उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०१७ ही भारताच्याउत्तर प्रदेश राज्यातील विधानसभा निवडणुक होती. ११ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान ७ फेऱ्यांमध्ये घेतल्या गेलेल्या ह्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेश विधानसभेमधील सर्व ४०३ जागांसाठी नवे आमदार निवडण्यात आले. मागील मुख्यमंत्री अखिलेश यादव हे समाजवादी पक्षाचे तर भूतपूर्व मुख्यमंत्री मायावती ह्या बहुजन समाज पक्षाच्या नेत्या होत्या. भारतीय जनता पक्षाने आपला नेता जाहीरना करता पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्याच नावाखाली निवडणूक प्रचार केला. उत्तर प्रदेशसोबत उत्तराखंड, गोवा, पंजाब व मणिपूर ह्या राज्यांमध्ये देखील विधानसभा निवडणुका घेतल्या गेल्या. सर्व निवडणुकांचे निकाल ११ मार्च २०१७ रोजी घोषित करण्यात आले.
ह्या निवडणुकीत भाजपला अभुतपूर्व यश मिळाले व ४०३ पैकी तब्बल ३२५ जागांवर रालोआचे उमेदवार विजयी झाले. पश्चिम उत्तर प्रदेश, बुंदेलखंड, अवध, पूर्वांचल इत्यादी सर्व भौगोलिक भागांमध्ये भाजपने मुसंडी मारली व सपा-काँग्रेस आघाडी तसेच बसपा ह्या प्रमुख पक्षांना दारुण अपयशाचा सामना करावा लागला. भाजपच्या विधिमंडळ बैठकीदरम्यान गोरखपूर मठाचे पुजारी व विद्यमान लोकसभा सदस्य योगी आदित्यनाथ ह्यांची मुख्यमंत्रीपदावर निवड करण्यात आली व १९ मार्च २०१७ रोजी त्यांनी पदाची शपथ घेतली.