Jump to content

सद्गुरु स्तोत्र

विकिस्रोत कडून

<poem> गुरू| गुणालया| परापराधिनाथ सुंदरा| देवादिकांहुनि वरीष्ठ तूचि साजीरा| गुणावतार तू धरोनिया या जगास तारीसी| सुरा मुनीश्वरा अलभ्य या गतीस दावीसी||१||

जया गुरूत्व वेधिले तयासि कार्य साधिले| भवार्णवासि लंघिले सुविघ्नदुर्ग भंगिले| सहा रिपूंसि जिंकिले निजात्मतत्व चिंतीले| परात्परासि पाहीले प्रकृष्ट दु:ख साहीले||२||

गुरू उदार माऊली प्रशांतसौख्य साऊली| जया नरास फावली तयास सिद्धी गावली| 'गुरू गुरू गुरू गुरू' म्हणोनी जो नरे स्मरू| तरे मोहसागरू सुखी घडे निरंतरू||३||

गुरू चिदब्धीचंद्र हा महत्पदी महेंद्र हा| असे प्रतापरुद्र हा गुरु कृपासमुद्र हा| गुरु स्वरूप दे स्वतः गुरूचि ब्रम्ह सर्वथा| गुरूविना महाव्यथा नसे जनी निवारिता||४||

शिवाहुनि गुरु असे अधिक हे मला दिसे| नरांसि मोक्ष द्यावया गुरू स्वरूप घेतसे| शिवस्वरूप आपुले न मोक्षदक्ष देखिले| गुरुने पूर्ण घेतले म्हणोनि कृत्य साधिले||५||

गुरूचि बापमाऊली गुरूचि दीनसाऊली| गुरूचि शिष्यवासरांस कामधेनु साऊली| गुरुचि चिंतीतार्थ दे गुरुचि तत्व तो वदे| अलभ्य मोक्षलाभ आपुल्या कृपे गुरुचि दे||६||

गुरुचि भेद नाशितो जडांधकार शोषितो| गुरुचि मोह वारितो अविद्यभाव सारितो| गुरूचि ब्रम्ह दावितो गुरूचि ध्यान लावितो| गुरुचि विश्व सर्व आत्मरूप हे बुझवितो||७||

गुरुचि मूळदीप रे जगत गुरुस्वरूप रे| समस्त देव तदंश दिसताति साजीरे| गुरुचि पूर्णसिंधू रे तयांत देव बिंदू रे| गुरु स्वयंभू सूर्य अन्य सर्वही मयूर रे||८||

गुरुचि दिव्य दृष्टी रे गुरुचि सर्व सृष्टी रे| गुरुचि ज्ञानबोध रे गुरुचि सर्व शोध रे| गुणांत तोचि विस्तरे मनांत तोचि संचरे| समस्त भूतमात्र चेष्टवोनि एकला ऊरे| |९||

गुरु विराटरूप रे गुरु हिरण्यगर्भ रे| गुरुचि ॐ हिरण्यवर्ण पंचवर्ण मुख्य तार रे| गुरुचि विश्व तेजसू गुरुचि प्राज्ञ पुरुषु| गुरुविना दुजा नसे शृतीष घोष सर्वसु||१०||

गुरुचि ध्येय ध्यान रे गुरुचि सर्व मान रे| नसे गुरु समान रे| जनी गुरुस मान रे| गुरुचि थोर सान रे महासुखा निधान रे| 'गुरू गुरू गुरू गुरू' करी म्हणोनी गान रे||११||

गुरुस्वरूप चिंतीजे समाधि हेचि बोलीजे| समस्त वेदपाथनाममंत्रजाप्य जाणिजे| यथार्थ सर्वतीर्थ जे सद्गुरुपदाब्जतोय हे| गुरुचि सेवणे अनेक अश्वमेध यज्ञ हे||१२||

नमो गुरु कृपाकरा| नमो गुरु परात्परा| नमो गुरु धनाधना| नमो गुरु निरंजना||१३||

<poem>

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.