डॉ. नंदू मुलमुले
यंदाच्या वर्षी सगळय़ांत जास्त वापरला गेलेला शब्द म्हणजे, ‘गॅसलायटिंग’. ‘गॅसलायटिंग’ ही संज्ञा मनोविकारांच्या अधिकृत यादीत अद्याप समाविष्ट झालेली नसली, तरीही मानसिक समस्याग्रस्त व्यक्तीकडे पाहण्याची तिच्या जवळच्या माणसांची वा समाजाची पूर्वग्रहदूषित वृत्ती, हे ‘गॅसलायटिंग’चं वैशिष्टय़. काय आहे हे ‘गॅसलायटिंग’? नात्यांमध्ये विसंवाद निर्माण करणाऱ्या ‘गॅसलायटिंग’विषयी..
निशांत आणि स्नेहा, लग्नाला फक्त तीन वर्ष झालेलं जोडपं. सहजीवनात शरीराची जवळीक जेवढी सहज आणि सुखावह, मनाची तेवढीच कष्टसाध्य. एव्हाना दोघांच्या संसारात उगवलेल्या मधुचंद्रानं कृष्णपक्षात प्रवेश केलेला. आकर्षणाची लाट ओसरून भिन्न स्वभावांतल्या अपेक्षाभंगाचे खडक उघडे पडू लागलेले. तो प्रत्येक कामात काटेकोर, ती अघळपघळ. तो काहीसा रुक्ष, ती संवेदनशील. तो रागीट, ती मवाळ. लहानसहान गोष्टींवरून उडणारे खटके उग्र स्वरूप धारण करू लागले. अशात स्नेहा उदास राहू लागते. निशांतच्या स्फोटक क्रोधाची संभाव्य शक्यता तिच्या मनात भीतीचं घर करते. एके दिवशी ती निशांतला सुचवते, आपण मानस-समुपदेशनाचा आधार घेऊ या का? चिडून निशांत ओरडतो, ‘‘तू घे. तुझं डोकं खराब झालेलं आहे. सायकॉलॉजिकल इश्यूज तुला आहेत, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये.’’
निशांत तिचं ‘गॅसलायटिंग’ करतो आहे. नानीचं वय झालंय. तशी ती ठीक आहे, चालती-बोलती आहे, मात्र सुधीरला, तिच्या धाकटय़ा मुलाला आणि सुनेला तसं वाटत नाहीये. वयोमानानुसार तिला कधीकधी आठवत नाही. त्यांच्या मते ही डिमेन्शियाची सुरुवात असू शकते. तिला एखादं नाव नाही आठवलं, तर लगेच ते तिच्याकडे सूचक नजरेनं पाहतात. तिला मधुमेह नाही, पण पुढे होऊ नये म्हणून त्यांनी तिची साखर बंद केली आहे. रस्ता चुकेल, तोल जाईल म्हणून बाहेर फिरणं बंद केलं आहे. तिनं लवकरात लवकर मृत्युपत्र करून राहातं घर आणि ठेवी मोठय़ाला न देता आपल्या नावानं कराव्यात यासाठी ते मागे लागले आहेत.
नानीचं ‘गॅसलायटिंग’ सुरू आहे!
डॉक्टरांना वारंवार त्यांच्याकडे पोटाची तक्रार घेऊन येणाऱ्या निरगुडेकाकांचा वैताग आलेला आहे. त्यांच्या सगळय़ा तपासण्या झाल्या आहेत, मात्र पोटदुखीचं मूळ सापडत नाहीये. काकांना जुनाट पोटदुखीनं काळजी करणं, झोप न लागणं, निराश वाटणं अशी लक्षणे जाणवू लागतात, त्या लक्षणांमुळे डॉक्टरांनी त्यांना मनोविकार-तज्ज्ञांना भेटण्याचा सल्ला दिला आहे. त्यांना डिप्रेशन असावं, अशी अटकळ डॉक्टरांनी नातेवाईकांजवळ व्यक्त केली आहे. काकांना वैतागलेले नातेवाईकही डॉक्टरांची री ओढताहेत. डॉक्टरांनी नकळत काकांचा गॅसलाइट पेटवला आहे!
काय आहे हे ‘गॅसलायटिंग’ ?
इंग्लिश नाटककार पॅट्रिक हॅमिल्टन यांचं ‘गॅसलाइट’ हे रहस्यमय नाटक १९३८ मध्ये रंगभूमीवर आलं. एका धूर्त नवऱ्याला बायकोचा ऐवज चोरायचा आहे. ती एकटी असताना घरातल्या गॅसच्या दिव्यांचा उजेड कुठल्याशा कारणानं कमीजास्त होत राहातो. नवरा या गोष्टीचा फायदा घेऊन तो तिचा भ्रम आहे अशी तिची समजूत करून देऊन तिचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे अशी तिची खात्री पटवून देतो. नाटक लक्षवेधी ठरलं आणि या कथानकावर पुढल्या चार वर्षांत ‘गॅसलाइट’ याच नावानं दोन अमेरिकी चित्रपट आले. १९४४ च्या चित्रपटात तर हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री इन्ग्रिड बर्गमन हिची भूमिका होती. गंमत म्हणजे शीर्षक ‘गॅसलाइट’असलं, तरी या तिन्हीपैकी कुठल्याच पटकथेत ‘एखाद्याचं ‘गॅसलायटिंग’ करणं’ असा शब्दप्रयोग नव्हता.
सिनेमातल्या मध्यवर्ती कल्पनेचा व्यावहारिक जगातील अर्थ या दृष्टीनं तो पहिल्यांदा एका पत्रकारानं वापरला ‘न्यूयॉर्क टाइम्स’मधील एका स्तंभात, तब्बल पन्नास वर्षांनी १९९५ मध्ये. मात्र तो प्रचलित व्हायला अजून पंधरा वर्ष गेली. थेट २०१० मध्ये ‘अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन’नं दखल घेऊन, ‘एखाद्याला जबरदस्तीनं मानसिक रुग्ण ठरवणं’ अशी त्याची ढोबळ व्याख्या केली. हळूहळू ‘गॅसलायटिंग’ या संज्ञेचा वापर वाढू लागला, त्याचा अर्थ अधिक समावेशक झाला. २०१६ मध्ये इंग्लिश भाषेत नव्यानं आलेला अत्यंत उपयुक्त शब्द असं त्याचं स्वागत झालं. २०१८ मध्ये तो वर्षभरात सगळय़ांत जास्त वापरल्या गेलेल्या शब्दांच्या स्पर्धेत दुसरा ठरला, तर या वर्षी म्हणजे २०२२ मध्ये त्यानं पहिला क्रमांक पटकावला. त्याची व्याप्ती वाढली, नवनव्या क्षेत्रात त्याला नवे अर्थ प्राप्त झाले. समाजमाध्यमी पिढीच्या तोंडी तो परवलीचा शब्द ठरला.
एखाद्या व्यक्तीच्या अस्वस्थ मन:स्थितीचा जाणूनबुजून किंवा अजाणतेपणी फायदा घेऊन त्यानं मांडलेलं वास्तव हे भ्रामक आहे, तथ्यहीन आहे, असा समज करून देणं हा ‘गॅसलायटिंग’ या संकल्पनेचा गाभा. सगळय़ाच नातेसंबंधांत त्याचा प्रादुर्भाव दिसून येतो, पण पती-पत्नी नातं सगळय़ात उत्कट, निकट असं शरीर-मनाचं साहचर्य. त्या नात्यातल्या ‘गॅसलायटिंग’चा सूक्ष्म वापर हा पदोपदी दिसून येतो. ‘गॅसलायटिंग’ या संकल्पनेनं जोर पकडायला पन्नास-सत्तर वर्ष का घेतली, याचं उत्तर या नातेसंबंधांच्या गुंतागुंतीच्या प्रवासात दडलेलं आहे. एकेकाळी नवरा-बायको नातेसंबधात संवादच नव्हता. पौगंडावस्थेत लग्नाच्या बेडीत अडकवलेली पिढी ती, जीवनाचं गांभीर्य नाही तर नातेसंबंधांचं आकलन कुठे असायला? पुढे काहीशी सुधारणा झाली आणि पुरुषप्रधान समाजात तो संवाद एकतर्फी का होईना, आज्ञावलीच्या स्वरूपात आला. नवऱ्यानं सांगायचं आणि बायकोनं ऐकायचं. जिथे नवऱ्याबद्दल संवाद मोकळा नव्हता तिथे नवऱ्यासोबत कुठला? गॅसलाइट पेटवायची गरजच नव्हती! कारण गॅसलाइट हे संवादाचं विकृतीकरण. १९६०-७० च्या दशकापर्यंत भारतीय मध्यमवर्गीय समाजातल्या स्त्रियांची ही स्थिती होती.
अर्थशास्त्र हे त्यातल्या अंदाजपंचायतीमुळे शुद्ध शास्त्र आहे की नाही यावर तज्ज्ञ कितीही खल करोत, सगळय़ा नातेसंबंधांच्या मुळाशी आर्थिक हितसंबंध असतात हे वास्तव. स्त्रीच्या जीवनात अर्थ आला. अर्थकारणानं तेव्हाचं पतीपत्नी नातं बरोबरीचं झालं. संवाद सुरू झाला. संवादात वाद, विवाद, विसंवाद अध्याहृत. ‘गॅसलायटिंग’ हे विसंवादाचं अपत्य.
‘गॅसलायटिंग’ ही जेवढी वैवाहिक नातेसंबंधांची कहाणी, तेवढीच ती एक मानसशास्त्रीय संकल्पना आहे हे विसरून चालणार नाही. त्यामुळे मानसिक समस्याग्रस्त व्यक्तीकडे पाहण्याची समाजाची पूर्वग्रहदूषित वृत्ती हे ‘गॅसलायटिंग’चं वैशिष्टय़. आपल्या जोडीदाराला मानसिक समस्या आहे म्हणजे त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, हा तो पूर्वग्रहदूषित निष्कर्ष. वास्तविक मनोरुग्णाचं सगळय़ाच बाबतीत मानसिक संतुलन बिघडलेलं असतं असं नाही. एखाद्याचा हात फ्रॅक्चर झाला आहे याचा अर्थ त्याचा तो हात काम करू शकत नाही एवढाच आहे, तो चालू-बोलू शकतो हे आपण गृहीत धरतो. हाताचं कार्य सोडून त्याच्या उर्वरित क्षमतेवर कुणीही प्रश्नचिन्ह उभं करत नाही. मधुमेह झालेला प्राध्यापक त्याचा निहित विषय कितीही क्लिष्ट असो, शिकवू शकतो, बायपास झालेला माणूस जमिनीचे व्यवहार करू शकतो, चक्रासनावर खिळलेला, बोलूही न शकणारा शास्त्रज्ञ विश्वाची प्रमेयं सोडवतो. कुणी त्यांच्या क्षमतेवर शंका उपस्थित करत नाहीत. मात्र एकदा मानसिक रुग्ण हा शिक्का बसला की त्याच्या कुठल्याही कृतीकडे संशयानंच पाहिलं जातं. इथे शहरी-ग्रामीण हा भेदभाव नाही, शिकलेला-अशिक्षित हा फरक नाही. ग्रामीण भागातल्या माझ्या एका रुग्णाची, अशोकची व्यथा सांगतो. नांदेड जिल्ह्यातल्या एका तालुक्याच्या खेडय़ातून आलेल्या साधारण तीस वर्षांच्या या तरुणाला पाच-सहा वर्षांपूर्वी उन्माद (मॅनिया) हा मानसिक आजार उद्भवला. पुन:पुन्हा होण्याची शक्यता असलेला हा विकार बरा झाला, की पूर्ण बरा होतो, त्याचा मागमूसही उरत नाही. शिवाय एकदा ताळय़ावर आलेल्या रुग्णानं नियमित एक औषध चालू ठेवलं, की त्याला पुन:पुन्हा तो आजार होण्याची शक्यता कमी होऊन जाते. मात्र कालांतरानं, कुणालाही येऊ शकतो तसा रुग्णांना गोळय़ा घेण्याचा कंटाळा येतो. गोळय़ा बंद पडल्यानं ठरावीक कालावधीनंतर पुन्हा उन्मादाचा झटका येतो. असाच अशोकलाही दोन-तीनदा उन्मादाचा त्रास झाला. त्या विकारातही त्याची बुद्धी इतकी शाबूत, की तो स्वत:च उन्मादाच्या सुरुवातीला येऊन सांगायचा, डॉक्टर माझं बोलणं वाढायला लागलंय, गोळय़ा बदलून द्या! गोळय़ा जबाबदारीनं नियमित घ्यायचा. दुरुस्त झाला, की शेतीची कामं करायचा. एकदा येऊन आपली व्यथा सांगायला लागला. गाव छोटं, साऱ्यांना अशोकचा विकार माहीत. ग्रामसभेत गावच्या विकासाची एखादी योजना आली, तर सरपंच गावकऱ्यांची आमसभा बोलवायचा. सूचना घ्यायचा. त्या सभेत अशोकनं काही सुचवलं, की सगळे त्याला गप्प करीत. ‘ए येडय़ा, तुला काय कळतं यातलं, गप्प बैस की!’ त्याची कुठलीही सूचना कितीही चांगली असो, कुणीही मनावर घ्यायचे नाहीत. एकदा मनोविकाराचा शिक्का बसला तो बसला, मग तो बरा झालेला असो, सगळी कामं व्यवस्थित करत असो.
हे एखाद्याचं सामाजिक ‘गॅसलायटिंग’. हे करताना धूर्त माणसं अनेक युक्त्या वापरतात. तू काय बोलते/ बोलतो आहेस हे नॉर्मल माणसाला समजण्याच्या पलीकडे आहे अशी एक समजूत करून देणं, त्याच्या स्मरणशक्तीवर वारंवार संशय व्यक्त करणं (नक्की पाहिलंस तू? काही भास तर नाही ना झाला? असं वारंवार विचारून त्याच्या मनात, खरंच आपण म्हणतो तसा प्रकार झाला की नाही याविषयी संभ्रम उत्पन्न करणं.), त्याची गंभीर तक्रारही गांभीर्यानं न घेणं, तिची व्याप्ती कमी करणं ( फार विचार करतेस तू, राईचा पर्वत करू नकोस.), विसरल्याचा बहाणा करून कुठल्याच गोष्टीला दुजोरा न देणं (मी असं म्हणालोच नाही, असं काही घडल्याचं मला तरी आठवत नाही, तू म्हणतेस तर असेल, पण प्रॉमिस पूर्ण करायला वेळ लागेल.. इत्यादी.) वेळकाढूपणा करणं, उपकार केल्यासारखं दाखवणं, जोडीदाराच्या मनात ओशाळेपणा आणणं हे सगळे प्रकार ‘गॅसलायटिंग’मध्ये चालतात. सततच्या अशा सांगण्यानं ‘गॅसलायटिंग’चा बळी ठरलेल्या माणसाचा स्वत:च्या मानसिक क्षमतेवरचा विश्वास उडून तो संभ्रमात सापडतो.
‘गॅसलायटिंग’ ही संज्ञा मनोविकारांच्या अधिकृत यादीत समाविष्ट झालेली नाही, कारण त्यावर पुरेसं संशोधन झालेलं नाही, मात्र अगदीच नाही असं नाही. थिओ डॉरपेट या मानसतज्ज्ञानं समुपदेशक आणि समस्याग्रस्त रुग्ण यांतही नकळत कसं ‘गॅसलायटिंग’ होताना दिसतं यावर प्रकाश टाकताना चक्क एक पुस्तक लिहिलेलं आहे. समस्या घेऊन येतो तो रुग्ण, मग त्याच्या तक्रारीमागे वास्तव घटकांचा सहभाग किती आणि संवेदित कल्पना किती याची वस्तुनिष्ठ शहानिशा होतेच असं नाही.
समाजमानसशास्त्राच्या मते, ‘गॅसलायटिंग’चं अस्तित्व वर्णभेद, जातीभेद, वंशभेद अशा अनेक सामाजिक भेदभावांच्या घटनांत दिसून येतं. राजकीय क्षेत्रात डोनाल्ड ट्रम्पच्या कारकीर्दीत अनेक भ्रामक सत्यं ‘व्हाइट हाऊस’मधून प्रसारित केली गेली आणि विरोधकांचं ‘गॅसलायटिंग’ केलं गेलं. निवडणुकांत तर शेंडाबुडखा नसलेले आरोप करून धूर्त राजकारणी प्रतिस्पर्ध्याचं ‘गॅसलायटिंग’ करण्याचं तंत्र अलीकडच्या काळात विशेषरूपानं विकसित झालेलं आढळतं. काही वर्षांपूर्वी स्त्रियांनी आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडताना ‘मी टू’ चळवळीला जन्म दिला. अनेक पीडितांची त्याला व्यापक साथ मिळाली. ‘गॅसलायटिंग’बद्दलची सजगता ही या चळवळीचं फलित. त्यातून बाहेर आलेलं महत्त्वाचं तथ्य असं, की ‘गॅसलायटिंग’ला बळी पडलेली व्यक्ती सहसा एकटी पडलेली दिसते. या एकटेपणातून असाहाय्यता, नैराश्य, त्यातून अधिक एकलेपणा असं दुष्टचक्र तयार होतं.
‘गॅसलायटिंग’बद्दल विविध माध्यमांवरील चर्चा, प्रचार आणि अंतिमत: असं काही आपल्या बाबतीत घडतं आहे किंवा घडू शकतं याविषयी सजगता, तो होऊ नये यासाठी संवेदनशील मित्रमैत्रिणींची आणि जरूर पडल्यास सक्षम समुपदेशकाची किंवा मानसतज्ज्ञाची मदत घेण्यास संकोच न करणं हेच ‘गॅसलायटिंग’विरुद्ध महत्त्वाचं पाऊल. त्यासाठी २०२२ संपता संपता या शब्दाची सर्वाधिक चर्चा होणं हा समाजमाध्यमांच्या पारडय़ात पडलेला अपवादात्मक गुण असं मानायला हरकत नाही!