल्याला शत्रुसम असले तरी त्यांच्या या त्यागवृत्तीचा अभ्यास आपण केला पाहिजे. विष्णुशास्त्री चिपळूणकर हे इंग्रजांचे पक्के द्वेष्ठे, हाडवैरी; पण राष्ट्रनिष्ठा आपण त्यांना गुरू करूनच शिकली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. त्याच न्यायाने आपण धर्मसंघटना करताना मिशनऱ्यांना गुरू केले पाहिजे. नागाप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश यांतील गहन अरण्यांत, सर्व अर्वाचीन सुखसोयींचा त्याग करून अगदी रानटी अशा परक्या जमातीत पन्नास पन्नास वर्षे राहून त्यांच्यांत धर्मप्रसार करणे यासाठी केवढी धर्मनिष्ठा, केवढे राष्ट्रप्रेम, केवढा मनोनिग्रह, केवढी त्यागबुद्धी अवश्य आहे याचा प्रत्येक भारतीयाने विचार केला पाहिजे ! असो. स्वसमाजात मिशनरी कसे कार्य करतात याची काही उदाहरणे देतो म्हणजे ही कल्पना स्पष्ट होईल.

फादर जिमी :
 नोव्हास्कोशियामधील कॅनसो या गावी १९२० च्या सुमारास रेव्ह. रॉ. जेम्स टॉमकिन्स- तथा फादर जिमी- हे धर्मगुरू म्हणून गेले व दहा-पंधरा वर्षांत त्यांनी तेथे क्रान्ती घडवून आणली. हा सर्व गाव कोळ्यांचा असून मच्छीमारी हा त्यांचा धंदा; पण ते सर्व सावकारी पाशांमुळे पिढ्यान् पिढ्या कर्जबाजारी होते. सावकारच व्यापारी होते. ते तेथील कॉड मासा सात पैशाला विकत घेत व शहरात सत्तर पैशाला विकीत. फादर जिमी यांनी वर्षभर कोळ्यांत राहून त्यांना ही सर्व आर्थिक यंत्रणा समजावून दिली आणि प्रथम दोन आणे वर्गणी ठेवून हळूहळू त्यांच्याकरवी सहकारी पेढी स्थापन केली. हळूहळू कोळी कर्जमुक्त झाले. स्वतः शहराशी व्यापार करू लागले व आता कॅनसो गावाचे मोठे संपन्न शहर झाले आहे. फादर जिमी यांनी, सहकारी पेढी स्थापन झाल्यानंतर, धर्मप्रवचनास प्रारंभ केला. प्रारंभी ती प्रवचने स्वावलंबन, सहकार, अन्यायाचा प्रतिकार, इहलोकीचे सुख यांवर होती. 'तुम्ही जडवादी आहात' अशी त्यांच्यावर कोणी टीका केली तर ते उत्तर देत की, 'स्वतः जीजसही रिकाम्या पोटावर प्रवचने करीत नसे.' आज मिशनरी कार्याचा नियमच झाला आहे. आपल्या लोकांच्या योग- क्षेमाची ते प्रथम चिंता वाहतात, त्यातून धर्मोपदेश करण्याचा हक्क निर्माण करतात आणि मग धर्मव्याख्यान करतात. सहकारी पेढ्या यशस्वी करण्यास नेता किती निर्लोभ, निःस्पृह व निर्मळ असावा लागतो याची आपल्याला सहज कल्पना येईल. भारतातील सहकारी पेढ्यांचे काय चालले आहे, याकडे एकदा नजर टाकल्यास निर्लोभ नेतृत्वाचे महत्त्व सहज ध्यानात येईल. मिशनरी असे नेते आहेत म्हणूनच ते समाजाला सहकार शिकवू शकतात व त्या पायावर धर्मनिष्ठा दृढ करतात. पेरू देशातील अँडीज पर्वताच्या कुशीत पूनो हे ३०-३५ हजार वस्तीचे गाव आहे. तेथे फादर डॅन यांनी याच मार्गाने आर्थिक व धार्मिक क्रान्ती घडविली. 'फादर डॅनस मनी मिरॅकल' म्हणूनच ती प्रसिद्ध आहे. 'जे लोक कर्जात बुडालेले आहेत, ज्यांना भाकरीची चिंता आहे त्यांना उच्च धर्मतत्त्व सांगण्यात अर्थ नाही' असे फादर डॅन नेहमी म्हणत. पूनो गाव अत्यंत दरिद्री होता. झोपडपट्टीतच सर्व लोक राहात. त्यांना सहकाराची कल्पनासुद्धा प्रथम मानवेना. कारण प्रारंभीचे भांडवल तरी कोठून आणावयाचे आणि ते संभाळील असा विश्वासू माणूस कोठून आणावयाचा ? तेथेही आण्या- दोन आण्यांच्या भांडवलापासूनच फादर डॅन यांनी प्रारंभ केला व विश्वस्त ते स्वतः झाले. आज पेरू देशात कमीत कमी दोनशे गावांत अशा पेढ्या स्थापन झाल्या असुन ती गावे समृद्ध झाली आहेत. कम्युनिस्टांचा प्रथमपासूनच या सहकारचळवळीला विरोध होता. कारण कामगार, शेतकरी, कोळी यांना सुस्थिती प्राप्त झाली तर भांडवलदार, जमीनदार यांच्याविरुद्ध ते भडकत नाहीत ही त्यांना चिंता असते. त्यांनी या सहकारी पेढ्यांत स्वतः शिरून त्या मोडण्याचा प्रयत्न केला; पण तेथे त्यांचा मुखभंग झाला. कारण फादर डॅन यांनी प्रत्येक गावात निर्लोभ नेतृत्व निर्माण केले होते.

युनीस वीव्हर :
 डोना युनीस ही ब्राझीलमधील एका खेड्यातील नऊ वर्षांची मुलगी. त्या वेळी महारोग्यांची सर्वांना भयंकर भीती वाटे. रस्त्याने त्यांची माळका भीक मागत जाई तेव्हा रस्त्यावर शिळेपाके अन्न ठेवून लोक भराभर दारे लावून घेत. ती माळका गेल्यावर मग दारे उघडीत. १९१६ साली या नऊ वर्षांच्या मुलीने त्या माळकेत आपल्या शेजारच्या मैत्रिणीला पाहिले आणि तिला जबरदस्त धक्का बसला. त्याच क्षणी महारोगनिवारणार्थ आयुष्य वाहण्याचा तिने संकल्प केला. नवव्या वर्षी ! मोठी झाल्यावर ती मेथॉडिस्ट पंथात शिरली व डॉ. अँडरसन वीव्हर या मिशनऱ्याशी तिचा विवाह झाला. नंतर तिने आपल्या कार्याला प्रारंभ केला. तिचे मुख्य धोरण हे की, महारोग्यांच्या मुलांच्यासाठी घरे उभी करून त्यांना आईबापापासून दूर करावयाचे व अशा रीतीने त्या रोगाचा त्यांना संसर्गच होऊ द्यावयाचा नाही. महारोग हा आनुवंशिक रोग नाही हे तिने वैद्यकीय संशोधनाने सिद्ध करून दिले आणि अशा रीतीने महारोग्यांच्या पुढल्या पिढीला बालवयातच मुक्त करण्याची चळवळ सुरू केली. ब्राझीलचे अध्यक्ष, प्रांतोप्रांतीचे गव्हर्नर, महिलामंडळे यांच्यापुढे व्याख्याने देऊन युनीस वीव्हर यांनी जागृती केली. हे सर्व लोक पिढ्यान् पिढ्यांचे दैववादी होते. पण सौ. वीव्हर यांनी त्यांच्या ठायी उत्साह निर्माण केला. ते आता त्यांना डायनामोच म्हणतात. १९३५ साली महारोग्यांच्या मुलांचे पहिले घर उभे झाले. आज ब्राझीलमध्ये तशी १७० घरे आहेत आणि २०,००० मुले त्यांत राहतात. ही मुले त्या किळसवाण्या रोगापासून पूर्ण मुक्त असतात आणि त्यांच्या मुलांतही ही रोगबीजे दिसत नाहीत हे युनीस वीव्हर यांनी सिद्ध करून दिल्यामुळे आता त्या मुलांना समाजात सर्वत्र मुक्त प्रवेश मिळतो. त्यांचे विवाहही समाजात होतात.

गावाचे मातापिता :
 कॅनडामधील ब्रिटिश कोलंबिया परगण्यात व्हँकुव्हर नावाचे लहानसे बेट आहे. तेथे बहुसंख्य वस्ती रेड इंडियन लोकांची आहे. डॉ. जॉर्ज डार्वी यांनी टोरँटोला वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर मेथॉडिस्ट पंथात प्रवेश केला. पंथाने त्यांना या बेटातील वेलावेला या गावी पाठविले. ही पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या वेळी व्हँकुव्हरमधील लोक रानटी अवस्थेतच होते. ग्रामीण वैदू हेच तेथले डॉक्टर. औषधे, इंजेक्शने, शस्त्रक्रिया हे सर्व अशुभ, त्यांनी मरीआई कोपते अशी त्यांची श्रद्धा. नव्या डॉक्टराकडून रोगी दगावला तर ते त्याला मारायला उठणार. अशा या परगण्यात पन्नास वर्षांपूर्वी आपल्या तरुण पत्नीला घेऊन डॉ. डार्वी आले व थोड्याच काळात गावाचे मातापिता झाले. वेलावेला गावचे धर्मगुरू तेच, डॉक्टर तेच, न्यायाधीश, पंच तेच, मित्र, सल्लागार सर्व तेच. या पन्नास वर्षाच्या अवधीत त्यांच्या वैद्यकीय नैपुण्यामुळे त्यांना पाचपट पगारावर अनेक ठिकाणी बोलावणी आली होती; पण ते गेले नाहीत. 'हेच माझे घर, येथेच माझे कार्य' असे ते दर वेळी सांगत. त्यांची स्वतःची मुले मोठी झाल्यावर त्यांच्या शिक्षणासाठी सौ. एडना डार्बी यांना त्यांना घेऊन व्हँकुव्हर शहरी जावे लागले. डॉ. डार्बी यांचे आता वय झाले होते, तरी त्यांनी कुटुंबवियोग पतकरला पण सेवात्रत सोडले नाही. पन्नास वर्षे तेथे राहून त्यांनी दुष्ट रूढी, अंधश्रद्धा, दारिद्य, रोग यांशी लढा केला व तो परगणा सतराव्या शतकातून विसाव्या शतकात आणला.

स्वकीय स्फूर्तिस्थाने :
 ही उदाहरणे गेल्या तीस-चाळीस वर्षांतली, पन्नास वर्षांतली आहेत. या सध्याच्या विज्ञानप्रधान जडयुगातही मिशनऱ्यांची धर्मश्रद्धा पूर्वीइतकीच दृढ आहे हे यावरून दिसेल. भारताच्या गेल्या शतकाच्या अखेरच्या नेत्यांपुढे आदर्श होते ते आफ्रिकेत धर्मप्रसारार्थ गेलेले स्टॅनले व लिव्हिंगस्टन, क्वेकर- पथाचे जॉर्ज फॉक्स, एलिझाबेथ फ्राय, साल्व्हेशन आर्मीचे विल्यम बूथ व त्यांची कन्या इव्हँजेलाइन बूथ, हवाई बेटांतील मोलोकाई येथे महारोग्यांची शुश्रूषा करण्यात आयुष्य घालविणारे फादर डामियन, हिंदुस्थानात आलेले झेव्हियर, स्टीफन्स हे जेसुइट, मद्रास प्रांतात काम करणारे जॉन स्कडर व नुकत्याच दिवंगत झालेल्या त्यांच्या कन्या इडा स्कडर- यांचे होते. ज्यांना हिंदुसमाज- संघटना करावयाची आहे, त्यांनी या थोर ध्येयवादी मिशनऱ्यांच्या चरित्रांचा अभ्यास अवश्य करावा. गेल्या शतकात पाश्चात्य भौतिक शास्त्रज्ञ व मिल, स्पेन्सर यांसारख्या बुद्धिवादी पंडितांकडून ज्याप्रमाणे आपल्या नेत्यांना स्फूर्ती मिळाली त्याचप्रमाणे आपल्या धर्मसुधारकांनाही पाश्चात्त्य मिशनऱ्यांचे आदर्श पाहूनच कार्याची प्रेरणा झाली व त्यांनी तशी हिंदुसमाजाची सेवा करण्यासाठी संस्था स्थापल्या. पुढे तशा काही संस्थांची माहिती देतो. त्यांचा अभ्यास धर्मसंघटकांनी अधिकच आस्थेने केला पाहिजे. कारण आपली खरी स्फूर्तिस्थाने ती आहेत. आज भारतात गरज आहे ती तशा संस्थांची व त्यांनी निर्माण केलेल्या त्यागी, ध्येयवादी धर्मप्रवक्त्यांची. मोठीमोठी विद्यालये, आश्रम, मठ स्थापून विश्वहिंदुपरिषदेने बाराबारा वर्षे शिक्षण देऊन, असे लोकांत जन्मभर जाऊन राहणारे धर्मप्रवक्ते तयार केले तरच हिंदुसमाजाची संघटना करण्यात तिल यश येईल.

आर्यसमाज :
 ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या पद्धतीने हिंदुधर्माचा प्रसार करणारी भारतातील पहिली मोठी संस्था म्हणजे 'आर्यसमाज' ही होय. स्वामी दयानंद सरस्वती हे तिचे संस्थापक होत. स्वामी मूळचे सौराष्ट्रातील असून त्यांनी समाजाची स्थापना १८७५ साली मुंबईस केली; पण समाजाच्या कार्याचा खरा प्रसार झाला तो पंजाबात. स्वामीजी खरे धर्मक्रांतिकारक होते. पूर्वीच्या लेखांतून वर्णिलेली हिंदुधर्मातील घातकी तत्त्वे आणि तज्जन्य दुष्ट रूढी यांचे निर्मूलन करावयाचे असा त्यांचा दृढ निश्चय झाला होता. धार्मिक, सामाजिक, राजकीय व शास्त्रीय बाबतीत हिंदुस्थानची उन्नती घडविणे हाच समाजस्थापनेत त्यांचा हेतू होता. समाज जन्मनिष्ठ जातिभेद वा वर्णभेद आणि अस्पृश्यता मानीत नाही. स्त्री व पुरुष यांचा सामाजिक दर्जा समाजाच्या मते सारखाच आहे. समाजातील सर्व सभासद परस्परांत रोटीव्यवहार व बेटीव्यवहार करतात, तसे विवाह घडवून आणण्याचा प्रयत्न असतो. वैयक्तिक मोक्ष हे व्यक्तीचे अंतिम उद्दिष्ट असू नये, समाजसेवा, समाजोत्कर्ष यांतच व्यक्तीचे हित आहे, असे स्वामी सांगत असत. वेद हा एकच धर्मग्रंथ त्यांना मान्य असून उत्तरकाळचे सर्व धर्मग्रंथ ते त्याज्य मानीत. समाज एकेश्वरी पंथाचा असून मूर्तिपूजेला त्यांचा विरोध आहे. यावरून निवृत्ती, व्यक्तिधर्म, जातिभेद, चातुर्वर्ण्य अस्पृश्यता हेच खरे हिंदुसमाजाचे रोग आहेत, आणि भारताच्या उन्नतीसाठी त्यांचा नायनाट केला पाहिजे, अशी स्वामींची निश्चिती होती हे स्पष्ट दिसते.
 हे कार्य साधण्यासाठी आर्यसमाजाने हरिद्वारला गुरुकुल व लाहोरला दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज अशा दोन संस्था स्थापून तेथे अनेक तरुण धर्मप्रचारकांना शिक्षण दिले व नंतर पंजाब व उत्तर प्रदेश मिळून धर्मप्रसारकार्यासाठी तीनशे शाखा स्थापन केल्या. या सर्व शाखांतून लोकसेवेतून धर्मप्रसार करण्याचे मिशनऱ्यांचे धोरणच अवलंबिलेले होते. अनाथांना आश्रय देणे, त्यांच्या योगक्षेमाची व्यवस्था करणे व त्यांना शिक्षण देऊन समाजात सुप्रतिष्ठित करणे हे कार्य आर्यसमाजाचे 'आर्य' मोठ्या निष्ठेने करतात. पतितांची शुद्धी हे तर समाजाचे अत्यंत महत्त्वाचे कार्य होय. हिंदुधर्मातून पतित झालेल्यांना तर समाज शुद्ध करून घेतोच पण मूळच्या इतर धर्माच्या लोकांनाही तो हिंदुधर्माची दीक्षा देतो. मलकाना रजपुतांना स्वामी श्रद्धानंदांनी प्रचंड संख्येने शुद्ध करून घेतले म्हणून तर त्यांना प्राणांस मुकावे लागले. अर्थात त्यामुळे समाजाने आपले धोरण सोडले असे नाही. धर्मासाठी आत्मबलिदान करण्यासही तयार असणारे तरुण 'आर्य' हेच तर समाजाचे मुख्य सामर्थ्य आहे. कोणत्याही संस्थेचे, समाजाचे वा राष्ट्राचे हेच खरे सामर्थ्य होय. (महाराष्ट्रीय ज्ञानकोश.) त्यावरच त्याचे भवितव्य अवलंबून असते.

रामकृष्ण मिशन :
 हिंदुसमाजाच्या पुनर्घटनेसाठी, संघटनेसाठी अशा स्वरूपाचे सामर्थ्य निर्माण करणारी दुसरी मोठी संस्था म्हणजे 'रामकृष्ण मिशन' ही होय. १ मे १८९७ रोजी स्वामी विवेकानंदांनी हिची स्थापना केली. या संस्थेचा हेतू काय, तिचे स्वरूप व कार्यपद्धती काय असावी हे स्वामींनी अमेरिकेत असतानाच आपल्या सहकाऱ्यांना अनेक पत्रे लिहून स्पष्ट केले होते. स्वामींच्या मते हिंदुसमाजाची अस्मिताच नष्ट झालेली आहे. ती पुन्हा उज्जीवित केली पाहिजे; त्याचप्रमाणे या समाजात व्यक्तीला प्रतिष्ठा नाही म्हणून त्याचा अधःपात झाला आहे; असे त्यांचे निश्चित मत होते. ते म्हणतात की, आपला धर्म श्रेष्ठ आहे, पण व्यवहा रात तो मुळीच येत नाही. व्यवहारात त्याला अत्यंत विकृत रूप आले आहे. विषमता, शब्दप्रामाण्य, जन्मनिष्ठ जातिभेद, अस्पृश्यता, निवृत्ती ही आपल्या अधःपाताची कारणे आहेत. हिंदुसमाजात मानवाचे समूहच्या समूह गुलामगिरीत असल्यामुळे तो मृतवत झाला आहे. तेव्हा आता या समाजाचा उत्कर्ष साधावयाचा असेल तर आपल्या प्राचीन धर्मांचे पुनरुज्जीवन केले पाहिजे. सर्व समाजाला समता, स्वातंत्र्य, प्रवृत्ती, कर्मयोग यांचे शिक्षण देऊन दीनदलितांचा, अनाथअपंगांचा, उद्धार केला पाहिजे. ज्या समाजात विधवांचे अश्रू पुसले जात नाहीत, भुकेल्यांना अन्न दिले जात नाही, हीनांना उन्नत होण्याला अवसर नाही तो धर्महीन समाज होय. एक जात, एक वेद व सर्व समाजात सौहार्द हे खरे सत्ययुगाचे, धर्मांचे लक्षण होय. अशा धर्मांचे शिक्षण समाजाला, बहुजनांना देणे हाच भारताच्या उन्नतीचा खरा मार्ग होय. (हिस्टरी ऑफ दि रामकृष्ण मठ अँड मिशन-स्वामी गंभीरानंद, पृ. ७५, १०१-११२).

नवे संन्यासी :
 हे शिक्षण देणे हे सामान्य शिक्षकांचे काम नाही. ध्येयवादी, त्यागी, या कार्याला तनमनधन अर्पण करणारे संन्यासीच हे कार्य करू शकतील अशी स्वामींची निश्चिती होती आणि त्यासाठीच त्यांनी 'रामकृष्ण मिशन'ची स्थापना केली. असे तरुण, विद्याविभूषित संन्यासी धर्मप्रवक्ते तयार करून सर्व भारतात व अन्य देशांतही त्यांना पाठवावयाचे, हे मिशनचे मुख्य काम. मात्र हे संन्यासी जुन्या संन्याशांहून अगदी भिन्न असले पाहिजेत. सर्वत्र दारिद्र्य, अज्ञान, अवकळा, गुलामगिरी यांचे थैमान चालू असताना ते जुने संन्यासपंथी लोक समाजाला अध्यात्म, संसाराची असारता, मायावाद यांचा उपदेश करीत हिंडत. स्वामींच्या मते हा केवळ मूर्खपणा होय. रामकृष्ण आश्रमाचे संन्यासी पूर्ण पाश्चात्य वृत्तीचे पण तितकेच हिंदुत्वनिष्ठ असले पाहिजेत, असे स्वामींचे सांगणे होते. खेड्यापाड्यांत जाऊन समाजात मिसळून नकाशे, मॅजिक लँटर्न, ग्रंथ यांच्या साह्याने त्यांनी ब्राह्मणापासून चांडाळापर्यंत खऱ्या धर्माचे शिक्षण दिले पाहिजे. म्हणजे हे संन्यासी नव्या क्रान्तीचे नेते झाले पाहिजेत. असे संन्यासी तयार करणे हे रामकृष्ण मिशनचे मुख्य उद्दिष्ट होते.
 धर्म आणि समाजसेवा यांचा संबंध आहे, हे गेली हजारो वर्षे हिंदुधर्म शास्त्राला मान्य नव्हतेच; पण आश्चर्याची गोष्ट अशी की स्वामी विवेकानंदांच्या सहकाऱ्यांपैकी कित्येकांना हे मान्य नव्हते. धर्म हा मोक्षाचा, वैयक्तिक उन्नतीचा मार्ग होय, दीनदलितांची सेवा, समाजशिक्षण, समाजाची ऐहिक उन्नती, लोकांच्या योगक्षेमाची चिंता हे धर्मात येत नाही, असे त्यांना वाटे. त्यांनी स्वामींशी यावर अनेक वेळा वाद घातले. रामकृष्णांच्या शिकवणीच्या हे विरुद्ध आहे, असे ते म्हणू लागले; पण स्वामींच्या अलौकिक प्रभावामुळे त्यांचे मतपरिवर्तन होऊन त्यांच्या सर्वच्या सर्व म्हणजे सोळा सहकाऱ्यांनी संन्यासदीक्षा घेऊन मिशनकार्याला प्रारंभ केला.
 आज रामकृष्ण मिशनच्या शाखा सर्व भारतभर व अमेरिका, सीलोन, ब्रह्मदेश या अन्य देशांतही पसरल्या आहेत. दिल्ली, प्रयाग, कानपूर, मद्रास, नागपूर, मुंबई, कोइमतूर, म्हैसूर, विजगापट्टम- सर्वत्र आश्रमांचे जाळे विणलेले आहे. प्रत्येक ठिकाणी प्राथमिक शाळा, प्रशाळा, महाशाळा, औद्योगिक, वैद्यकीय अशी विद्यालये आश्रमाने स्थापलेली आहेत. रुग्णालये बांधलेली आहेत. मुलांसाठी, मुलींसाठी वसतिगृहे काढलेली आहेत. अनाथाश्रम आहेत, सेवाश्रम आहेत. दुष्काळ, पूर, धरणीकंप, साथीचे रोग या आपत्तींच्या वेळी समाजसेवा करण्यासाठी योजना नित्य सिद्ध आहेत आणि यांतून समाजसेवा करून मिशनचे संन्यासी धर्मप्रवचन करीत असतात. वेलूर येथे संस्थेचे मुख्य कार्यालय असून तेथून सर्वं कारभाराचे नियंत्रण होते. प्रारंभी मिशनजवळ थोडेच सन्यासी होते, आज साधारण साडेपाचशे आहेत. मिशनच्या सर्व संस्था हे संन्यासी चालवितात.
 मिशनची स्थापना केल्यावर स्वामीजी ४-५ वर्षांतच इहलोक सोडून गेले; पण सुदैवाची गोष्ट अशी की, त्यांची परंपरा चालविणारे कर्ते पुरुष मिशनला लाभले. स्वामी ब्रह्मानंद, प्रेमानंद, शारदानंद, अभेदानंद, शिवानंद, अखंडानंद यांनी कार्याची धुरा अंगावर घेतली. आज सत्तर वर्षे स्वामीजींच्या समाजनिष्ठ वेदान्तधर्मांचा प्रसार ते भारतभर करीत आहेत.
 आर्यसमाज व रामकृष्ण मिशन यांच्यानंतर धर्मजागृतीचे एवढ्या प्रचंड प्रमाणावर कार्य करणारी अखिल भारतव्यापी अशी संस्था निर्माण झाली नाही. पण लहान प्रमाणावर, प्रांतीय पातळीवर, मिशनरी पद्धतीने कार्य करणाऱ्या अनेक संस्था भारताच्या निरनिराळ्या प्रदेशांत स्थापन झाल्या असून त्या हिंदुसमाज संघटनेचे कार्य करीत आहेत. त्यांच्यापैकी काहींची माहिती देऊन शेवटी या प्रकरणाचा व प्रबंधाचा समारोप करू.

लाखांची शुद्धी :
 'केरळ हिंदु मिशन' ही अशीच एक संस्था आहे. जुन्या त्रावणकोर संस्थानात १९३७ साली ही स्थापन झाली. त्रावणकोरचे महाराज व दिवाण सर सी. पी. रामस्वामी अय्यर यांचा तिला पाठिंबा होता. त्यांनी मुक्त हस्ताने मिशनला द्रव्यसाह्य केले. अस्पृश्य, आदिवासी व दलित हिंदुसमाज यांतील हजारो लोकांना ख्रिस्ती मिशनऱ्यांनी बाटविले होते. त्यांना परत स्वधर्मात घेणे हा संस्थेचा मुख्य उद्देश. आजवर दोनतीन लाख लोकांना मिशनने शुद्ध केले आहे. स्वातंत्र्यापूर्वी धर्मांतरावर माणशी एक रुपया कर असे. स्वातंत्र्यानंतर स्वदेशी सरकारने तो आता ११| रु. केला आहे ! त्यामुळे मिशनच्या शुद्धिकार्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे. तरी मिशनने जोमाने कार्य चालविले आहे. शाळा, देवालये, आयुर्वेदी दवाखाने चालवून धर्मांतराला आळा घालण्याचा मिशनने मोठा प्रयत्न चालविला आहे. सध्या मिशनचे तीनशे पगारी प्रचारक असून सहाशेवर स्वयंकार्यकर्ते आहेत. राजाश्रय संपल्यावर एवढा प्रचंड खर्च चालविणे मिशनला फार जड जात आहे; पण सध्याचे मिशनचे अध्यक्ष आर. वेलायुधन यांनी अत्यंत चिकाटीने कार्य चालविले आहे.

महर्षी शिंदे :
 'भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळी'- 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन' या संस्थेच्या नावावरूनच तिचे स्वरूप ध्यानात येईल. महर्षी कर्मवीर विट्ठल रामजी शिंदे हे तिचे संस्थापक. अमेरिकेतील युनिटेरियन असोसिएशनचे एक प्रतिनिधी रे. डॉ. संडरलंड यांच्या भाषणामुळे प्रथम कर्मवीरांना धर्मसेवेची स्फूर्ती झाली. नंतर प्रार्थनासमाजातील उपासना ऐकून ते संस्कार दृढ झाले व त्या समाजाचे सभासद होऊन धर्मप्रसाराच्या कार्याला वाहून घेण्याचा त्यांनी निश्चय केला. वरील युनिटेरियन असोसिएशनकडून शिष्यवृत्ती मिळवून ते मँचेस्टरच्या कॉलेजमधून धर्मप्रसाराचे शिक्षणही घेऊन आले आणि परत आल्यानंतर प्रार्थनासमाजाच्या साह्याने त्यांनी 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन' या संस्थेची १९०६ साली स्थापना केली. मिशनऱ्यांच्या कार्यपद्धतीचा त्यांनी उत्तम अभ्यास केला होता. त्यामुळे त्याच पद्धतीने त्यांनी आपले कार्य सुरू केले व चालविले. प्रथम त्यांनी मुंबईला परळ येथे अस्पृश्यांसाठी शाळा काढल्यानंतर 'निराश्रित सेवासदन' स्थापून दीन, अस्पृश्य, बेवारशी, अनाथ यांना आश्रय देण्याची सोय केली. पुढे मग दवाखाने, वसतिगृहे, ग्रंथालये यांची स्थापना करून हिंदुसमाजाच्या या विकल अंगाला संस्कृतीच्या कक्षेत आणण्याचे महान कार्य त्यांनी हाती घेतले. महर्षी शिंदे यांना सरकारचे, धनिकांचे व चंदावरकर, भांडारकर यांच्यासारख्या थोर समाजनेत्यांचे चांगले साह्य झाले; पण त्यांना यापेक्षाही मोलाचे साह्य झाले ते त्यांची बहीण व त्यांचे मातापिता यांचे व या कार्याला सर्वस्वी वाहून घेणाऱ्या वामनराव सोहोनींसारख्या तरुणांचे. सर्वस्व वाहणारे लोक हेच खरे राष्ट्राचे बळ होय.
 महर्षीच्या भगिनी जनाक्का या आपली शिक्षिकेची नोकरी सोडून त्यांच्याबरोबर अस्पृश्यांच्या वस्तीत जाऊन राहिल्या. इतकेच नव्हे तर अस्पृश्य, दलित, अनाथ, बेवारशी अशा सर्व मुलांचे त्यांनी अपत्यवत संगोपन केले. या निःस्वार्थी सेवेमुळेच मिशनच्या कार्याला पहिल्यापासून यश आले व मनमाड, इगतपुरी, इंदूर, अकोला, अमरावती, मंगरूळ, मद्रास इ. ठिकाणी मिशनचे आश्रम स्थापन करणे शक्य झाले.

महारवाडा हेच माहेरघर :
 हे कार्य करीत असताना अनंत प्रकारच्या अडचणींना या समाजसेवकांना तोंड द्यावे लागले. अशा तऱ्हेची सेवा ख्रिस्ती मिशनरीच फक्त करतात, हिंदू असे कार्य कधीच करणे शक्य नाही, अशी हिंदुसमाजाची खात्री असल्यामुळे डिप्रेस्ड क्लास मिशनच्या लोकांना अनेक अस्पृश्यांनी ते ख्रिस्ती आहेत व वाढविण्यासाठी आले आहेत असे समजून, आपल्या घरांतून हाकलून लावले. महार, मांग, चांभार यांच्यांत आपसांतही अस्पृश्यता असल्यामुळे एका जातीला हे सेवक शिवल्यानंतर दुसऱ्या जातीचे लोक त्यांना घरात येऊ देत नसत. मुलीला मुरळी म्हणून सोडण्याची रूढी महारांत आहे. ती रूढी निंद्य आहे, ती नष्ट केली पाहिजे असा प्रचार कर्मवीरांनी सुरू केला व काही मुरळ्यांची लग्नेही लावून दिली; पण यामुळे काही ठिकाणचे महार भयंकर चिडले. हा आपल्या धर्मावर (!) घाला आहे असे त्यांना वाटले व त्यांनी कर्मवीरांना मारण्याचाही घाट घातला होता. अशाही स्थितीत 'महारवाडा हेच आमचे माहेरघर' असे महर्षी शिंदे म्हणत. प्राचीन ऋषींची हीच भावना होती. हिंदुसमाजाच्या मनोवृत्तीत कोणती क्रान्ती होणे अवश्य आहे ते विसाव्या शतकातील या ऋषींच्या चरित्रावरून कळून येईल.

कल्याण आश्रम :
 याच पद्धतीने कार्य करणारी सध्याची एक मोठी संस्था म्हणजे मध्यप्रदेशातील जशपूरनगर येथील 'कल्याण आश्रम' ही होय. जशपूरनगर हे रायगढ जिल्ह्यात असून रांचीपासून ११० मैलांवर आहे. या भागात सर्वत्र घनदाट जंगले असून त्यांत गोंड, मुंडिया, खैतिया, कोरवा इ. जमातींचे आदिवासी लोक राहतात. ख्रिस्ती मिशनऱ्यांनी आज पन्नास-साठ वर्षे या प्रदेशात ठाण मांडलेले असून लोकांचे दारिद्र्य, अज्ञान, कर्जबाजारीपणा आणि हिंदुसमाजाची उपेक्षा यांचा फायदा घेऊन त्यांनी आदिवासींना बाटविलेले आहे. हे सर्व हिंदुसमाजाच्या गतशतकांच्या घोर पापांचेच फल आहे; पण त्याचे क्षालन करावे अशी बुद्धी थोडी जागृत झाली असल्यामुळे कल्याण आश्रमासारख्या संस्था निघत आहेत. र. के. देशपांडे हे या आश्रमाचे प्रधान असून मो. ह. केतकर हे संचालक व भीमसेन चोरडा हे मंत्री आहेत. या वन्य प्रदेशात आश्रमाने शाळा, प्रशाळा, महाशाळा काढल्या असून दवाखाने, बँका व छात्रवास यांचीही स्थापना केली आहे. अगदी गरीब आदिवासींना अन्न, वस्त्र, शिक्षण व निवास सर्व मोफत पुरविले जाते. आश्रमाजवळ स्वतःची दोनशे एकर जमीन असून तेथे यांत्रिक पद्धतीने शेती केली जाते व त्या प्रकारचे सर्व शिक्षण आदिवासींना दिले जाते. सर्व शेती तेच करतात. आश्रमाच्या इमारती बांधणे, मंदिरे बांधणे, विहिरी खोदणे ही कामेही आश्रमीय विद्यार्थीच करतात. त्यांच्यापैकी काहींच्या कॉलेजच्या शिक्षणाचीही सोय आश्रमाने केली आहे. ह्या लोकांना भारताचे व नव्या आधुनिक जगाचे दर्शन घडावे म्हणून दिल्ली, काशी, गया, पाटणा या बाजूला सफरीही काढल्या जातात. हिंदुधर्माचे व संस्कृतीचे संस्कार त्यांच्यावर व्हावे म्हणून विजयादशमी, रामनवमी इ. उत्सव केले जातात. दिल्लीला 'अखिल भारतीय आर्य (हिंदु) धर्म सेवा संघ' अशी एक संस्था आहे. आज भारतात सरकारच्या निधर्मी धोरणामुळे विद्यालयांतून धर्मशिक्षण देण्याची सोय काहीच नाही. ती उणीव भरून निघावी म्हणून या संस्थेने 'धर्मपरीक्षा' नावाच्या परीक्षा ठेविल्या आहेत. या परीक्षांत गीता, तुलसीरामायण, भगवान बुद्ध की वाणी, गुरुगोविंदसिंग की वाणी, जैनसिद्धान्त, मीरा, कबीर, सूरदास यांचे साहित्य यांवर प्रश्नपत्रिका असतात. विशारद, रत्न अशा पदव्याही यशस्वी विद्यार्थ्यांना दिल्या जातात. आजपर्यंत पाच लाख विद्यार्थी या परीक्षांना बसले आहेत. हृषीकेश येथे 'गीतारामायण- परीक्षासमिती' अशी समिती असून ती आज तेहतीस वर्षे हेच कार्य करीत आहे. कल्याण आश्रमातील विद्यार्थ्यांना या परीक्षांना बसविले जाते. मध्यप्रदेश सरकारने, ख्रिस्ती मिशनरी वाममार्गाने धर्मांतर घडवून आणतात, बाटलेल्या लोकांना राष्ट्रद्रोहाचे शिक्षण देतात, नागा- भूमीप्रमाणेच झारखंड ही दुसरी भूमी निर्माण करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत, अशा तऱ्हेचे मिशनऱ्यांवर केले जाणारे जे आरोप त्यांची चौकशी करण्यासाठी 'नियोगी समिती' नेमली होती. तिच्यापुढे वरील आरोप सिद्ध करणारे अनेक पुरावे कल्याण आश्रमाने सादर केले. समितीने आश्रमाचे यासाठी स्वतंत्र पत्र पाठवून आभार मानले आहेत. धर्मो रक्षति रक्षितः । हे आश्रमाचे ब्रीदवाक्य आहे.

मसुराश्रम :
 महाराष्ट्रातील मसुराश्रम ही संस्था प्रसिद्धच आहे. धर्मभास्कर मसूरकर महाराज यांनी ती १९२० साली मसूर येथे स्थापन केली. गोव्यातील दहा हजार गावड्यांना त्यांनी शुद्ध करून स्वधर्मांत घेतले तेव्हा खिश्चन मिशनऱ्यांना मोठाच धक्का बसला. कारण त्यांच्या कार्याला हा मोठाच शह होता. तेव्हापासून आजपर्यंत आश्रमाने हजारो लोकांची शुद्धी केली आहे. आश्रमाचा विशेष असा की, शुद्धीनंतर शुद्धीकृतांचे विवाह जमवून आणण्याकडे चालक कटाक्षाने लक्ष देतात. 'जनपद विद्यापीठ' ही आश्रमाची एक अभिनव संस्था आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि मध्यप्रदेश, माळवा या भागांत आश्रम एकेक महिन्याचे हिंदुधर्मशिक्षणवर्ग चालवितो. या वर्गाला येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा जेवणाचा व राहण्याचा खर्च आश्रम करतो. बस्तर संस्थान, छत्तीसगड, सातपुडा, दमण- विभाग येथील वन्य जाती, गोंड, संताळ, कोर्कू, वारली, कोळी या जमाती यांच्यात ख्रिस्ती मिशनऱ्यांचे कार्य फार चालते. त्या लोकांत शिक्षणप्रसार करून, धर्मजागृती करून, प्रसंगी ख्रिस्ती मिशनरी व त्यांचे बाटे हस्तक यांच्या हिंसक आक्रमणाला तोंड देऊनही त्याला आळा घालण्याचे मोठे कार्य आश्रमाने चालविले आहे. मनाचे श्लोक, दासबोध, भक्तिसुधा, गीता इ. धार्मिक ग्रंथांच्या लाखो प्रती काढून आश्रमाने त्या विनामूल्य वाटल्या आहेत. धर्मशिक्षणाचा हा एक मोठा मार्ग आहे. शारीरिक शिक्षणाचे वर्गही आश्रम चालवितो आणि शुद्धिकृतांसाठी मारुतीची मंदिरे स्थापून या मार्गाने हिंदुसंघटना करतो. विनायक- महाराज मसूरकर यांच्या मागे ब्रह्मचारी दत्तमूर्ती यांनी आश्रमाचे काम तितक्याच जोमाने चालविले होते; पण मार्च १९६६ मध्ये ते ब्रह्मीभूत झाले. पण आश्रमाच्या कार्यात खंड पडलेला नाही. ब्रह्मचारी विश्वनाथजी यानी हिंदुसंघटनाचे कार्य मोठ्या धैर्याने व उत्साहाने तसेच चालविले आहे.

वारली पुरोहित :
 बोरिवली येथे १९६० साली 'हिंदुधर्मप्रसारक मंडळ' स्थापन झाले असून ते याच प्रकारचे कार्य करते. ठाणे जिल्ह्यातील डहाणू या गावापासून १० मैलांवर तळसारी हे गाव आहे. त्याच्याजवळ डोंगरपाडा येथे मंडळाने धर्मप्रसाराच्या हेतूनेच आश्रम स्थापिला आहे. ल. र. कुळकर्णी हे या मंडळाचे अध्यक्ष स्वतःच तेथे राहतात. या भागात प्रामुख्याने वारली लोकांची वस्ती आहे. शाळा, दवाखाने, सहकारी पेढ्या, उद्योग केंद्रे स्थापून त्या समाजाशी एकरूप होऊन कुळकर्णी व त्यांचे सहकारी धर्मप्रसार करतात. शुद्धिकार्यावरही त्यांचा भर आहेच. मधून मधून शंभरदोनशेच्या गटाने ते बाटलेल्या लोकांना स्वधर्मात परत आणतात. 'हिंदुधर्मपरिचय' या नावाची तीन पुस्तके श्री. कुळकर्णी यांनी लिहिली असून 'रूढ हिंदुधर्म हा धर्म नसून अधर्म आहे' असे मत त्यांनी मांडले आहे. जातिभेद, चातुर्वर्ण्य त्यांना मुळीच मान्य नाही. तळसारी विभागातील दोन वारली लोकांना याज्ञिकीचे शिक्षण देऊन त्यांनी त्यांना पुरोहित म्हणून मान्यता दिली व संकेश्वर मठाकडूनही त्यांना मान्यता मिळवून दिली. हा अधिकार ब्राह्मणांनाच आहे हे रूढ मत त्यांना अयुक्त वाटते. वारली तरुणांना तो अधिकार देऊन वैदिक समतेचेच त्यांनी पुनरुज्जीवन केले आहे. समाजाच्या उद्धारासाठी केवळ अध्यात्मविचार पुरेसा नाही. दीनदलितांच्या योगक्षेमाचा, अन्नवस्त्राचा प्रथम विचार केला पाहिजे, ही मिशनरी विचारसरणी त्यांना मान्य असून आश्रमाचे कार्य चालविताना तिचाच त्यांनी अवलंब केला आहे. श्री. कुळकर्णी १९२४ सालापासून हिंदुत्वरक्षणाचे कार्य करीत आहेत. आज त्यांचे वय ७३ वर्षांचे आहे.

समष्टिधर्म-
 याच दिशेने, याच मार्गाने, याच मिशनरी पद्धतीने कार्य करणारे एक थोर पुरुष म्हणजे श्रीमंत पाचलेगावकर महाराज हे होत. महाराजांचे चरित्र व कार्य पाहिले म्हणजे दीनदलितांची सेवा करून त्यांच्यावर धर्मसंस्कार करण्याची जी मिशनरी पद्धती तिचे ते आदर्श आहेत असे वाटते. पाचलेगाव, जि. परभणी, मराठवाडा- निजामशाही येथे १९९२ साली महाराजांचा जन्म झाला. त्यांचे मूळचे नाव नरसिंह राजाराम कुळकर्णी. वाटेल त्या सापाचे विष उतरविणे व भूतबाधा, भानामती, चेटुक, मानसिक रोग, वेडेपण इ. व्याधींपासून लोकांना मुक्त करणे यासाठी आज ते प्रसिद्ध आहेत. ही विद्या त्यांना वयाच्या नवव्या वर्षापासूनच प्राप्त झालेली आहे. वडिलांनी लग्न ठरविल्याचे ऐकून ते त्याच वर्षी घरातून पळाले व तपःसाधना, भारताचा प्रवास यात काही वर्षे घालवून त्यांनी १२-१३ व्या वर्षीच समाजजागृतीच्या कार्यास प्रारंभ केला. प्रारंभी ते मोठमोठे यज्ञ घडवून आणीत. त्यांची मंत्रविद्या, निखाऱ्यांवरून पाय भाजू न देता लोकांना चालविण्याची विद्या, त्यांचे निर्भय अमोघ वक्तृत्व व वैराग्यवृत्ती यामुळे लोकांची त्यांच्यावर अपार श्रद्धा बसली व हजारो लोक यज्ञसमारंभाला जमू लागले. याच वेळी महाराज लोकांना समष्टिधर्माचा उपदेश करीत. सध्याचा रूढ धर्म म्हणजे धर्माच्या नावाखाली चाललेला अधर्म आहे, असे त्यांचे मत आहे. प्राचीन हिंदुधर्म हा समष्टिधर्म होता, समाजधर्म होता, तो जाऊन उत्तरकाळात त्याच्या जागी व्यक्तिधर्म आला, त्यामुळे हिंदुस्थानचा अधःपात झाला, अशा तऱ्हेचे प्रतिपादन ते यज्ञप्रसंगीच्या प्रवचनात करीत.
 या प्रवचनांतून ते स्वातंत्र्याचा निःसंदेह पुरस्कार करीत व निजामी राज्यावरही कडक टीका करीत. प्रारंभी निजामाने दरमहा ८००रु. तनखा देऊ करून त्यांना लगाम लावण्याचा प्रयत्न केला; पण महाराजांनी तो झिडकारून लावताच त्याने त्यांना हद्दपार केले. ब्रिटिश हद्दीतही पोलीस त्यांना राहू देईनात म्हणून काही दिवस फ्रेंच नागरिकत्व पतकरून ते पांदेचरीला राहिले होते; पण नंतर ब्रिटिश हिंदुस्थानचे नागरिकत्व मिळवून ते तेथून परत आले व शुद्धी, संघटन, समाजजागृती, समष्टिधर्माचा प्रचार या कार्याला त्यांनी प्रारंभ केला.
 महाराज आदर्श मिशनरी आहेत असे वर म्हटले आहे त्याचा अर्थ असा. मिशनरी वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग करून, लोकांना औषधोपचार करून त्यांचे रोगनिवारण करतात, त्यांना शिक्षण देतात व द्रव्यसाहाय्यही करतात. आणि या पुण्याईच्या बळावर धर्मप्रसार करतात. रोगनिवारणाची विद्या महाराजांच्याजवळ मिशनऱ्यापेक्षां शतपटीने जास्त प्रभावी आहे. त्या पुण्याईवर ग्रामीण भागात आज प्रचंड विधायक कार्य करून ते समष्टिधर्माचा प्रसार करीत आहेत. ते खेड्यांत जातात व श्रमदानमहोत्सव, श्रमदानसप्ताह, कृषिसेवा-यज्ञ, श्रमदान- महायज्ञ असे सहकारी श्रमयज्ञ घडवितात व विहिरी खोदणे, तलाव बांधणे, खते तयार करणे, सडका बांधणे, शाळा उभारणे, हजारो एकर जमीन सहकारी पद्धतीने कसणे, कातळावर तीनतीन फूट मातीचा थर टाकून नवीन जमीन तयार करणे, पडीक जमीन लागवडीस आणणे ही कामे खेडुतांकडून करून घेतात. आज भारताला हेच हवे आहे; पण हे घडविणारी ध्येयवादी माणसे नाहीत. या श्रमदानात सहकाराचे, उद्योगाचे, स्वावलंबनाचे, शास्त्रीय शेतीचे शिक्षण लोकांना मिळते. महाराज सरकारी अनुदाने घेत नाहीत. या श्रमदानात तीस तीस हजार लोक, कधी लाखापर्यंत लोक सहभागी होतात. त्यांच्या जेवणाखाणाची सोय भोवतालच्या परिसरातून खंडोगणती गहू, डाळ, तांदूळ, साखर हे पदार्थ जमवूनच केली जाते. यातून जनतेच्या मनावर जे संस्कार होतात ते फार मोलाचे आहेत. कारण या श्रमदानात जातिभेद नाही, अस्पृश्यता नाही, श्रीमंत-गरीब नाही, हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन नाही. श्रमदानात सर्व सामील होतात. अनेक केंद्रमंत्री व राज्यमंत्री हा श्रमदानयज्ञ पाहावयास येतात. तेही खोरे घमेले घेऊन श्रमदानात सामील होतात. गुलझारीलाल नंदा, पाटसकर यांचे पाट्या घेतलेले फोटो त्या त्या वेळी प्रसिद्ध झालेलेच आहेत. असे श्रमदानयज्ञ महाराजांनी पंजाब, उत्तर प्रदेश, आंध्र, मद्रास, महाराष्ट्र, कर्नाटक- सर्व प्रदेशांत घडवून आणलेले आहेत आणि हे यज्ञ चालू असतानाच महाराजांची समष्टिधर्मांची प्रवचने चालू असतात. 'भारतीय समष्टिधर्म' या नावाने त्यांची प्रवचने प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांवरून त्यांच्या समष्टिधर्माचे स्वरूप पुढीलप्रमाणे दिसते.
 महाराज म्हणतात, ज्याने अभ्युदय व निःश्रेयस साधते तोच धर्म होय. परमार्थापासून प्रापंचिक कर्मे निराळी करणे अशक्य आहे. म्हणून खऱ्या पारमार्थिकांनी प्रपंचापासून वा जगापासून अलिप्त राहू नये. परमार्थास अवश्य ते गुण समाजसेवेतूनच निर्माण होत असतात. समाजालाच राष्ट्र ऊर्फ समष्टी म्हणतात. राष्ट्र नसते तर परमार्थपोषक गुण जन्मालाच येते ना, हे पारमार्थिकांनी कधीही विसरू नये. (भारतीय समष्टिधर्म, पृ. २४-२५) तेव्हा उच्चतम मानवी कल्याण हाच खरा धर्म होय. असा हा आमचा समष्टिधर्म बुद्धिनियंत्रित श्रद्धावादी व तत्त्वनिष्ठ परिवर्तनवादी आहे. हा धर्म पोथीनिष्ठ नाही. तत्त्वनिष्ठ पोथीवादी आहे. खरा धर्म व पोथी यांत विरोध आल्यास आम्ही पोथी फाडून टाकल्यावाचून राहणार नाही. (पृ. १८)
 जडाचा अतिरेक जसा वर्ज्य तसा अध्यात्माचाही अतिरेक आम्ही वर्ज्य मानतो. भौतिक शोधांचे आम्ही स्वागत करतो व त्या संशोधकांना भगवद्भक्तच मानतो. आम्हांस विज्ञानवादाचा संपूर्ण पुरस्कार करावयाचा आहे व समाज हितकारी नीतितत्त्वांचे समर्थन करावयाचे आहे. त्याचप्रमाणे धर्माच्या नावाखाली चाललेल्या पोथीनिष्ठ, अज्ञाननिष्ठ विषमतेचे निर्मूलन करावयाचे आहे. (पृ. १५३)
 आमच्या धर्मात, 'अवघे सम ब्रह्म पाहे, सर्वांभूती विठ्ठल आहे' अशी मानवी समतेची उदात्त तत्त्वे आहेत. पण या तत्त्वांचा आचार प्रत्यक्षात करावयाचा नसतो, असे रूढिवादी म्हणतात. ही चलाखीने काढलेली पळवाट आहे. ही समाजघातक प्रवृत्ती रूढींनी निर्माण केली आणि मदांध सत्ताधाऱ्यांनी तिला उचलून धरले. (पृ. १०१) वास्तविक नैसर्गिक व ईश्वरी कायदे सर्वाकरता समान आहेत. तेथे विषमता असलीच तर ती गुणभिन्नत्वाने असू शकते. पण गुणविकसनाचा अधिकार व संधी सर्वांना समान मिळावी असाच ईश्वरी हेतू आहे.
 पाचलेगावकरमहाराजांच्या समष्टिधर्माचे स्वरूप हे असे आहे. हा धर्म ते जन्मभर प्रत्यक्ष आचरणात आणीत आहेत. मिशनरी जसे दीन, दलित, अनाथ, परित्यक्त, रंजले, गांजले यांच्या जीवनांशी एकरूप होतात तसेच महाराजही भारतातील दीनदलितांशी एकरूप होतात. त्यांच्यांत राहतात, त्यांचेच अन्न खातात, श्रीमंत, श्रेष्ठवर्णीय यांना श्रमदानात सहभागी करून, किंवा महार, मांग, चांभार, भंगी, मराठे, ब्राह्मण अशा सर्व जातींच्या विद्यार्थ्यांसाठी एकत्र वसतिगृहे बांधून त्यांना दलितांशी एकरूप करण्याचा प्रयत्न करतात आणि अशा रीतीने भारताला अत्यंत अवश्य असलेल्या समष्टिधर्माची तत्त्वे प्रत्यक्ष आचाराने जनतेत रुजविण्याचे महान कार्य करतात.

विमोचित जमाती :
 'श्री गाडगेमहाराज मिशन' चे कार्य याच पद्धतीने चालू आहे. हे मिशन विमोचित जमातींच्या उद्धाराचे कार्य करते. ब्रिटिश राज्यकात्यांनी मांगगारुडी, ककाडी, वंजार, रामोशी, भामटा या जातींना गुन्हेगार ठरवून कैदखान्यासारख्या वसाहतींत त्यांना डांबून टाकले होते. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने त्यांना मुक्त केले व त्यांच्या उन्नतीसाठी नानाविध योजना आखल्या. गाडगे- महाराज मिशन सरकारच्या साह्याने हेच कार्य करते. माण भागातील एक समाजसेवक यशवंतराव कृष्णराव माने यांनी गोंदवले येथे या जमातीसाठी प्रथम शाळा काढली. सातारा, ओतूर, राहुरी येथेही अशाच शाळा आहेत. या सर्व गुरुकुलपद्धतीने चालतात. त्यांना आश्रमशाळाच म्हणतात. तेथे अन्न, वस्त्र व शिक्षण मोफत पुरविले जाते.

धर्मनिर्णय मंडळ :
 लोणावळ्याचे 'धर्मनिर्णय मंडळ' याचे या क्षेत्रात विशेष महत्त्व आहे. त्याला एक स्वतंत्र स्थान आहे. गेली हजार वर्षे रूढ असलेले जे अधोगामी धर्मशास्त्र त्याची वेद, उपनिषदे, सूत्रग्रंथ, महाभारत, रामायण, स्मृती यांच्या आधारे चर्चा करून मंडळाने तो रूढधर्म कसा त्याज्य आहे आणि हिंदुधर्माचे सत्यस्वरूप काय आहे हे समाजाला दाखवून फार मोठे कार्य केले आहे. म. म. काणे, म. म. श्रीधरशास्त्री पाठक, विद्वद्-रत्न दप्तरी, वे. महादेवशास्त्री दिवेकर यांसारख्या थोर धर्मनिष्ठ पंडितांनी हे स्थापन केले असल्यामुळे मंडळाच्या या क्षेत्रातल्या अधिकाराबद्दल वाद होणे शक्य नाही. हे अर्वाचीनकाळचे ऋषीच होत. इ. स. १९३४ साली हे मंडळ स्थापन झाले तेव्हा 'तत्त्वनिष्ठ परिवर्तनवादी परिषद्' असे त्याचे नाव होते. १९३८ साली 'धर्मनिर्णय मंडळ' असे नामांतर करण्यात आले. मंडळ बुद्धिवादी व परिवर्तनवादी असून जातीय ऐक्य, मिश्रविवाह, अस्पृश्यतानिवारण, यांचा ते पुरस्कार करते आणि सर्व हिंदूंना जातिपंथनिरपेक्ष वैदिक संस्कार करून समाजात समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते. तर्कतीर्थ रघुनाथशास्त्री कोकजे हे सध्याचे मंडळाचे कार्यवाहं असून ते सर्वत्र दौरे काढून मंडळाचे उद्दिष्ट साधीत असतात.
 याशिवाय हिंदुमिशनरी सोसायटी, श्रद्धानंद अनाथ महिलाश्रम, मुंबई: पंढरपूर अनाथबालकाश्रम, अनाथ महिलाश्रम-पुणे, गुरुदेवसेवा मंडळ, आदिवासी समाजसुधार सभा, छोटानागपूर; विदर्भ महारोगी सेवामंडळ, तपोवन अमरावती; कर्मवीर बाबासाहेब आमटे यांची कुष्ठरोगवसाहत, आनंदवन, वरोरा; अशा अनेक संस्था हिंदुसमाजातील अनाथ अपंगांची, दीनदलितांची सेवा करून हिंदुधर्माच्या मूलतत्त्वांचा आचार करीत आहेत. स्थलाभावी त्यांची सविस्तर माहिती येथे देता येत नाही.

तुलनेने पाहता :
 आदिवासी, अस्पृश्य, उपेक्षित, बहिष्कृत, परित्यक्त, अनाथ, अपंग, पतित, दीन, दलित यांच्या उद्धारार्थ काम करीत असलेल्या या संस्थांचे कार्य पाहून मनाला समाधान वाटते. त्यावरून एक गोष्ट निश्चित दिसते की, या हिंदुसमाजाचा मोहरा आता फिरला आहे. गेल्या हजार वर्षांतील समाजघातकी रूढी, धर्मशास्त्रकारांनी रूढविलेला तो अधर्म, नष्ट करून, विघटनापोषक सर्व तत्त्वांचे निर्मूलन करून हा समाज संघटित व बलशाली करण्याच्या मार्गास तो लागला आहे आणि कोणत्या मार्गाने जावयाचे हे त्याने निश्चित केले आहे, याविषयी शंका राहात नाही. पण ३०-४० कोटींचा हा समाज पहाता हे प्रयत्न, हा उद्योग अगदी अल्प, अत्यल्प आहे हे आपण ध्यानी घेतले पाहिजे. मुस्लीम मुल्ला-मौलवी, ख्रिश्चन मिशनरी यांच्या तुलनेने पाहता हे प्रयत्न नसल्यासारखेच वाटतात. त्यांच्या त्या उद्योगाच्या मागे प्रचंड संघटना उभ्या आहेत आणि अक्षय असा निधी आहे. त्यांशी सामना देऊन हिंदुसमाजाचे संरक्षण व संवर्धन करावयाचे तर वर सांगितल्या तशांपैकी एकट्यादुकट्या संस्थेला ते अशक्य आहे. त्यासाठी अखिल भारतव्यापी अशी एक प्रचंड संस्थाच उभी केली पाहिजे आणि हे मनात येताच विश्वहिंदुपरिषदेचे नाव पुढे येते.
 वर उल्लेखिलेल्या संस्थांची वृत्ते वाचताना एक गोष्ट ध्यानात येते की, या अनेक संस्थांत एकसूत्रीकरण नाही. त्यांचा एकमेकींशी काही संबंध नाही. त्यामुळे संस्था अनेक असून त्या एकाकीच आहेत. त्यांचे बल संघटित झाले तर त्या यापेक्षा दसपट कार्य सहज करू शकतील; पण अखिल भारतीय स्वरूपाची एखादी महासंस्था स्थापिल्यावाचून हे बल संघटित होणार नाही.

परंपरा नाही :
 पण या संस्थांतील सर्वात मोठे दौर्बल्य म्हणजे त्यांच्या परंपरा निर्माण होत नाहीत. हिंदुधर्मप्रसारक मंडळाचे ठाणे जिल्ह्यातील तळसारी येथे काम करणारे ल. र. कुळकर्णी यांनी एका पत्रात म्हटले आहे की, 'मला हार्टफेल झाल्यावर पुढे काय होईल याची चिंता वाटते.' हा प्रश्न एकट्या कुलकर्ण्याच्या पुढे नसून अखिल भारतापुढचा आणि गेल्या हजार वर्षांचा तो प्रश्न आहे. 'नेहरूंनंतर कोण ?' या स्वरूपात तो नुकताच पुन्हा सर्वांच्या मुखी झाला होता आणि नेहमीप्रमाणेच तो अनुत्तरितच राहिला आहे. समर्थ रामदासस्वामी गेले म्हणजे त्यांचे मठ चालू राहतात; पण त्यांना वारस निर्माण होत नाही. ते सामर्थ्यच या भूमीत नाही. पाश्चात्य देशांत परंपरा निर्माण करण्याचे सामर्थ्य प्रत्येक राष्ट्रात, प्रत्येक क्षेत्रात दिसून येते. विज्ञानसंशोधन, वैद्यकीय संशोधन, कारखानदारी, व्यापार, भूसंशोधन, लोकशाहीचे नेतृत्व, राजकीय मुत्सद्देगिरी, प्रशासन इ. सर्व क्षेत्रांत लिंकननंतर कोण, चर्चिलनंतर कोण, फोर्डनंतर कोण, एडिसन गेल्यावर काय हा प्रश्न तेथे निर्माण होत नाही. मिशनऱ्यांच्या परंपरा तर शेकडो वर्षे सतत चालतात; हेच त्या देशाचे बळ आहे. पण हे आपोआप निर्माण होत नाही. शाळा, प्रशाळा, महाशाळा यातून तसे संस्कार अहोरात्र, वर्षानुवर्षं केले जातात. पुण्यात 'स्पायसर' व 'डी नोबिली' अशा दोन ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या महाशाळा आहेत. त्यांतून बाराबारा वर्षे धर्मप्रवक्त्यांना शिक्षण दिले जाते आणि आमरण सेवेचे व ब्रह्मचर्याचे व्रत घेऊन तेथून अनेक मिशनरी दरसाल बाहेर पडतात आणि संस्था जगाच्या ज्या भागात पाठवील तेथे जाऊन तेथील दीनदलितांत मिसळून, त्यांच्या भाषा शिकून, त्यांशी एकरूप होऊन ख्रिस्ताचा संदेश त्यांच्यांत प्रसृत करतात. अमेरिकेतील 'समर इन्स्टिटयूट ऑफ लिंग्विस्टिक्स' ही संस्था ख्रिस्ती धर्माच्या प्रसारार्थच स्थापन झाली आहे. आफ्रिकेतील प्रचंड गहन अरण्ये, पेरू, ब्राझील या देशांतील जंगले यांत अजून लिहिता वाचता न येणारे कमीत कमी ७० कोटी लोक आहेत. ते एकंदर दोन हजार भाषा बोलतात. त्यांच्यात धर्मप्रसार करणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी या रानटी जमातींच्या भाषा लिपिबद्ध कराण्याचे शास्त्र इन्स्टिट्यूटचे संस्थापक विल्यम कॅमेरॉन टाऊनसेंड, अंकल कॅम, यांनी सिद्ध केले आहे. ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया येथे संस्थेच्या शाखा आहेत. त्यांतून दरसाल पाचशे तरुणांना त्या शास्त्राचे शिक्षण दिले जाते. शिवाय नदीनाले पार होणे, टहाळे, गवत यांच्या झोपड्या बांधून त्यात रहाणे, होडगी तयार करणे, हिंसा, महासर्प यांपासून स्वसंरक्षण करणे, साथीच्या रोगांवर उपचार करणे, जंगलांतून मार्ग काढणे यांचेही शिक्षण त्यांना दिले जाते. कारण महारण्यात वन्य जमातींच्या सान्निध्यातच त्यांना राहावयाचे असते. असे शिक्षण घेऊन दरसाल पाचशे तरुण स्त्रीपुरुष बाहेर पडतात व वर निर्देशिलेल्या वनारण्यात जाऊन जन्मभर धर्मप्रसाराचे कार्य करितात. मिशनऱ्यांच्या कार्यामागे अशा त्यागी, ध्येयनिष्ठ, धर्मनिष्ठ तरुणांची पुण्याई उभी आहे. तेच त्यांचे खरे बळ, खरे सामर्थ्य आहे. हे बळ हिंदुसमाजाला निर्माण करता येईल काय, हा आजचा प्रश्न आहे. आर्यसमाज, रामकृष्ण मिशन, यांनी हे बळ काही प्रमाणात निर्माण केले आहे; पण वर सांगितल्याप्रमाणे ते अत्यल्प आहे, फार अपुरे आहे. सिंधूमध्ये एक मधुबिंदू इतकेच त्याचे प्रमाण आहे.

पुन्हा तोच प्रश्न :
 आज भारतात सर्व क्षेत्रांत पाहता आपले कर्तृत्व शून्यावर येऊन ठेपले आहे असे दिसते. आपल्या पंचवार्षिक योजना इष्ट फल देत नाहीत, कारखानदारी बुडीतखात्यात आहे, राजकीय मुत्सद्देगिरीच्या नावाने दिवाळे वाजले आहे, सर्वांना पुरेसे अन्न आपण निर्माण करू शकत नाही, विद्यालये, विद्यापीठे यांचा शिक्षणाचा दर्जा अत्यंत खालावला आहे, आपल्या चलनाला स्थैर्य नाही, आपल्या नगरपालिका, महापालिका यांची कार्यक्षमता प्रसिद्धच आहे. सहकारी संस्था म्हणजे त्या शब्दाची विटंबनाच आहे, आपल्या पोलिसांना चोरटी आयात थांबविता येत नाही, खेड्यांत गुंडांचे राज्य प्रस्थापित होत आहे, तेथे त्यांचा कोणी प्रतिकार करू शकत नाही. आपल्याला आगगाड्या चालविता येत नाहीत, आपल्या इमारती बांधकाम पुरे होण्याच्या आधीच पडू लागतात, वीजपुरवठ्याची यंत्रणा आपल्याला साधत नाही, सीमाप्रश्न, पाणीवाटपाचा प्रश्न, कारखाने उभारण्याचा प्रश्न असे अंतर्गत प्रश्न रक्तपातावाचून आपल्याला सोडविता येत नाहीत आणि शेवटी आक्रमकांशी मुकाबला करून गेलेला प्रदेश सोडविण्यात आपल्याला काडीमात्र यश येत नाही. त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्याचे रक्षण आपल्याला करता येईल की नाही हा पूर्वीचाच प्रश्न पुन्हा उभा राहिला आहे.
 याचे कारण हे की येथे लोकशाही प्रस्थापित झाली; पण तिचा भार पेलण्यास येथे 'लोक' अजून निर्माण झालेले नाहीत. येथला बहुजनसमाज, आपली कोट्यवधी जनता अजून जुन्या युगात आहे. राष्ट्र, विज्ञान, व्यक्तिस्वातंत्र्य, समाज हितबुद्धी, राजकीय प्रबुद्धता यांचे संस्कार तिच्यावर अजून झालेले नाहीत. हे झाले नाहीत तोपर्यंत या जनतेतून 'लोक' निर्माण होणार नाहीत. आज जनतेत राजकीय प्रबुद्धता आली आहे; पण ती फक्त एकाच दृष्टीने. तिला सर्वत्र निवडून यावयाचे आहे. समाजसेवा या धर्माची तिला ओळखच नाही. सर्व भारतात प्रत्येक नागरिकाचे आज एकच ध्येय आहे. निवडून येणे ! त्यामुळे हा सर्व समाज भ्रष्ट, चारित्र्यहीन झाला आहे. त्याग, सेवा, निष्ठा हे लांब राहिले, या समाजातून प्राथमिक कर्तव्यबुद्धीचाही लोप झाला आहे. अशा स्थितीत या समाजाचा प्रपंच यशस्वी होणार कसा ?

हिंदुसमाजाचे भवितव्य :
 तेव्हा भारतीय समाजातून लोक निर्माण करणे हे आज पहिले कार्य आहे. त्यासाठी वर सांगितलेल्या निष्ठांचे संस्कार भारतातील जनतेवर करणे अवश्य आहे आणि त्यासाठी लक्षलक्ष त्यागी, ध्येयवादी तरुणांची संघटना भारतात उभी झाली पाहिजे. स्वामी विवेकानंद नेहमी म्हणत, 'मला एक हजार तरुण संन्यासी मिळाले तर मी भारतात क्रांती करीन.' आज तेवढ्यानेही भागणार नाही. लक्षसंख्येने असे तरुण एकत्र येणे अवश्य आहे. पाश्चात्य तरुणांची त्यांच्या धर्मावर असीम निष्ठा आहे म्हणून महारण्यात, जंगलात, पहाडात, दऱ्याखोऱ्यांत ते जन्मभर जाऊन राहतात व सर्व आयुष्य जनतेच्या सेवेत घालवितात. हिंदुसमाजाला अशा निष्ठेने संपन्न असे लक्षावधी तरुण निर्माण करता आले तरच आपल्याला, लोकशाहीला, राष्ट्रसंरक्षणाला व धर्मरक्षणाला पुरेसे सामर्थ्य व कर्तृत्व प्राप्त करून घेता येईल. एरवी या समाजाला कसलेही भवितव्य नाही !

जिवंतपणाची कसोटी
 विश्वहिंदु परिषद् हे कार्य शिरावर घेईल काय ? वर सांगितलेल्या अंकल कॅमसारखा एक मनुष्य पाचशेपाचशे तरुण दरसाल तयार करू शकतो. मेथॉडिस्ट, बॅप्टिस्ट, क्वेकर, साल्व्हेशन आर्मी अशा प्रत्येक मिशनला असे ध्येयवादी, वाहून घेणारे शेकडो लोक मिळतात. विश्वहिंदुपरिषद अखिल हिंदूंची संस्था आहे. संख्येच्याच दृष्टीने पाहिले तर यात अशक्य असे काहीच नाही; पण गुणांच्या, निष्ठेच्या, ध्येयवादाच्या दृष्टीने ? रामायणकाळात उत्तरेतून दक्षिणेकडे भारद्वाज, अत्री, अगस्त्य असे अनेक तरुण गेले व तेथे महारण्यात आश्रम बांधून राहिले आणि राक्षस, दस्यू, दैत्य अशा रानटांच्या हल्ल्यांना तोंड देऊन त्यांनी विंध्याच्या दक्षिणेची सर्व जनता आर्यसंस्कृतीच्या कक्षेत आणली. ऐतिहासिक काळात बौद्धभिक्षू या भूमीतून लंका, ब्रहादेश, चीन, जपान या देशांत गेले व तेथे त्यांनी प्रचंड मानवसमूहांना आपल्या धर्माची दीक्षा दिली. शालिवाहन शकाच्या पहिल्या दहा शतकांत जावा, सुमात्रा, बोर्निओ, सयाम, मलाया या पूर्वेकडच्या प्रदेशात कौंडिण्यासारखे भारतीय पुरुष गेले आणि त्यांनी रामायण-महाभारत संस्कृतीत तेथला समाज समाविष्ट केला. आजचा प्रश्न त्या मानाने सोपा आहे. आपल्याला कोठे परदेशात जावयाचे नाही. दळवळणाची साधने विपुल आहेत. एक शतकभर राष्ट्र, विज्ञान, बुद्धिवाद यांच्या लहरी तरी पूर्वसूरींच्या कृपेने भारतभर प्रसृत झालेल्या आहेत. म्हणजे भूमी तयार आहे. आता सेवेच्या, धर्मनिष्ठेच्या बळावर हे नवे संस्कार बहुजनांत रुजविण्याचे कार्य शिल्लक आहे. यासाठीच त्या समाजात राहून त्याशी एकरूप होऊन ही धर्मक्रान्ती घडविणारे लक्षावधी तरुण हवे आहेत. विश्वहिंदुपरिषदेचे हे कार्य आहे असे मला वाटते. हिंदुसमाज जिवंत असला तर असे कार्यकर्ते मिळणे अवघड नाही. तसा तो आहे की नाही हेच आता ठरावयाचे आहे.

§